Monday, 29 May 2017

AIR NEWS BULLETIN AURANGABAD 29.05.2017 1.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29 MAY 2017

Time - 1.00 to 1.05 pm

Language – Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ मे २०१७ दुपारी १ वा

****

हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेचा कमांडर सबजार अहमद भट्ट लष्करी कारवाईत ठार झाल्यानंतर काश्मीर खोऱ्यात तणाव वाढू नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय योजण्यात आले असून, संपूर्ण खोऱ्यात संचारबंदीसदृश परिस्थिती आहे. काश्मीर खोऱ्यात इंटरनेट सेवा बंद असून, प्रीपेड क्रमांकावर फोन करण्याची सेवाही तुर्तास बंद करण्यात आली आहे. श्रीनगर तसंच पुलवामा, शोपिया, अनंतनाग जिल्ह्यांमध्ये कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शाळा आणि महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली असून, जिथे परीक्षा आहे, तिथल्या विद्यार्थ्यांनाच केवळ ओळखपत्राच्या आधारे संचारबंदी असलेल्या क्षेत्रातून जाण्याची सवलत देण्यात आली आहे.

****

विमुद्रीकरणाचा तडकाफडकी निर्णय घेण्यामागची कारणं, तसंच वस्तुस्थिती स्पष्ट करणं, हे या निर्णयाशी संबंधित असलेल्या प्रत्येक सरकारी विभागाचं कर्तव्य असल्याचं केंद्रीय माहिती आयोगानं म्हटलं आहे. यासंबंधीची माहिती दडवून ठेवल्यामुळे अर्थव्यवस्थेबद्दल गंभीर शंका निर्माण होतील, असं माहिती आयुक्त श्रीधर आचार्युलू यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान कार्यालय, भारतीय रिझर्व्ह बँक तसंच अर्थ मंत्रालयानं, विमुद्रीकरणाची कारणं विचारण्यासाठी माहिती अधिकार कायद्याअंतर्गत करण्यात आलेले अर्ज नाकारल्याच्या पार्श्वभूमीवर, ते वृत्तसंस्थेशी बोलत होते.

****

भारताला संरक्षण क्षेत्रात स्वयंसिद्ध करण्यासाठी सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातली भागीदारी महत्वाची असल्याचं, संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. पुणे इथल्या डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अडव्हान्स टेक्नॉलॉजी - डी आय ए टी या संस्थेच्या नवव्या पदवीप्रदान सोहळ्यात ते बोलत होते. देश संरक्षण क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यासाठी संशोधन आणि उत्पादकता या दोन गोष्टी महत्वाच्या असून, यामध्ये डी आय ए टी या संस्थेची भुमिका महत्वाची असल्याचं ते म्हणाले.

रणगाडे, लढाऊ विमानं, युद्धनौका आणि अन्य संरक्षण साहित्याच्या निर्मितीसाठी, खासगी उद्योगांना परवानगी देण्याचा अधिकार वाणिज्य मंत्रालयाला देण्यात आला आहे. असे परवाने गृह मंत्रालयाच्या देखरेख आणि नियंत्रणाखाली औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभाग जारी करु शकणार आहे.

दरम्यान, केंद्र सरकार लवकरच पक्षानिधी जमा करण्यासाठी वापरण्यात येणार्या रोख्यांचं स्वरुप जाहीर करेल, असं जेटली यांनी सांगितलं आहे. ते बंगळुरु इथं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. रिझर्व्ह बँकेच्या कायद्यात दुरुस्ती करुन हे रोखे आणण्याचा निर्णय सरकारनं घेतला असल्याचं ते म्हणाले.

****

अरुणाचल प्रदेशातल्या घनदाट जंगलात हवाई दलाच्या सुखोई - ३० या विमानाचे काही अवशेष सापडले आहेत. गेल्या मंगळवारी हे विमान तेजपूर परिसरातून बेपत्ता झालं होतं. विमानात असलेल्या दोन वैमानिकांचा अद्याप शोध लागलेला नसल्याचं वायुसेनेचे प्रवक्ते कमांडर अनुपम बॅनर्जी यांनी सांगितलं.

****

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांची आत्मक्लेश यात्रा मुंबईत दाखल झाली आहे. २२ मे रोजी पुण्यातून या यात्रेची सुरूवात झाली होती. या यात्रेनंतर राज्यपालांना भेटून शेतकरी कर्जमाफीसाठी निवेदन देणार असल्याचं राजू शेट्टी यांनी सांगितलं.


****

राज्य सरकारनं राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या धर्तीवर राज्य आपत्ती निवारण पथक उभारण्याचं ठरवलं आहे. त्या अनुषंगानं जून महिन्यात ८२५ जणांचं पथक धुळे इथं तैनात केलं जाणार आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे संचालक राजीव निवटकर यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना ही माहिती दिली. आगामी काळात पुणे इथंही असं पथक तैनात केलं जाणार आहे. या पथकांच्या माध्यमातून अतिवृष्टी, महापूर, तसंच भुस्खलनासारख्या आपत्तींचं निवारण केलं जाणार आहे.

****

भारताच्या सी ए भवानीदेवी हिनं आइसलँड इथल्या रेकजाविक इथं झालेल्या तुरनोई सॅटेलाइट तलवारबाजी स्पर्धेत सायबर प्रकारात सुवर्णपदक जिंकलं आहे. अंतिम फेरीत तीने  ग्रेट ब्रिटनच्या सारा जेन हॅम्पसन हिचा १५-१३ असा पराभव केला.  याबरोबरच भवानीदेवी ही आंतरराष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय बनली आहे.

****

जागतिक टेबल टेनिस स्पर्धा आजपासून जर्मनीच्या डुसेलडॉर्फ इथं सुरु होत आहे. अचंता शरथ याच्या नेतृत्वाखाली आठ भारतीय खेळाडूचा संघ या स्पर्धेत सहभागी झाला आहे.

तर आशियाई ज्यूनियर टेनिस स्पर्धाही आजपासून पुणे इथं सुरु होत आहे. भारतासह ११ देशांचे खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

****

नैॠत्य मोसमी पावसाची आगेकूच दक्षिण केरळच्या काही भागात होण्यासाठी स्थिती अनुकूल असून, गेल्या चोवीस तासात मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडला. येत्या दोन दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे.     

//*******//

No comments: