आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२७ मे
२०१७ सकाळी १०.०० वाजता
****
जम्मू काश्मीरमधल्या रामपूर
सेक्टरमध्ये आज सकाळी भारतीय जवानांनी दहशतवाद्यांचा
घुसखोरीचा कट उधळून लावला आहे. यावेळी झालेल्या चकमकीत चार दहशतवादी ठार झाले. या परिसरात
सध्या शोधमोहीम सुरू असून, तीन दहशतवाद्यांना पकडण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात
म्हटलं आहे.
****
पंजाबचे माजी पोलिस महासंचालक के पी एस गिल यांचं काल दिल्ली इथं निधन झालं,
ते ८२ वर्षांचे होते. गिल हे दोन वेळा पंजाबचे पोलिस महासंचालक होते. भारतीय हॉकी महासंघाचं
अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं. नागरी सेवेतल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना १९८९
साली पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. पंजाबमध्ये दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी
त्यांचं मोठं योगदान होतं.
****
राज्यातल्या शून्य ते अठरा या वयोगटातल्या बालकांच्या
आधार नोंदणीचं काम पूर्ण करण्यासाठी तीन हजार ६०० अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि ५०० ग्रामीण
रुग्णालयांना जून महिन्या अखेर ‘टॅब’ देण्यात येणार आहेत. मुख्य सचिव सुमित मलिक
यांनी आज मुंबई इथं ही माहिती दिली. त्यांनी राज्यातले विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
आणि महापालिका आयुक्तांशी दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे संवाद साधून, विविध कामांचा आढावा घेतला. ग्रामीण रुग्णालयात आता जन्मताच बालकांच्या आधार
नोंदणीचं काम सुरू होणार असल्याचं ते म्हणाले.
****
जालना जिल्ह्यात काही ठिकाणी फळबागांवर किडीचा प्रादुर्भाव
झाला असल्यानं, कृषि विभागाकडून शेतकऱ्यांना थेट बांदावर जावून किड आणि रोग व्यवस्थापना
संदर्भात मार्गदर्शन करण्यात येत आहे. आज अंबड तालुक्यातल्या धनगरपिंप्री आणि परिसरातील
शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून सेंद्रीय खताचा आणि शेणखताचा वापर करण्याचं आवाहन कृषि
विभागाचे अधिकारी अशोक सव्वासे यांनी केलं आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यामध्ये काल वादळी पाऊस झाला. पारनेर तालुक्यात
वीज पडल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. पाथर्डी, श्रीगोंदिया आणि लोणी या तालुक्यांमध्येही
मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून काही ठिकाणी पिकांचं नुकसान झालं आहे.
****
No comments:
Post a Comment