Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date- 24
May 2017
Time
6.50 AM to 7.00 AM
Language
Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक २४
मे २०१७ सकाळी ६.५०
****
·
जम्मू काश्मीरमधल्या नौशेरा सीमा
रेषेजवळच्या पाकिस्तानी लष्कराच्या चौक्या भारताकडून उद्ध्वस्त
·
भिवंडी,
मालेगाव आणि पनवेल या तीन महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी आज मतदान
·
वस्त्रोद्योग
राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि त्यांच्या कुटुंबियांच्या ३७७ क्विंटल तूर खरेदीची उच्चस्तरीय
चौकशी करण्याची काँग्रेसची मागणी
आणि
·
मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस आजपासून दोन दिवस लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर
****
भारतीय
सैन्यानं जम्मू काश्मीरमध्ये नौशेरा सेक्टरमधल्या नियंत्रण रेषेजवळच्या पाकिस्तानी
लष्कराच्या चौक्या उद्ध्वस्त केल्या आहेत. मेजर जनरल अशोक नरुला यांनी वार्ताहर परिषदेत
काल ही माहिती दिली. नऊ मे रोजी केलेल्या या कारवाईचा व्हिडीओही त्यांनी सार्वजनिक
केला आहे. उन्हाळ्यामुळे या ठिकाणी बर्फ वितळत
असल्यानं पाकिस्तानकडून घुसखोरी आणि हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत, या पार्श्वभूमीवर
ही कारवाई करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
पाकिस्तानी
लष्कराकडून सशस्र घुसखोरांना
मदत केली जात असून यात निष्पाप नागरिकांचे बळी जातात,
त्यामुळे अशी घुसखोरी रोखण्यासाठीचा एक भाग म्हणून नियंत्रण रेषेवर संपूर्ण वर्चस्व
प्रस्थापित केलं जात आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
****
ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानं निकाह लावणाऱ्या
काझींना घटस्फोट देण्यासाठी तिहेरी तलाकचा वापर न करण्याचे निर्देश दिले आहेत. तिहेरी
तलाक संबंधी पाच न्यायाधीशांच्या घटनापीठानं घेतलेली सहा दिवसांची विशेष सुनावणी संपून
निकाल राखून ठेवला गेल्यानंतर, पर्सनल लॉ बोर्डाचे सचिव मोहम्मद फजलुर्रहीम यांनी न्यायालयात
एक नवं प्रतिज्ञापत्र सादर केलं. सुनावणीच्या वेळी जी चर्चा झाली त्या अनुषंगानं, आता
आम्ही विवाहित दाम्पत्ये आणि ‘निकाह’ लावणारे काझी यांच्यासाठी नवी मार्गदर्शिका जारी
केल्याचं या प्रतिज्ञापत्रात बोर्डानं नमूद केलं आहे.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी येत्या २८ मे रोजी आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी
संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ३२वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या
सूचना आणि विचार एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या नि:शुल्क क्रमांकावर,
तसंच माय जी ओ व्ही ओपन फोरम वर किंवा नरेंद्र मोदी ॲप वर नोंदवण्याचं आवाहन करण्यात
आलं आहे.
****
भिवंडी, मालेगाव आणि पनवेल या तीन महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी
आज मतदान होत आहे. या तीन शहरांमध्ये मिळून एक हजार दोनशे एकावन्न उमेदवार निवडणूक
रिंगणात आहेत. पनवेल महानगरपालिका गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये अस्तित्वात आली. त्यानंतर
तिथं पहिल्यांदाच निवडणूक होत आहे. भिवंडी-निजामपूर महापालिकेमध्ये सध्या काँग्रेस
नेतृत्वाखालील आघाडीचं सरकार आहे. तर मालेगावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि ए आय
एम आय एम आघाडी सत्तेत आहे. या शहरांमध्ये एकूण १२ लाख ९६ हजार पात्र मतदार आहेत. २६
मे रोजी निकाल जाहीर होणार आहे.
****
पात्र रुग्णालयांचं कामगार विमा योजनेकडे त्वरीत हस्तांतरण
करण्याचे निर्देश आरोग्य मंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी राज्य कामगार विमा महामंडळाला
दिले आहेत. कामगार विमा योजनेच्या आढावा बैठकीत काल ते मुंबईत बोलत होते. या बैठकीस
उपस्थित असलेले औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी औरंगाबाद शहराजवळ चिकलठाणा
इथं उभारण्यात आलेलं रुग्णालय राज्य कामगार विमा योजनेंतर्गत चालविण्यात यावं, याचबरोबर
वाळूज, रांजणगाव, पैठण, शेंद्रा या ठिकाणी राज्य कामगार विमा सेवा दवाखाना सुरु करण्यात
यावा अशी मागणी केली.
****
राज्याचे वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जून खोतकर आणि त्यांच्या
कुटुंबियांची ३७७ क्विंटल तूर कशी खरेदी केली जाते असा सवाल करत या प्रकरणाच्या उच्चस्तरीय
चौकशीची मागणी प्रदेश काँग्रेस समितीनं केली आहे. संपूर्ण जालना जिल्ह्यात अंदाजे साडेचार
लाख टन तुरीचं उत्पादन झालं असून त्यातली एक लाख टनापेक्षा जास्त तूर केवळ आठशे लोकांनी
विकली आहे हे लक्षात आल्यावर तूर खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसनं केला. त्यानंतर
झालेल्या चौकशीत ही माहिती उघड झाल्यानं काँग्रेसनं याबाबत चौकशीची मागणी केली आहे.
****
हे
बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र
न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजपासून दोन दिवसाच्या लातूर
जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. लातूर जिल्ह्यात राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांचा
आज ते आढावा घेतील, उद्या निलंगा आणि औसा तालुक्यातल्या
काही गावांना भेट देऊन विकास कामांची पाहणी करतील.
****
सद्यस्थितीत मागासवर्गीय आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा
धोका नसल्याचं आश्वासन, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिलं
आहे. ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते. राज्याचे माहिती आयुक्त रत्नाकर
गायकवाड यांना मारहाणीची भूमिका चुकीची असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं. आगामी शैक्षणिक
वर्षात विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती नोंदणीकरता विलंब न होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही
ते यावेळी म्हणाले.
दरम्यान,
पैठण तालुक्यातल्या मुधळवाडी इथं
उभारण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या
पुतळ्याचं अनावरण आठवले यांच्या हस्ते
काल झालं.
****
औरंगाबाद इथं काल दारुविरोधी मोहिमे अंतर्गत नशामुक्त
औरंगाबाद, मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. आमदार इम्तियाज जलील यांच्या पुढाकारानं
आयोजित या कार्यक्रमात दारुच्या व्यसनामुळे होत असलेल्या दुष्परिणामांवर आणि दारुबंदी
यावर चर्चा करण्यात आली. दारुविक्रीचं दुकान बंद करण्यासाठीचे नियम, त्यासंबंधी मतदान
आणि सह्या घेण्याची पध्दती, तांत्रिक बाबी - त्रुटी, संबंधीत कायदे याबाबत मार्गदर्शन
करण्यात आलं. दारुमुळे कुटुंबांचं आणि समाजाचं होणारं नुकसान, तरुण पिढीचा होणारा ऱ्हास
विचारात घेऊन ही मोहिम सुरु केल्याचं आमदार जलील म्हणाले.
****
नांदेड जिल्ह्यात उन्नत शेती- समृद्ध शेतकरी पंधरवाडा उद्यापासून
येत्या आठ जूनपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. काल नांदेड इथं जिल्हाधिकारी
कार्यालयात यासंदर्भात जिल्हाधिकारी
अरूण डोंगरे यांनी आढावा बैठक घेतली. या पंधरवाड्यात पिकांची सरासरी उत्पादकता आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी विविध योजनांची
माहिती शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.
****
लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यातल्या वैरागड इथल्या
ग्रामस्थांनी काल जलयुक्त शिवार योजनेच्या कामामध्ये सहभागी होत श्रमदान केलं. समतल
चर खोदणी, बांध घालणं आदी कामं यावेळी करण्यात आली.
****
लातूर जिल्ह्यातल्या रामेश्वर रूई इथं काल प्रयागअक्का
कराड समर्पित जीवनगौरव पुरस्कारांचं वितरण वैज्ञानिक डॉक्टर जय गोरे यांच्या हस्ते
करण्यात आलं. विविध क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्या महिलांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात
आलं.
****
लोकप्रतिनिधींनी
शासनाच्या कल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचं आवाहन पाणी पुरवठा मंत्री बबनराव
लोणीकर यांनी केलं आहे. परभणी इथं भारतीय जनता पक्षाच्या शिवार संवाद विस्तारक कार्यक्रमात
ते काल बोलत होते. विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून समाजातल्या सर्वच घटकांच्या
विकासाचं उद्दिष्ट पूर्ण करणं सहज शक्य असल्याचंही ते यावेळी म्हणाले.
****
लातूर
जिल्ह्यातल्या रेणापूर नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आणि औसा नगर परिषदेतल्या
प्रभाग क्रमांक -दहा अ मधल्या पोटनिवडणूकीसाठी आज मतदान होणार आहे. त्यामुळे या मतदान
क्षेत्रात आज सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
****
अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेचं धान्य ई-पॉस मशीनद्वारे
वितरीत न केल्यामुळे जालना जिल्ह्यातल्या ८ रास्तभाव दुकानदारांचं प्राधिकार पत्र निलंबित
करण्यात आलं असल्याची माहिती जालन्याच्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी काल दिली. या
दुकानांमध्ये अनियमितताही आढळून आली असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
मराठवाड्यातल्या
सर्व बँकांनी आगामी खरीप हंगामासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करुन
द्यावं, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी दिल्या आहेत. खरीप हंगामाच्या
पीक कर्ज वाटपाचा त्यांनी आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते.
आठही जिल्ह्यातल्या
सर्व बॅंकानी त्यांच्या खरीप पीक कर्ज वाटपाचा लक्ष्यांक जुलै अखेरपर्यंत पूर्ण करावा,
असं ते म्हणाले.
****
कौटुंबिक
न्यायालय ही समाज स्वास्थ टिकवणारी न्यायसंस्था असून, समाजाच्या सशक्त बांधणीत कौटुंबिक
न्यायालयाची भूमिका महत्वपूर्ण असल्याचं प्रतिपादन औरंगाबादचे जिल्हाधिकारी नवल किशोर
राम यांनी केलं आहे. औरंगाबाद कौटुंबिक न्यायालय इथल्या मोबाईल कॉम्पॅक्टरचं काल त्यांच्या
हस्ते उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. कौटुंबिक न्यायालयातल्या नोंदी अद्यावत
ठेवण्यासाठी मोबाईल कॉम्पॅक्टर ही यंत्रणा सहाय्यक ठरेल असं ते म्हणाले.
****
No comments:
Post a Comment