Tuesday, 23 May 2017

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 23.05.2017 6.50


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date- 23 May 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २३  मे २०१७ सकाळी ६.५०

****

·       वस्तु आणि सेवा कराशी संबंधित सर्व विधेयकांना विधी मंडळाची मंजुरी

·       विद्युत मनोऱ्यांसाठी संपादित जमिनीचा मोबदला दुप्पट करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

·       लातूरच्या महापौरपदी भारतीय जनता पक्षाचे सुरेश पवार तर उपमहापौरपदी देविदास काळे यांची निवड

आणि

·       परभणी - मिरखेल स्थानकादरम्यानच्या दुहेरीकरणाच्या कामामुळे उद्यापासून काही रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल, दोन प्रवासी रेल्वे गाड्या रद्द



****

महाराष्ट्र वस्तु आणि सेवा कर मुख्य विधेयकासह तीन विधेयकं काल विधानसभेत एकमतानं मंजूर झाली. यासाठी राज्य विधीमंडळाचं तीन दिवसीय विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं होतं. शनिवार आणि रविवारी या विधेयकार चर्चा झाली. त्याला काल अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तर दिलं. जीएसटी मुळे महागाई कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जगात १०७ पेक्षा जास्त देशांमध्ये जीएसटी कायदा लागू असल्याचं त्यांनी सभागृहाला सांगितलं. विधान परिषदेत परवाच हे विधेयक मंजूर झालं होतं,

जीएसटी विधेयक विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाचे आभार मानले. मूल्याधारित कर - व्हॅट प्रणालीमध्ये जेवढं उत्पन्न मिळालं, तेवढं उत्पन्न जीएसटी मधूनही राज्याला मिळणार असून, नुकसान भरपाईही मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं. महानगरपालिकांचीही आर्थिक स्वायतत्ता राखण्यात येणार असून, महानगरपालिकांना नुकसान भरपाई देणारं, महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य असल्याचं ते म्हणाले. येत्या एक जुलैपासून हा कर देशात सर्वत्र लागू होणार आहे.

****

राज्यातल्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर महापारेषणनं ६६ के.व्ही., ते १२०० के.व्ही.चे विद्युत मनोरे उभारल्यास, संबंधित शेतकऱ्यांना व्याप्त जागेच्या क्षेत्रफळाच्या दुप्पट मोबदला देण्यात येणार आहे. यासंबंधीच्या सुधारीत धोरणाला मंत्रीमंडळानं काल मान्यता दिली, असल्याचं ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं.

या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मनोऱ्यानं व्याप्त जमिनीच्या त्या-त्या भागातल्या रेडीरेकनर प्रमाणे होणाऱ्या मूल्यांकनाच्या दुप्पट मोबदला मिळणार आहे. तसंच विद्युत वाहिन्यांखालील जमिनीचा मोबदला ही मिळणार आहे. शहरी भागात अतिउच्च दाब मनोऱ्यानं व्याप्त वाहिनीच्या खालील जमिनीचा मोबदला ठरवण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात येईल असं, बावनकुळे यांनी सांगितलं. मात्र जुन्या मनोऱ्यांना हा निर्णय लागू असणार नाही, असं ते म्हणाले.

अटल सौर कृषी पंप योजनेंतर्गत राज्यात,हजार ४६० सौर कृषी पंपांची उभारणी करण्यासदेखील मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसह मराठवाड्यातल्या उस्मानाबाद, हिंगोली, जालना या जिल्ह्यांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे.

मेंढी पालनाच्या व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी, राज्यस्तरीय योजनेंतर्गत सहा मुख्य घटकांसह, ‘राजे यशवंतराव होळकर महामेष’ ही नवीन योजना राबवण्याचा निर्णयही कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या योजनेसाठी लागणाऱ्या ४६ कोटी, २७ लाख रुपयांच्या खर्चासही मान्यता देण्यात आली आहे.

****

मराठवाडा विभागासाठी ग्रीड पद्धतीनं पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाणी आरक्षणाला तत्वत: मान्यता दिली असल्याचं, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं. यासंबधीच्या एका बैठकीत ते काल मुंबईत  बोलत होते. मराठवाड्यामध्ये वारंवार उद्भवणाऱ्या टंचाई परिस्थितीचा सामना करण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपाच्या उपाययोजना न करता, कायमस्वरुपी उपाययोजना करण्यावर भर देण्यात यावा, असं, पाणी पुरवठा मंत्री, बबनराव लोणीकर यांनी यावेळी सांगितलं.

****

सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागानं, राज्यातल्या सहा संस्थांना शाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या, १२५ व्यक्तींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. उद्या कोल्हापूर इथं या पुरस्कारांचं वितरण करण्यात येणार आहे. त्यात औरंगाबादच्या डॉक्टर हेडगेवार रूग्णालयाचा समावेश आहे.  १५ लाख रूपये, आणि स्मृतीचिन्ह असं या पुरस्कारांचं स्वरूप आहे.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज उत्थान पुरस्कारासाठी निवड केलेल्या १२५ व्यक्तींमध्ये,  जालना   जिल्ह्यातून  चार, औरंगाबाद जिल्ह्यातून तीन, लातूर, नांदेड  जिल्ह्यातून प्रत्येकी दोन, बीड जिल्ह्यातल्या एकाचा समावेश आहे. २५ हजार रूपये, शाल, आणि श्रीफळ, असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.

****

लातूर महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुरेश पवार यांची महापौरपदी निवड झाली आहे. त्यांनी काँग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे यांचा दोन मतांनी पराभव केला. पवार यांना ३६, तर गोजमगुंडे यांना ३४ मतं मिळाली. तर उपमहापौरपदी भाजपचे देविदास काळे यांची निवड झाली आहे. काळे यांना ३६ तर काँग्रेसचे उमेदवार युनुस मोमीन यांना ३४ मतं मिळाली.

लातूर शहरातली पाण्याची दुरावस्था कमी करण्याचा प्रयत्न करणार असून, पारदर्शी कामकाजावर भर देणार असल्याचं महापौर पवार यांनी महापौर पदाच्या निवडणुकीनंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. सभागृह नेतेपदी शैलेश गोजमगुंडे यांची तर विरोधीपक्ष नेतेपदी दिपक सुळ यांची निवड करण्यात आली.

****

हे बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

परभणी ते मिरखेल रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचं काम सुरु असल्यामुळे उद्या २४ मे पासून पाच जूनपर्यंत  काही गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे तर काही गाड्या पूर्णत: तसंच  अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत. परळी ते पूर्णा आणि पूर्णा ते परळी ही रेल्वे गाडी रद्द करण्यात आली आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी नांदेड ते पनवेल या रेल्वे गाडीला गंगाखेड स्थानकावर तात्पुरता थांबा देण्यात आला आहे. याशिवाय नांदेड ते औरंगाबाद साप्ताहिक एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. हैद्राबाद ते परभणी, परभणी ते नांदेड, मनमाड ते काचीगुडा, काचीगुडा ते मनमाड, नगरसोल-नांदेड या गाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत. अमृतसर ते नांदेड धावणारी जलदगती गाडी, अंकाई ते परभणी दरम्यान ६५ मिनिटं, नरसापूर ते नगरसोल जलदगती गाडी, परभणी स्थानकावर आठ मिनिटं तर नांदेड निजामाबाद प्रवासी गाडी नांदेड स्थानकावरुन ६० मिनिटं उशिरा धावेल असं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातर्फे कळवण्यात आलं आहे.

****

महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या माथेफिरूस अटक करावी, तसंच, या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी काल बीड जिल्ह्यात बंद पाळण्यात आला. या बंदच्या काळात बीड शहरातल्या काही भागात आंदोलकांनी दुकानावर दगडफेक देखील केली, यात एक जण जखमी झाल्याचं वृत्त आहे.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड शहरात साफ सफाई होत नसल्याचा आक्षेप घेत, कन्नडच्या नगराध्यक्ष, स्वाती कोल्हे यांना काल शिवीगाळ करून, त्यांच्यावर फावडं उगारण्यात आलं. नगरपालिका स्थायी  समितीच्या बैठकीत हा प्रकार घडला. या प्रकरणी दोन नगरसेवकांसह १०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर शहरात काही काळ तणाव पूर्ण वातावरण झालं होतं.

****

लातूर इथं, शासकीय तूर खरेदी केंद्रावर तुरीचं तीन तीन दिवस माप केलं जात नाही, तुरीची वाहनं आत घेतली जात नाहीत, असे आरोप करत, संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी काल दुपारी रास्ता रोको आंदोलन केलं. त्यानंतर बाजार समितीचे सचिव केंद्रावर आले, आणि त्यांनी शेतकऱ्यांना शांत रहाण्याचं आवाहन केल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतलं.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं, २१ पैकी १९ जागा जिंकून कारखान्यावर सत्ता मिळवली आहे. त्यांचे सहा उमेदवार निवडणुकीपूर्वीच बिनविरोध निवडून आले होते. कॉंग्रेसला केवळ दोन जागांवर समाधान मानावं लागलं. औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड, फुलंब्री, तर जालना जिल्ह्यामधील भोकरदन असे तीन तालुके या  सहकारी साखर कारखान्याचं कार्यक्षेत्र आहे.

****

सामाजिक न्याय विभागाच्यावतीनं देण्यात येणाऱ्या शाहू, फुले, आंबेडकर स्वच्छ दलितवस्ती अभियानाचे लातूर जिल्ह्याचे पुरस्कार काल जाहीर करण्यात आले. यामध्ये शिरुर अनंतपाळ तालुक्यातल्या धामणगावला प्रथम, औसा तालुक्यातल्या दावतपूरला द्वितीय, तर अहमदपूर तालुक्यातल्या कोपरा गावाला तृतीय पुरस्कार जाहीर झाला आहे.

****

जालना जिल्ह्यातल्या नेर इथल्या एका शेतकऱ्याच्या जमिनीच्या नोंदीमध्ये फेरफार करण्यासाठी, तीन हजार रुपयांची लाच घेतांना, भूमि अभिलेख उप अधिक्षक गणेश बहुरे, याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल अटक केली. बहुरेनं संबंधित शेतकऱ्याकडे ५० हजार रुपयांची मागणी केली होती.

नांदेड जिल्ह्यातही मानसपुरी इथं, नवीन वीज खांब बसवण्यासाठी २५ हजार रूपयांची लाच स्वीकारतांना महावितरणचा सहायक अभियंता, पराग काकडे, आणि त्याचा सहाय्यक शेख दावलशहा साहिबशहा या दोघांना अटक करण्यात आली.

//*******//

No comments: