Tuesday, 23 May 2017

AIR NEWS BULLETIN AURANGABAD 23.05.2017 10.00


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२३ मे २०१७ सकाळी १०.०० वाजता

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातमधल्या गांधीनगर इथं होणाऱ्या आफ्रीकी विकास बँकेच्या बैठकीत सहभागी झाले आहेत. आफ्रीकेत संपत्ती निर्मितीसाठी कृषी क्षेत्रात परिवर्तन हा या वार्षिक बैठकीचा विषय आहे. थोड्याच वेळात पंतप्रधान या बैठकीला संबोधित करणार आहेत.

****

इंग्लडमधल्या मँचेस्टरमध्ये सुरु असलेल्या एका कार्यक्रमादरम्यान काल रात्री भीषण बॉम्बस्फोट झाला. यात १९ जणांचा मृत्यू झाला असून ५० हून अधीक जण जखमी असल्याचं पोलिसांनी सांगितलं. प्राथमिक माहितीनुसार हा दहशतवादी हल्ला असल्याचं समजतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. अशा परिस्थितीत भारत इंग्लंडसोबत असल्याचं त्यांनी ट्विटरवरील आपल्या संदेशात म्हटलं आहे.

****

मेंढी पालनाच्या व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी राज्यस्तरीय योजनेंतर्गत सहा मुख्य घटकांसह, ‘राजे यशवंतराव होळकर महामेष’ ही नवीन योजना राबवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या योजनेसाठी लागणाऱ्या ४६ कोटी २७ लाख रुपयांच्या खर्चासही मान्यता देण्यात आली.

****

शास्त्रीय कला, चित्रकला, लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांना यंदापासून २५ गुणांपर्यंत वाढीव गुण मिळणार असल्याचं, महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या विभागीय परीक्षा सचिव, वंदना वाहूळ यांनी सांगितलं. यापूर्वीच्या निर्णयाप्रमाणे मार्च २०१८ पासून हे सवलतीचे गुण मिळणार होते. संबधीत शाळांचे प्रस्ताव २७ मे पर्यंत स्वीकारण्यात येणार असल्याचं,  प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवण्यात आलं आहे.

//*******//

No comments: