Sunday, 28 May 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 28.05.2017 - 10.00


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२८ मे २०१७ सकाळी १०.०० वाजता

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा बत्तीसावा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****

तोट्यात असणाऱ्या एअर इंडिया या हवाई वाहतूक कंपनीबाबतच्या निर्गुंतवणूक प्रस्तावाला केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अनुकूलता दर्शवली आहे. दूरदर्शन वाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीत ते बोलत होते. कंपनीवर सध्या ५० हजार कोटी रुपयांचं कर्ज असून, तिचा बाजारपेठेतला हिस्सा केवळ १४ टक्के आहे. सरकारनं दिलेल्या निधीवर काम सुरु ठेवणारी एअर इंडिया कंपनी गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न करत आहे.

****

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज जयंती. यानिमित्त नाशिक जिल्ह्यातल्या भगूर या सावरकर यांच्या जन्मगावी आयोजित जन्मोत्सवाचं उद्घाटन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. सावरकर जन्मोत्सव समितीनं आयोजित केलेल्या या कार्यक्रमात सावरकरांच्या साहित्य आणि छायाचित्रांचं प्रदर्शन असे विविध कार्यक्रम होणार आहेत. सायंकाळी होणाऱ्या समारोप सोहळ्यास शालेय शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे उपस्थित राहणार आहेत.

****

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतील कर्मचाऱ्यांचं अनिवार्य अंशदान १२ टक्केच राहणार आहे. केंद्रीय श्रम मंत्री बंडारु दत्तात्रय यांच्या अध्यक्षतेखाली पुणे इथं झालेल्या संघटनेच्या विश्वस्त समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. हे अंशदान १२ वरुन दहा टक्के करण्याचा निर्णय प्रस्तावित होता. मात्र कामगार संघटना आणि उद्योजक प्रतिनिधींनी त्याला विरोध केला. याबाबत अंतिम निर्णय केंद्र सरकारच घेईल, असं दत्तात्रय यांनी स्पष्ट केलं आहे.

****

No comments: