Thursday, 25 May 2017

AIR NEWS BULLETIN AURANGABAD 25.05.2017 6.50


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date- 25 May 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २५  मे २०१७ सकाळी ६.५०

****

·       शेतकऱ्यांची सर्व तूर खरेदी तसंच मोठ्या प्रमाणात झालेल्या खरेदीची सर्वंकष चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश  

·       उसाच्या किफायतशीर रास्त दरात अडीचशे रुपये प्रतिटन वाढ करण्याचा केंद्रीय मंत्रीमंडळाचा निर्णय

·       सरकारच्या शेती विषयक निर्णयांची शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी आजपासून भारतीय जनता पक्षाच्या राज्यभर शिवार संवाद सभा

आणि

·       सरकारच्या तूर खरेदी नियमांचं पालन करुनच तूर विकल्या राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचा दावा

****

      शेतकऱ्यांची सर्व तूर खरेदी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले, मात्र यामध्ये व्यापाऱ्यांची तूर खरेदी होणार नाही याची दक्षता घेण्याची तसंच मोठ्या प्रमाणात झालेल्या खरेदीची सर्वंकष चौकशी करण्याचे आदेशही त्यांनी यंत्रणेला दिले आहेत. लातूर जिल्ह्यातल्या विविध योजनांचा काल त्यांनी आढावा घेतला, त्यावेळी त्यांनी हे आदेश दिले. चालू महिना अखेरपर्यंत तुरीची खरेदी करण्यात यावी असं सांगत त्यांनी हे आदेश दिले. वजन करण्यासाठीचे काटे आणि मनुष्यबळ वाढवण्याची त्याबरोबरच दोन पाळ्यांमध्ये खरेदी करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. पेरणीचं क्षेत्र आणि उत्पादनाची पडताळणी करताना, जास्तीत जास्त दहा टक्क्यांची सवलत द्या. पण त्यावरही दोषी आढळतील, त्यांना तुरुंगात पाठवण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे, स्वच्छ भारत मिशन, पीक कर्ज पुनर्गठन, प्रधानमंत्री आवास योजना, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, लातूर शहरातील पाणी पुरवठा, गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार अशा विविध महत्त्वाकांक्षी योजनांचा आढावा घेतला. लातूर जिल्हा राज्यातला पहिला बेघरमुक्त जिल्हा करण्याचं आवाहन ही त्यांनी यावेळी केलं.

तत्पूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी काल दिवसभर सोलापूर जिल्ह्याचा दौरा करून विविध कामांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला.

****

उसाच्या किफायतशीर रास्त दरात अर्थात एफ आर पी मध्ये अडीचशे रुपये प्रतिटन वाढ करण्याचा निर्णय काल केंद्रीय मंत्रीमंडळानं घेतला.  या निर्णयामुळे हा दर आता २ हजार ५५० रुपये प्रतिटन असा होणार आहे.

परकीय गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ बरखास्त करायलाही मंत्रीमंडळानं काल मंजुरी दिली. संरक्षण क्षेत्रातल्या खरेदीसाठी तसंच ‘मेक इन इंडिया’ ला अधिक प्रोत्साहन देण्यासाठीच्या नव्या धोरणालाही काल मान्यता मिळाली. या धोरणानुसार लढाऊ विमानं आणि पाणबुड्यांची निर्मिती आता भारतात केली जाणार आहे.

****

यावर्षीच्या एप्रिल आणि मे या दोन महिन्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. यानुसार पिकांचं ३३ टक्क्यांहून जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या निकषांनुसार संबंधित विमा कंपनीकडून मदत मिळणार आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी नसलेल्या शेतकऱ्यांनाही, सहभागी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या रकमेच्या निम्मी रक्कम मिळणार आहे. ही मदत जास्तीत जास्त दोन हेक्टर्ससाठी मिळणार आहे.

****

केंद्र आणि राज्य सरकारनं शेती विकासासाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती शेतकऱ्यांना देण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे आज पासून चार दिवस राज्यभरात शिवार संवाद सभा घेतल्या जाणार आहेत. मुख्यमंत्री, सर्व मंत्री, पक्षाचे पदाधिकारी यांच्यासह भाजपाचे सर्व खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य आणि नगरसेवक असे चार हजार लोकप्रतिनिधी या संवाद मोहिमेत सहभागी होणार आहेत.  आज एकाच दिवशी चार हजार गावांमध्ये सकाळी दोन, आणि  सायंकाळी दोन, अशा चार हजार सभा होणार आहेत. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लातूर जिल्ह्यात तर प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील दानवे उत्तर महाराष्ट्रात नंदूरबार जिल्ह्यात शेतकऱ्यांशी संवाद साधतील.

****

 येत्या नऊ ऑगस्ट ला क्रांती दिनी, मुंबईत मराठा समाजाचा महामोर्चा आयोजित करण्याचा निर्णय काल मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय समन्वय समितीच्या मुंबईत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

मोर्चाच्या आयोजनाबद्दल सहा जून या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाचं औचित्य साधून या दिवशी रायगडावर शपथ घेतली जाणार असल्याचं समन्वय समितीच्या वतीनं सांगण्यात आलं.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारित केलं जात आहे, आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

सरकारच्या तूर खरेदी नियमांचं पालन करुन आपल्या परीवारातल्या सदस्यांनी २७४ क्विंटल तूर विकली असल्याचा खुलासा राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी काल जालना इथा वार्ताहरांशी बोलतांना केला.

यासंदर्भातला पीकपेरा राष्ट्रीय कृषी विपणन महासंघ- नाफेडला दिला असल्याचं सांगून तूरविक्री संदर्भात खोटी यादी आणि आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे, यादी तयार करणाऱ्यांविरुद्ध चौकशी करुन गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलीस अधीक्षकांकडे केली असल्याचं खोतकर यांनी यावेळी सांगितलं.

****

जलयुक्त शिवार अभियानाबरोबरच जुन्या पारंपारिक जलस्त्रोतांच पुनरुज्जीकरन करावं, यामध्ये विहीरी, कालवे, शिवकालीन बंधारे, नद्या यातील पाणीसाठा वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी कृषि तसंच जलसंधारण विभागांना केली. लातूर इथं जलयुक्त शिवार आणि जलसंधारण आढावा बैठकीत काल ते बोलत होते. कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त पाणीसाठे जलस्त्रोताच्या पुर्नरुज्जीवनातून प्राप्त होऊ शकतात, असं ते म्हणाले.

****

लातूर विभागात ‘उन्नत शेती - समृध्द शेतकरी’ अभियानाबाबत आजपासून तंत्रज्ञान प्रसाराची सुरुवात होत आहे, हे अभियान यशस्वीपणे राबवण्याचं आवाहन, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी काल केलं.

कृषि विभागाच्या आढावा बैठकीत काल ते लातूर इथं बोलत होते. ‘उन्नत शेती-समृध्द’ शेतकरी या अभियानांतर्गत प्रमुख पिकांची प्रत्यक्षात प्राप्त होणारी उत्पादकता तसंच पिकांच्या अनुवांशिक उत्पादन क्षमतेतली तफावत कमी करणं तसंच  शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रकमेपेक्षा अधिक आर्थिक उत्पन्न प्राप्त करुन देणं, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना संरक्षित करणं हे या अभियानाचं प्रमुख उद्दिष्ट असल्याचं फुंडकर यांनी यावेळी सांगितलं.

****

जलयुक्त शिवार योजनेतल्या विविध कामामुळे उस्मानाबाद जिल्ह्याची टॅंकर मुक्तीकडे वाटचाल होत असल्याचं प्रतिपादन जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी काल उस्मानाबाद इथं केलं. जिल्ह्यातल्या जलयुक्त शिवार अभियान कामांचा आढावा त्यांनी  घेतला. याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर…..



मागील वर्षी मे महिन्यात उस्मानाबाद जिल्ह्यात ४२५ टॅंकरनं पाणीपुरवठा करावा लागला होता. यावर्षी फक्त पाच टॅंकर सुरु असून जिल्ह्याची टॅंकरमुक्तीच्या दिशेनं वाटचाल सुरु आहे.

चालू वर्षी ‘गाळमुक्त धरण गाळ युक्त शिवार’ ही योजना सुरू केली असून उस्मानाबाद जिल्ह्यातल्या  १०७ तलावातील गाळ काढण्यास सुरूवात करण्यात आली आहे. ३३ लाखांच्या तरतुदीतून निघणाऱ्या या गाळावरची रॉयल्टी शासनानं माफ केली असुन गाळ वाहून नेण्यासाठी १२ रुपये प्रती लिटर इंधन खर्च दिला जात आहे.त्यामुळे  शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होऊन ‘गाळमुक्त धरण गाळ युक्त शिवार’ योजना यशस्वी करण्याचं  आवाहनही  शिंदे यांनी यावेळी केलं.

****

बीड जिल्हा परिषदेसमोर गेल्या १७ दिवसांपासून धरणं आंदोलन करणाऱ्या शिक्षकांनी कालपासून आमरण उपोषण सुरू केलं आहे. संच मान्यतेत अतिरिक्त ठरलेल्या ७४शिक्षकांनी डिसेंबर २०१५ पुर्वीच्या अडीच वर्षाच थकीत वेतन मिळावं या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणं आंदोलन सुरु केलं होतं, प्रशासनान आंदोलनाला प्रतिसाद न दिल्यामुळे या शिक्षकांनी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. 

****

रुग्णांची रक्त मिळवण्यासाठी होणारी धावपळ लक्षात घेत जालना इथल्या जनकल्याण रक्तपेढीनं कुरियर रक्त सेवा अशी योजना सुरू केली आहे.

//*******//

No comments: