Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 31
MAY 2017
Time - 1.00
to 1.05 pm
Language
– Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक ३१
मे २०१७ दुपारी १ वा
****
अफगाणिस्तानची
राजधानी काबूल इथं आज सकाळी झालेल्या शक्तीशाली आत्मघातकी बाँबस्फोटात किमान पन्नास
जण मृत्यूमुखी पडल्याची शक्यता असल्याचं वृत्त आहे. भारतीय दूतावासाजवळ हा स्फोट झाला.
दूतावासातले भारतीय कर्मचारी सुखरूप असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून सांगण्यात
आलं आहे. या हल्ल्याची जबाबदारी अजूनपर्यंत कोणी स्वीकारलेली नाही.
****
पंतप्रधान नरेंद्र
मोदी चार देशांच्या आपल्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात काल रात्री स्पेनच्या माद्रिद
इथे पोहोचले. दोन दिवसांच्या स्पेन भेटीमध्ये पंतप्रधान स्पेनच्या राष्टृापतींची भेट
घेणार असून तिथल्या उद्योजकांशी संवाद साधत त्यांना ‘मेक इन इंडिया’ अभियानात सहभागी
होण्यासाठी प्रोत्साहीत करणार आहेत. भारतीय पंतप्रधानांनी स्पेनला भेट देण्याची ही
गेल्या सुमारे तीन दशकांमधली पहिलीच वेळ आहे.
****
भारतीय नौदलानं
बांगलादेशातल्या एका मोठ्या मदत मोहिमेमध्ये सत्तावीस जणांना वाचवलं आहे. ‘मोरा’ चक्रीवादळामुळे
हे लोक समुद्रात अडकले होते. नौदलाची ही मदतमोहीम सुरूच असून, या मदतकार्यामध्ये तिथल्या
प्रतिकूल हवामानामुळे अडथळे येत असल्याचं नौदलाच्या प्रवक्त्यानं सांगितलं. बांगलादेशात
काल धडकलेल्या या चक्रीवादळानं मोठा विध्वंस केला आहे.
****
कत्तलीच्या उद्देशानं
जनावरांच्या बाजारांच्या माध्यमातून होणाऱ्या जनावरांच्या खरेदी विक्रीवर बंदी घालण्याच्या
केंद्र सरकारच्या निर्णयाला काही राज्यं आणि संघटनांकडून विरोध होत असून, सरकार या
विरोधाचा आढावा घेत आहे, असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री एम.व्यंकय्या नायडू यांनी केलं
आहे. पशुंबाबत होणारी क्रूरता आणि त्यांची तस्करी रोखण्याबाबत सर्वोच्च न्यायालयानं
केलेल्या सूचनेमुळेच बंदीचा हा निर्णय केंद्रसरकारनं घेतला आहे, असंही नायडू यांनी
स्पष्ट केलं.
****
मागासवर्गीयांसाठी
नवीन राष्ट्रीय आयोग स्थापन करणार असल्याची घोषणा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद
गेहलोत यांनी केली आहे. सामाजिक न्याय विभागाच्या ३ वर्षांच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी
आयोजित पत्रकार परिषदेत ते काल नवी दिल्लीत बोलत होते. या आयोगाकडे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्टया
मागासवर्गीय असलेल्यांच्या तक्रारी नोंदवता येतील.
****
पर्यटन व्यवसायाचा
जागतिक वृद्धी दर सुमारे साडेचार टक्के असताना भारतातल्या या व्यवसायाचा वृद्धी दर
पंधरा पूर्णांक चार टक्के इतका नोंदला गेल्याची माहिती केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन
राज्यमंत्री महेश शर्मा यांनी दिली आहे. ते काल तिरुचिरापल्ली इथे पत्रकारांशी बोलत
होते. देशामध्ये पर्यटन व्यवसायातलं उत्पन्न एक लाख छप्पन्न हजार कोटी रुपयांपर्यंत
पोहोचल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं.
****
हिज्बूल मुजाहिदीन
संघटनेचा अतिरेकी सबजार बट्ट सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत मारला गेल्यानंतर काश्मीर
मध्ये आज तीन दिवसांनी स्थिती सामान्य झाल्याचं वृत्त आहे.काश्मीर मध्ये लावलेले निर्बंध
आज हटवण्यात आले आहेत. सरकारी परिवहन सेवाही सुरू करण्यात आली आहे.
****
राज्यातल्या
गरीब आणि अल्पसंख्यांक समाजातल्या लोकांसाठी शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या योजनांची
माहिती तळागाळातल्या लोकांना मिळावी आणि त्यांना त्या योजनांचा लाभ घेता यावा यादृष्टीनं
सामाजिक न्याय आणि अल्पसंख्यांक विभागातर्फे सन्मान संवाद रथयात्रेचं आयोजन करण्यात
आलं आहे. ही यात्रा मुंबईतून सुरू झाली. राज्यातल्या खेड्यांमधल्या लोकांना या यात्रेद्वारे
शासनाच्या योजनांची माहिती देण्यात येणार आहे. या योजनेची सांगता पुण्यात होणार आहे.
****
जागतिक तंबाखू
निषेध दिनाच्या औचित्यानं औरंगाबादच्या जिल्हा रुग्णालयाच्या वतीनं येता आठवडाभर विविध
जनजागृती कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. यामध्ये आज जिल्हा रुग्णालयातर्फे औरंगाबादच्या
मध्यवर्ती बसस्थानकावर कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळा आणि पोस्टर प्रदर्शनाचं आयोजन करण्यात
आलं आहे,तर उद्या रेल्वेस्थानकावर पोस्टर प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. यावर्षीचं
या दिनाचं घोषवाक्य : ‘तंबाखू - आपणा सर्वांसाठीच धोका’ असं आहे.
****
सिंधुदुर्ग जिल्ह्यात
मान्सुनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्याचं वृत्त आहे. जिल्ह्यात सगळीकडेच पावसाची
संततधार सुरू असून वादळी वारे आणि वीजांच्या लखलखाटासह जोरदार पाऊस पडत आहे. पावसामुळे
वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment