Monday, 29 May 2017

AIR NEWS BULLETIN AURANGABAD 29.05.2017 6.50


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 29 May 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ मे २०१७ सकाळी ६.५०

****

·       जनहितासाठी सरकारच्या कामावर टीका करणं हे निकोप लोकशाहीचं प्रतीक - पंतप्रधानांचं प्रतिपादन

·       शेतकऱ्यांचा एक जून पासूनचा नियोजित संप टाळण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू - मुख्यमंत्री

·       सीबीएसईचा बारावी परीक्षेचा निकाल जाहीर

आणि

·       सहाव्या अखिल भारतीय संत साहित्य संमेलनाला आजपासून लातूर इथं प्रारंभ

****

जनहितासाठी सरकारच्या कामावर टीका करणं हे निकोप लोकशाही आणि जागरुक देशाचं प्रतीक असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या मन की बात या कार्यक्रम श्रृंखलेच्या ३२व्या भागात, ते काल बोलत होते.

येत्या पाच जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त केंद्र सरकार राज्यांच्या मदतीनं घनकचरा व्यवस्थापनाचं एक मोठं अभियान सुरु करणार आहे. या अंतर्गत ओल्या आणि सुक्या कचऱ्याचं वर्गीकरण करुन त्यांचा पुनर्वापर किंवा पुनःप्रक्रिया करण्यासाठी शहरांमध्ये नव्या कचराकुंड्या उपलब्ध करुन दिल्या जातील असं ते म्हणाले.

मुंबईत वर्सोवा इथला समुद्र किनारा अफरोज शाह यांच्या नेतृत्वात नागरिकांनी स्वच्छ केला, या उपक्रमाचं त्यांनी कौतुक केलं.

येत्या २१ जून रोजी जागतिक योग दिनी, एकाच घरातल्या तीन पिढ्यांनी सोबत योगासनं करत, तसं छायाचित्रं नरेंद्र मोदी ॲप आणि माय जीओव्ही डॉट कॉम या संकेतस्थळावर पाठवावं असं पंतप्रधान म्हणाले.

रमजानच्या पवित्र महिन्यानिमित्त पंतप्रधानांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. काल स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त, त्यांना अभिवादन करत, त्यांचा त्याग आणि बलिदानाची आठवण ठेवण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं.

****

समाजातली विषमता दूर करुन स्वातंत्रवीर सावरकरांना अभिप्रेत असलेला समाज विचार जपण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करावा, असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. काल सावरकर यांच्या जयंतीनिमित्त नाशिक जिल्ह्यातलं त्यांचं जन्मगाव भगूर इथं आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. साहित्य क्षेत्रात सावरकरांनी दिलेल्या योगदानाकडे लक्ष वेधत, सावकरांनी मराठी भाषा समृद्ध करण्याचं काम केलं, असं मुख्यमंत्री म्हणाले.

शेतकऱ्यांचा एक जून पासूनचा नियोजित संप टाळण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल नाशिक इथं बोलत होते. कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी यासंदर्भात आंदोलकांना चर्चे साठी बोलावलं असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गामुळे मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, आणि विदर्भाला फायदा होणार असल्याचं, मुख्यमंत्री म्हणाले.

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या शतक महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित होते, शाश्वत विकासासाठी सर्वांना समानता देणाऱ्या ज्ञानाधारित समाजरचनेची गरज मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

****

महाराणा प्रताप यांची जयंतीही काल सर्वत्र साजरी झाली. मुख्यमंत्र्यांनी मुंबईत आपल्या शासकीय निवासस्थानी राणा प्रताप यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. मराठवाड्यातही औरंगाबाद, पैठण आणि लातूरसह सर्वच ठिकाणी महाराणा प्रताप आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन करण्यात आलं.

****

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ - सीबीएसईचा बारावी परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. यावर्षी ८२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, नोएडा इथल्या रक्षा गोपाल हिनं देशभरातून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. आयसीएसई मंडळाच्या बारावी परीक्षेचा निकाल उद्या दुपारी तीन वाजता जाहीर होणार आहे. माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या निकालाची अधिकृत तारीखही आज जाहीर होण्याची शक्यता आहे.

****

इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांसाठी कला आणि शारीरिक शिक्षण विषयाच्या तासिका कमी करण्याचं परिपत्रक रद्द करण्याची मागणी राज्य कला आणि शारीरिक शिक्षक समन्वय समिती आणि सहयोगी शिक्षण संघटनेनं केली आहे. यासंदर्भात संघटनेच्यावतीने आज औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात येणार आहे. हा प्रश्न निकाली काढण्यासाठी आपण लवकरच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेणार असल्याचं मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी सांगितलं.

****

शेतकऱ्यांच्या पाठीशी पक्षविरहित संघटित ताकद उभी केली पाहिजे असं प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केलं आहे. पवार यांच्या संसदीय कारकिर्दीला पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त काल नाशिक इथं त्यांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. भारतीय जनता पक्षाला सक्षम पर्याय देण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतला पाहिजे, असंही पवार यांनी नमूद केलं. येत्या १५ दिवसानंतर चंद्रपूर इथून महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात करणार असल्याचं, पवार यांनी सांगितलं.

****

पुणे इथं काल बाळासाहेब भारदे स्मृती पुरस्कारांचं वितरण माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं. पाणलोट क्षेत्र विकासासाठी काम करणारे विजयअण्णा बोराडे, कीर्तनकार रामदास महाराज, मृदाशास्त्रज्ञ डॉक्तर एम.सी. मन्ना यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. राज्यापुढे पाणी तसंच वाढतं नागरीकरण आणि त्यातून होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट आदी गंभीर समस्या भेडसावत असल्याचं चव्हाण यांनी यावेळी नमूद केलं.

****

हे बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

संगीत नाटक अकादमीचे यंदाचे पुरस्कार नुकतेच जाहीर झाले. ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, शास्त्रीय गायक प्रभाकर कारेकर, पद्मा तळवलकर यांच्यासह संगीत आणि नाट्यक्षेत्रातल्या ४३ कलाकारांचा पुरस्कारप्राप्त मान्यवरांमध्ये  समावेश आहे.

****

वारकरी साहित्य परिषदेच्या सहाव्या अखिल भारतीय संत साहित्य संमेलनाला आजपासून लातूर इथं प्रारंभ होत आहे. शहरातल्या मारवाडी राजस्थान शिक्षण संस्थेच्या मैदानावर आयोजित या तीन दिवसीय संमेलनाचं आज सकाळी ग्रंथदिंडीनंतर उद्घाटन होईल. पाणी नियोजन, वृक्षारोपण, हुंडामुक्त विवाह, स्वच्छता अभियान, आदी विषयांवर मार्गदर्शन होणार आहे.

****

नांदेड जिल्ह्यात अर्धापूर इथं काल रात्री झालेल्या रस्ता अपघातात सहा जण ठार तर अकरा जण जखमी झाले. रस्त्यावर उभ्या असलेल्या एका टिप्परला भरधाव जीपनं मागून धडक दिल्यानं हा अपघात झाल्याचं, अर्धापूर पोलिसांकडून सांगण्यात आलं.

****

लातूर जिल्ह्यातल्या निलंगा इथं मुख्यमंत्र्याच्या हेलिकॉप्टरला अपघात झालेल्या ठिकाणाची, पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी काल पाहणी केली. अपघातात नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनानं अहवाल तयार केला असून, त्याबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचं, निलंगेकर यांनी सांगितलं. या अपघातात एका घराचं तसं मालवाहू ट्रकचं नुकसान झालं आहे.

****

बदलत्या काळात शेतकऱ्यांना आधार देण्याची जबाबदारी कृषी विद्यापीठांची आहे, असं कृषी आणि फलोत्पादन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात आयोजित शेती समृद्ध शेतकरी मोहीमेअंतर्गत शास्त्रज्ञ संपर्क प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. कुलगुरु डॉ. बी व्यंकटेश्वरलू यांच्यासह अनेक मान्यवर या वेळी उपस्थित होते.

****

उस्मानाबाद जिल्हा प्रशासकीय विभागानं जिल्हा वार्षिक योजनेच्या प्रस्तावाची वेळेत तांत्रिक मान्यता घेऊन जिल्हा वार्षिक योजनेचा निधीही वेळेत खर्च करावा, असे निर्देश पालकमंत्री दिवाकर रावते यांनी दिले आहे. काल उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात रावते यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा वार्षिक योजनेचा आढावा घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

****

परतूर शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली. परतूर शहरातील अंतर्गत भूमिगत गटार योजनेचं भूमिपुजन त्यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. अन्य एका कार्यक्रमात बोलताना लोणीकर यांनी, जालना जिल्ह्यात गावा-गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान तसंच मागेल त्याला शेततळे या उपक्रमात लोकसहभाग वाढवण्याचं आवाहन केलं.

****

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करणाऱ्या शेतकऱ्यांचं आंदोलन दडपल्याचा आरोप करत, औरंगाबाद इथं निदर्शनं करण्यात आली. शहरातल्या क्रांतीचौकात झालेल्या या निदर्शनांमध्ये महात्मा फुले यांच्या 'शेतकऱ्याचा आसूड'' या पुस्तकाचं सामुहिक वाचन करण्यात आलं.

****

हिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यांमुळे वीज वाहक तारा तुटल्यानं, तसंच अनेक ठिकाणी वीजेचे खांब उन्मळून पडल्यानं, अनेक गावांचा वीज पुरवठा विस्कळीत झाला. नांदेड इथंही वीजेचं रोहित्रं नादुरुस्त झाल्यानं वीज पुरवठा विस्कळीत झाल्याचं वृत्त आहे.

//********//


No comments: