Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 28 May 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ मे २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
येत्या पाच जून रोजी जागतिक
पर्यावरण दिनानिमित्त केंद्र सरकार राज्यांच्या मदतीनं घनकचरा व्यवस्थापनाचं एक मोठं
अभियान सुरु करणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मन की बात या
कार्यक्रमात ते आज देशवासियांशी संवाद साधत होते. आपण देशातल्या ज्या ज्या भागात भेट
देतो, तिथं प्रशासनासह लोकसहभागातून स्वच्छता अभियान राबवलं गेल्याचं चित्र दिसतं,
हे समाधानकारक असल्याचं ते म्हणाले. ओल्या आणि सुक्या कचऱ्याचं वर्गीकरण करुन त्यांचा
पुनर्वापर किंवा पुनःप्रक्रिया करण्यासाठी शहरांमध्ये नव्या कचराकुंड्या उपलब्ध करुन
दिल्या जातील असं ते म्हणाले.
मुंबईतले नागरिक अफरोज शाह
यांच्या नेतृत्वाखाली वर्सोवा इथला समुद्र किनारा नागरिकांनी स्वच्छ केल्याच्या उपक्रमाचं
त्यांनी कौतुक केलं. स्वच्छता अभियानाअंतर्गत जम्मू काश्मीरच्या रियासी ब्लॉक भागात
राबवलेल्या महिलांच्या मशाल यात्रा उपक्रमाचंही त्यांनी कौतुक केलं. आपल्या सरकारनं
तीन वर्षांचा कालावधी पूर्ण केला आहे. यादरम्यान केलेल्या कामांसाठी प्रशंसेबरोबरच
टीका, समीक्षा आणि त्रुटी किंवा चुका दाखवण्याचं काम केल्याबद्दल प्रसार माध्यमं आणि
सोशल मीडियाचे त्यांनी आभार मानले. जनहितासाठी अशी टीका करणं हे निकोप लोकशाहीचं आणि
जागरुक देशाचं प्रतीक असल्याचं ते म्हणाले.
मन की बात या कार्यक्रमाच्या
माध्यमातून आपण देशातल्या प्रत्येक कुटुंबातला एक भाग झालो असल्याचं ते म्हणाले. मन
की बात या कार्यक्रमावर आधारीत एका पुस्तकाचं राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि लोकसभाध्यक्षांच्या
हस्ते प्रकाशन झालं याबाबत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. मन की बात मध्ये चर्चा केलेल्या
विषयांवर आधारीत रेखाटनं – स्केचेस तयार करण्याचं काम स्वतःहून स्वीकारणारे आणि ते
काम विनामोबदला करणारे अबुधाबी इथले कलावंत अकबर साहेब यांचे पंतप्रधानांनी आभार मानले.
****
गेल्या तीन वर्षात थेट लाभ
हस्तांतरण योजनेमुळे ३२ कोटी गरजुंना निधी हस्तांतरीत करण्यात आला असून यात सुमारे
५० हजार कोटी रुपयांची बचत झाली आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत भाजपाध्यक्ष अमित
शहा यांनी आज ही माहिती दिली. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करवसुलीमध्ये अभूतपूर्व वीस
टक्क्यांची वाढ झाली आहे. भारत हा जगातला सर्वाधिक वेगानं प्रगती करणारा देश ठरला असून
महागाईवर व्यापक नियंत्रण मिळवण्यात यश मिळालं असल्याचंही शहा म्हणाले.
****
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ
- सीबीएसईचा बारावीचा निकाल आज जाहीर झाला. यावर्षी ८२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याचं
वृत्त आहे.
आयसीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल
उद्या दुपारी तीन वाजता जाहीर होणार आहे. तर राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या
निकालाची अधिकृत तारीखही उद्या जाहीर होणार आहे.
****
बदलत्या परिस्थितीनुसार शैक्षणिक अभ्यासक्रमाचा दर पाच वर्षांनी आढावा घेणं आवश्यक
असल्याचं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. माहिती आणि
जनसंपर्क महासंचालनालयाच्या ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या
कार्यक्रमात ते आज बोलत होते. महाविद्यालयांना
स्वायत्तता दिल्यास ती अधिक चांगल्या पद्धतीने विकास करु शकतात, असं ते म्हणाले.
****
समाजातली विषमता दूर करुन स्वातंत्र्यवीर
सावरकरांना अभिप्रेत असलेला समाज विचार जपण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न
करावा, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी केलं आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मोत्सावानिमित्त
त्यांचं जन्मगाव भगूर इथं आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या
साहित्य क्षेत्रातल्या योगदानाचा उल्लेख करून, सावरकरांनी मराठी भाषेला समृद्ध करण्याचंही काम केलं, असं ते म्हणाले.
लातूर इथंही स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या
जयंती निमित्त अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलं होतं.
महाराणा प्रताप यांची जयंतीही आज
साजरी होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई इथं त्यांच्या शासकीय निवासस्थानी
महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयात
विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस पुष्पहार
अर्पण करुन अभिवादन केलं.
****
इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांसाठी कला आणि शारीरिक
शिक्षण विषयाच्या तासिका कमी करण्याचं परिपत्रक रद्द करण्याची मागणी राज्य कला आणि
शारीरिक शिक्षक समन्वय समिती आणि सहयोगी शिक्षण संघटनेच्यावतीनं करण्यात आली आहे. यासंदर्भात
संघटनेच्यावतीने उद्या औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात येणार
आहे. हा प्रश्न निकाली काढण्यासाठी आपण लवकरच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेणार
असल्याचं मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी सांगितलं आहे.
****
No comments:
Post a Comment