Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date - 31
May 2017
Time
6.50 AM to 7.00 AM
Language
Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक ३१
मे २०१७ सकाळी ६.५०
****
·
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतीपूरक विविध
निर्णयांवर शिक्कामोर्तब
· समृद्धी महामार्गासंदर्भात येत्या १२ जूनला औरंगाबाद इथं संघर्ष
समितीची बैठक
· नैऋृत्य
मोसमी पाऊस केरळमध्ये दाखल
· बारावीचा निकाल ८९ टक्के, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची ११ जुलैला पुनर्परीक्षा
आणि
· तरुणांनी रोजगाराचा दर उंचावून भारताला महाशक्तीशाली बनवावं
- माजी परराष्ट्र सचिव निरुपमा मेनन राव यांचं आवाहन
****
राज्य मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत शेतीपूरक विविध निर्णयांवर
शिक्कामोर्तब करण्यात आलं. राज्यात शेतमालावर प्रक्रिया प्रकल्प स्थापन करण्यासाठी
मुख्यमंत्री कृषी आणि अन्न प्रक्रिया योजनेला मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली.
नाशवंत शेतमाल प्रक्रिया प्रकल्पांना या योजनेमध्ये प्राधान्य देण्यात येईल. ही
योजना पाच वर्षांसाठी राबवण्यात येणार असून योजनेच्या मूल्यमापन अहवालाच्या
आधारावर ती पुढे चालू ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांना माफक दरात वीज पुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी
योजना राबवण्यासह राज्याच्या नवीन ऊर्जा संरक्षण धोरणाला मंत्रिमंडळाच्या
बैठकीत काल मान्यता देण्यात आली. या धोरणामुळे पुढील पाच वर्षात एक हजार मेगावॅट ऊर्जेची
बचत होईल, अशी अपेक्षा आहे.
शाळांमध्ये शिक्षण
सेवकांची भरती आता ॲप्टीट्यूड अर्थात अभियोग्यता चाचणी तसंच बुद्धिमत्ता चाचणी
परीक्षेच्या आधारे होणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत काल हा निर्णय घेण्यात आला. राज्यातल्या
सर्व व्यवस्थापनांच्या अनुदानित, अनुदानास पात्र ठरलेल्या आणि पात्र घोषित झालेल्या शाळांना
हा निर्णय लागू असेल. यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिक्षण
सेवक भरतीसाठी घेण्यात येणारी केंद्रीय भरतीपूर्व निवड चाचणी परीक्षा रद्द करण्यात
आली आहे.
महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ स्थापन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं
काल घेतला. या मंडळाकडून बहिस्थ विद्यार्थ्यांसाठी पाचवी, आठवी, दहावी आणि बारावी वर्गासाठी
परीक्षा घेण्यात येणार आहेत. यापूर्वी दहावी तसंच बारावी उत्तीर्ण न होऊ शकलेल्यांना
देखील या मुक्त विद्यालयाचा लाभ होणार आहे.
****
एक जूनपासून संपाची हाक देणाऱ्या शेतकऱ्यांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांची काल सकारात्मक चर्चा झाली. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यावेळी उपस्थित
होते. शेतकऱ्यांच्या सर्वच मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचं यावेळी
सांगण्यात आलं.
****
स्वाभिमानी
शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं काल मुंबईत
राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची भेट घेऊन, त्यांना विविध मागण्यांचं निवेदन सादर
केलं. शेतकरी कर्जमाफीसह विविध मागण्यांचा या निवेदनात समावेश आहे. दरम्यान, येत्या
महिनाभरात शेतकरी कर्जमाफीचा निर्णय न घेतल्यास एक जुलैपासून मुंबईसह राज्यभरात सर्व
महानगरांचा दूध तसंच भाजीपाला पुरवठा रोखण्यात येईल, असा इशारा शेट्टी यांनी दिला आहे.
आत्मक्लेश यात्रेच्या समारोप प्रसंगी ते काल मुंबईत बोलत होते.
****
मुंबई - नागपूर नियोजित
समृद्धी महामार्गासंदर्भात येत्या १२ जूनला औरंगाबाद इथं पक्षविरहित संघर्ष समितीची
बैठक घेणार असल्याचं, माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे,
या संदर्भात काल मुंबईत प्रकल्प बाधित शेतकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर ते पत्रकार परिषदेत
बोलत होते. या बैठकीनंतर यासंदर्भात भूमिका ठरवली जाणार असल्याचं पवार यांनी सांगितलं.
****
देशभरातल्या औषध विक्रेत्यांनी काल एक दिवसाचा लाक्षणिक संप
पाळला. ई पोर्टलच्या
माध्यमातून औषधांची विक्री करणं, आणि ऑनलाईन फार्मसी सुरू करण्याबाबत सरकारच्या प्रस्तावाविरोधात
किरकोळ आणि घाऊक औषध विक्रेत्यांनी हा बंद पुकारला होता. या बंदला संमिश्र प्रतिसाद
मिळाला. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या दुकानदारांनी १०० टक्के दुकानं बंद ठेवली होती, औरंगाबाद, जालना, लातूर तसंच परभणी इथं
आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला निवेदन सादर केलं. रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी काही दुकानातून औषधविक्री सुरू
ठेवण्यात आली होती.
****
जागतिक तंबाखू निषेध दिन आज पाळण्यात येत आहे. ‘तंबाखू
: विकासाला धोका’ असं यंदाचं घोषवाक्य आहे. या निमित सर्वत्र विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचं
आयोजन करण्यात आलं आहे. औरंगाबादच्या शासकीय दंत महाविद्यालय आणि रूग्णालयाच्यावतीनं
आज सकाळी दहा वाजता औरंगाबाद रेल्वेस्थानक इथं जनजागृतीपर कार्यक्रम होणार आहे. नांदेड
इथंही तंबाखू विरोधी व्याखानं, पथनाटयं
तसंच प्रभात फेरींचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
नैऋृत्य मोसमी पाऊस काल केरळमध्ये दाखल
झाला. आज तामिळनाडू किनारपट्टीच्या भागातही पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली
आहे. दरम्यान, राज्यातही मोसमी पाऊस वेगानं दाखल होण्याची शक्यता असल्याचं कृषी हवामान
तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी सांगितलं.
दरम्यान, बीड
शहरात काल संध्याकाळी पावसानं हजेरी लावली, त्यामुळे तापमानात काही प्रमाणात घट झाली.
सोसाट्याच्या वाऱ्यासह आलेल्या या पावसात वीजवाहक तारा तुटल्यानं, शहराच्या काही भागातला
विद्युत पुरवठा विस्कळीत झाला होता.
****
हे बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात
आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी २०१७ मध्ये घेण्यात
आलेल्या बारावी परीक्षेत राज्यातून
८९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना नऊ जून रोजी दुपारी
तीन वाजेनंतर आपापल्या महाविद्यालयातून गुणपत्रिका मिळणार आहेत. या परीक्षेत दोन विषयात
अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना फेरपरीक्षा देता येणार आहे. ११ जुलैला ही परीक्षा होणार
असून, एक जूनला या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर होईल. गुण पडताळणीसाठी उद्यापासून तीन
जूनपर्यंत अर्ज करता येतील, असं मंडळाकडून सांगण्यात आलं आहे.
विभागात परभणी जिल्ह्यात सर्वाधिक ९० पूर्णांक ५९ शतांश तर त्या खालोखाल बीड जिल्ह्यात
९० पूर्णांक ४९ शतांश परीक्षार्थी उत्तीर्ण झाले. औरंगाबाद ८९ पूर्णांक ७६, हिंगोली
८८ पूर्णांक ६२ तर जालना जिल्ह्याचा निकाल ८८ पूर्णांक ४९ शतांश लागला आहे.
लातूर विभागाचा निकाल ८८ पूर्णांक २२ शतांश एवढा लागला असून, विभागात लातूर जिल्ह्यातून
सर्वाधिक ८९ टक्के परीक्षार्थी उत्तीर्ण झाले. नांदेड ८८ पूर्णांक ५४ शतांश तर उस्मानाबाद
जिल्ह्याचा ८४ पूर्णांक ३२ शतांश एवढा निकाल लागला. उस्मानाबाद जिल्ह्यात आठ शाळांचा
निकाल शंभर टक्के लागल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
देशातल्या ३५ कोटी तरुणांनी रोजगाराचा दर उंचावून भारताला महाशक्तीशाली बनवावं,
असं आवाहन, माजी परराष्ट्र सचिव निरुपमा मेनन राव यांनी केलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
मराठवाडा विद्यापीठाचा ५७ वा दीक्षांत समारंभ काल राव यांच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी
त्या बोलत होत्या. कुलगुरु डॉक्टर बी.ए.चोपडे अध्यक्षस्थानी होते. भारतरत्न
डॉक्टर बाबासाहेब
आंबेडकर यांनी ‘मिलिंद’ची स्थापना केल्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत राव यांनी या विद्यापीठाची
माजी विद्यार्थी असल्याचा अभिमान असल्याचं नमूद केलं. यावेळी साडे चारशे संशोधक विद्यार्थ्यांसह
विविध अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना पदवी तसंच पदव्युत्तर पदवी प्रदान करण्यात आल्या.
****
जालना जिल्ह्यातल्या
डोंगर सेवली इथं मार्च २००८ मध्ये झालेल्या दंगलीतल्या २१ दोषींना काल जिल्हा सत्र
न्यायालयानं शिक्षा सुनावली. या आरोपींपैकी एकास जन्मठेप, तिघांना दहा वर्षे आणि उर्वरित सतरा जणांना एक वर्षे कारावासाची शिक्षा सुनावण्यात
आली आहे. या दंगलीत दोघांचा मृत्यू झाला होता तर, काही जण जखमी झाले होते. दुकानं,
वाहनं आणि इतर मालमत्तेचंही मोठं नुकसान झालं होतं.
****
बनावट परीक्षार्थी प्रकरणी परभणी इथल्या वसंतराव नाईक कृषी विद्यापीठातील
सहाय्यक कक्ष अधिकारी अरविंद टाकळकर
याला गुन्हे अन्वेषण विभागानं काल जालना इथून अटक
केली. टाकळकर यानं सात जाणांच्या नावानं परीक्षा दिल्याचं उघडकीस आलं आहे. या प्रकरणातील
मुख्य आरोपी
प्रमोद राठेडसह टाकळकर याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
****
वृक्ष लागवड आणि संवर्धनासाठी चळवळ उभारणं आवश्यक असल्याचं मत,
वनस्पती शास्त्राचे अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर एस. आर. यादव यांनी व्यक्त केलं आहे.
लातूर इथं आयोजित सहाव्या अखिल भारतीय संत साहित्य संमेलानात वृक्षारोपण या विषयावरील
परिसंवादात ते काल बोलत होते. प्रत्येकाने
आयुष्यात किमान एक तरी वृक्ष लावून त्याचं संवर्धन करायला हवं असं आवाहन डॉक्टर यादव
यांनी यावेळी केलं.
//******//
No comments:
Post a Comment