Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date- 25
May 2017
Time
6.50 AM to 7.00 AM
Language
Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक २६
मे २०१७ सकाळी ६.५०
****
·
मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला निलंग्यात अपघात, सुदैवानं मुख्यमंत्र्यांसह
सर्वजण सुखरूप
·
भारतीय जनता पक्षाच्या शिवार
संवाद सभा अभियानाला लातूर जिल्ह्यातून सुरुवात
·
केंद्र सरकार तीन वर्षाच्या आपल्या
कामगिरीबाबत जनतेची दिशाभूल करत असल्याची काँग्रेसची टीका
·
कर्जमुक्ती बरोबरच शेतीमालाला
हमी भाव देणं गरजेचं - खासदार सुप्रिया सुळे यांचं मत
आणि
·
जालना जिल्ह्यातल्या सेवली दंगल प्रकरणी २१ जणांवर
गुन्हा सिद्ध; येत्या सोमवारी शिक्षा सुनावली जाणार
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हेलिकॉप्टर काल निलंगा इथं
अपघातग्रस्त झालं, सुदैवानं या अपघातातून मुख्यमंत्र्यांसह हेलिकॉप्टरमधले सर्वजण
सुरक्षित आहेत. मुख्यमंत्री आपला
लातूर दौरा आटोपून मुंबईकडे परतत असताना, निलंगा इथं हेलीपॅडवरून उड्डाण घेताच, हेलिकॉप्टर
हेलीपॅडवरच कोसळलं. या अपघातानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वत: निवेदन जारी करून, आपण आणि
आपले सर्व सहकारी सुरक्षित असल्याचं सांगितलं. तांत्रिक बिघाडामुळे हा अपघात झाल्याची
प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातात हेलीकॉप्टरचा भाग एका घरावर कोसळल्यानं,
सात जण किरकोळ जखमी झाल्याचं वृत्त आहे
****
त्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी काल सकाळी निलंगा तालुक्यातल्या
हलगरा इथून भारतीय जनता पक्षाच्या
शिवार संवाद
सभा अभियानाची सुरुवात केली. राज्यातली पाण्याची समस्या
सोडवण्यासाठी पाणलोटांचा विकास करणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
पालकमंत्री संभाजी पाटील- निलंगेकर, खासदार सुनील गायकवाड यावेळी उपस्थित
होते. हलगरा इथं जलयुक्त शिवार योजनेच्या कामांचा आढावा घेऊन त्यांनी गावकऱ्यांसोबत श्रमदान केलं.
हलगरा हे गाव दत्तक घेण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. औराद
शहाजनी इथं तेरणा नदीवरच्या कोल्हापूरी बंधाऱ्याचं लातूर
बंधाऱ्यात रुपांतर करण्यात आलं आहे. या कामाचीही मुख्यमंत्र्यांनी काल
पाहणी केली. या कामामुळे या बंधाऱ्याची पाणी साठवण क्षमता
साडे तीन दशलक्ष घनमीटर पेक्षा अधिक झाली आहे.
****
भारतीय जनता पक्षाच्या कालपासून सुरू
झालेल्या पाच दिवसीय शिवार संवाद सभेत काल राज्यभरात सभा घेण्यात आल्या. भाजपाचे केंद्रीय
तसंच राज्य मंत्रिमंडळातले अनेक मंत्री, खासदार, आमदारांसह, सर्व लोकप्रतिनिधी तसंच
पदाधिकारी या मोहिमेत सहभागी झाले आहेत.
भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब
दानवे यांनी धुळे तालुक्यातल्या मांडळ गावात प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद
साधला. यावेळी संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे, राज्याचे रोजगार हमी मंत्री
जयकुमार रावल उपस्थित होते.
जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव
लोणीकर यांनी काल जालना जिल्ह्यात मंठा तालुक्यातल्या केंधळी इथं शेतकऱ्यांशी संवाद
साधला, केंद्र आणि शासनाच्या सर्व योजनांचा लाभ शेतकऱ्यांना थेट मिळावा यासाठी अधिकारी
आणि पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेण्याचं आवाहन त्यांनी केलं.
उस्मानाबाद जिल्ह्यात आमदार सुजितसिंह
ठाकूर यांनी उस्मानाबाद तालुक्यात वाघोली इथं प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद
साधला. पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
****
निवडणुकीपूर्वी दिलेली सर्व आश्वासनं मोदी सरकारनं पूर्ण केली
असल्याचं, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्रबुध्दे यांनी म्हटलं आहे.
केंद्र सरकारला आज तीन वर्ष पूर्ण होत आहेत, या
पार्श्वभूमीवर ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत
होते. या तीन वर्षांमध्ये भ्रष्टाचार मुक्तीसाठी ई गव्हर्नंसची मदत झाली, अर्थव्यवस्था
सुधारण्याबरोबरच ‘मेक इन इंडिया’च्या माध्यमातून रोजगाराच्या संधी वाढल्या, गरीब आणि
दुर्लक्षित वर्गाच्या सक्षमीकरणासोबतच महिला सबलीकरणावरही सरकारनं भर दिल्याचं सहस्रबुद्धे यांनी सांगितलं. सरकारचं नवं शैक्षणिक धोरण लवकरच अंमलात येईल असंही त्यांनी नमूद केलं. आंतरराष्ट्रीय योग दिवसाचं
आयोजन हे केंद्र सरकारचं मोठं यश असल्याचं सहस्रबुध्दे म्हणाले.
****
केंद्र सरकार
तीन वर्षांच्या आपल्या कामगिरीबाबत जनतेची दिशाभूल करत असल्याची टीका काँग्रेसनं केली आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते आनंद
शर्मा यांनी काल नवी दिल्ली इथं बातमीदारांशी बोलताना, सरकारनं गेल्या तीन वर्षात काहीही काम
न करता विकासाचे
खोटे दावे करत, मोदींच्या
व्यक्तिमत्वाचा
प्रचार करण्यावर
केंद्रीय निधीतून १५०० कोटी रुपये उधळले आहेत, असा आरोपही शर्मा यांनी केला. युवकांसाठी उपलब्ध केलेले रोजगार आणि स्थूल राष्ट्रीय उत्पन्न यांचे जुन्या
सुत्रांनुसार तपशील प्रसिध्द करावेत तसंच एकंदर अर्थव्यवस्थेबाबत सरकारनं श्वेतपत्रिका
जारी करावी अशी मागणीही त्यांनी केली.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी परवा, रविवारी
आकाशवाणीच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा
हा ३२वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन रविवारी सकाळी ११
वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल. दरम्यान, आज नवी दिल्लीत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी
यांच्या हस्ते ‘मन की बात’ या पुस्तकाचं प्रकाशन होणार आहे.
****
हे बातमीपत्र
आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारित केलं जात आहे, आमचं
हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
पनवेल, भिवंडी निजामपूर आणि मालेगाव महानगरपालिकांसाठी परवा
झालेल्या मतदानाची आज मतमोजणी होणार आहे. पनवेल महानगरपालिकेची ही पहिलीच निवडणूक असून,
इथं सरासरी ५५ टक्के मतदान झालं. लातूर
जिल्ह्यातल्या रेणापूर नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आणि औसा नगर परिषदेतल्या
प्रभाग क्रमांक -दहा अ मधल्या पोटनिवडणूकीची आज मतमोजणी होणार आहे. सकाळी दहा वाजेपासून
मतमोजणीला सुरुवात होईल.
****
कर्जमुक्ती बरोबरच शेतीमालाला हमी भाव
देणं गरजेचं असल्याचं मत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी काल
औरंगाबाद इथं व्यक्त केलं. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातल्या महिलांना ‘उमेद’ उपक्रमाअंतर्गत
व्यवसाय साधनांचं वाटप त्याच्या हस्ते करण्यात आलं. त्यानंतर आयोजित वार्ताहर परिषदेत
त्या बोलत होत्या. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी करण्यासाठी सर्वांनी एकत्रित
प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं मत सुळे यांनी नमूद केलं. औरंगाबाद जिल्ह्यात आत्महत्या
केलेल्या २२ शेतकऱ्यांच्या पत्नींना पिठाची गिरणी, शिलाई मशीन, शेवया मशीन सह शेळ्यांचं
वाटप खासदार सुळे यांच्याहस्ते करण्यात आलं.
****
जालना जिल्ह्यातल्या सेवली इथं एप्रिल
२००८ मध्ये झालेल्या दंगलीत जिल्हा सत्र न्यायालयानं २१ जणांवर दोषारोप निश्चित केले
असून, या सर्वांना येत्या सोमवारी २९ तारखेला शिक्षा सुनावली जाणार आहे. एका पानटपरीवर
लावलेल्या गाण्यावरून झालेल्या वादातून, दोन गटात ही दंगल झाली होती, या हिंसाचारात
बळीराम जाधव आणि संतोष गवळकर या दोघांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी ३३ जणांविरोधात
सत्र न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. काल या खटल्याची सुनावणी पूर्ण होऊन,
३३ पैकी २१ जणांचा गुन्हा सिद्ध झाला.
****
वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत राबवण्यात
येत असलेलं पंडित दीनदयाल उपाध्याय स्वस्थ महाराष्ट्र तपासणी अभियान उद्या शनिवारपर्यंत
सुरू रहाणार असून या अभियानात जास्तीत जास्त नागरिकांनी नोंदणी करावी, असं आवाहन वैद्यकीय
शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी केलं आहे. ते काल मुंबई इथं बोलत होते. राज्यातल्या
सहा जिल्ह्यात एक मे पासून सुरू झालेल्या या अभियानाअंतर्गत पथदर्शी आरोग्य पूर्व तपासणी
मोहिमेस सुरूवात झाली आहे. बीड जिल्ह्याचा या अभियानात समावेश आहे.
****
शेतकऱ्यांनी कृषी उत्पादन वाढवण्यासाठी
नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करावा असं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी
केलं आहे, ते काल लोहा तालुक्यातल्या दापशेड इथं उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान पंधरवाड्याच्या
उद्धाटन समारंभात बोलत होते. शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय करावेत, शासनाच्या कृषी
विषयक विविध योजनांचा लाभ घ्यावा, असंही डोंगरे
यांनी नमूद केलं.
****
हिंगोली जिल्ह्यात
डिग्रसवाणी इथं महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेत झालेल्या एक लाख ९० हजार
रूपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं चौकशी अंती सहा जणांविरूद्ध
गुन्हा दाखल केला असून पाच जणांना अटक केली आहे. त्यात तत्कालिन सरपंच मधुकर खंदारे,
ग्रामसेवक आणि सध्या औंढा इथं कार्यरत असलेले विस्तार अधिकारी भीमराव धुळे यांचा समावेश
आहे.
****
परभणी जिल्हातल्या गंगाखेड इथं गोदावरी
नदीपात्रातून वाळुची अवैध वाहतुक करणारी २० वाहनं तहसीलदार संजय पवार आणि त्यांच्या
पथकानं जप्त केली. बुधवारी रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली. गंगाखेड पोलिसांनी
काल सकाळी ही वाहनं जमा करून घेत, गुन्हा दाखल केला.
****
सोलापूर जिल्ह्यात बिकानेर बंगरूळ एक्सप्रेस
लुटण्याचा प्रयत्न रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळला. काल पहाटेच्या सुमारास ही
गाडी, नांदेड पुणे रेल्वेगाडीच्या क्रॉसिंगसाठी पारेवाडी स्थानकावर आठ मिनिटं थांबली
असता, चार ते पाच चोरट्यांनी गाडीवर दगडफेक करत, प्रवाशांना लुटण्याचा प्रयत्न केला.
मात्र स्थानकावर तैनात असलेल्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यांचा हा प्रयत्न हाणून
पाडला.
****
लातूर इथं येत्या २९ तारखेपासून सहाव्या
अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. शहरातल्या मारवाडी
राजस्थान शिक्षण संस्थेच्या मैदानावर हे तीन दिवसीय संमेलन होणार आहे. संमेलनाच्या
सभामंडपासाठी काल भूमिपूजन करण्यात आलं.
****
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे वार्षीक ग्रंथ आणि ग्रंथकार पुरस्कार
आज पुण्यात समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहेत. ज्येष्ठ लेखिका भाषा तज्ज्ञ यास्मिन
शेख यांना जीवनगौरव पुरस्कार तर यंदाचा उत्कृष्ट शाखा पुरस्कार चाळीसगाव शाखेला प्रदान
करण्यात येणार आहे. परिषदेचा १११वा वर्धापन दिन उद्या शनिवारी साजरा होणार आहे.
****
लातूर विभागात ‘उन्नत शेती - समृध्द
शेतकरी’ अभियानाबाबत आजपासून तंत्रज्ञान प्रसाराची सुरुवात होत आहे, हे अभियान यशस्वीपणे
राबवण्याचं आवाहन, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी केलं आहे.
//*******//
No comments:
Post a Comment