Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 24 May 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २४ मे २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी इंग्लंडच्या महाराणी एलिझाबेथ
द्वितीय, यांना मँचेस्टर इथं झालेल्या बाँबहल्याबद्दल शोक संदेश पाठवला आहे. मँचेस्टर
इथल्या अतिरेकी हल्ल्याचा भारताला धक्का बसला असून, भारत या हल्ल्याची कठोर निंदा करत
आहे, असं राष्ट्रपतींनी आपल्या या संदेशात म्हटलं आहे. हा हल्ला केवळ इंग्लंडच्या लोकांवर
नव्हे तर संपूर्ण मानवजातीवर असून, आपला देश याप्रसंगी इंग्लंडसोबत असल्याचंही राष्ट्रपतींनी
या संदेशात म्हटलं आहे.
****
उत्तर प्रदेश आणि दिल्लीतल्या अनेक उच्चपदस्थ सरकारी अधिकाऱ्यांच्या
निवासस्थानावर आणि कार्यालयांवर आयकर विभागानं आज छापे घातल्याचं वृत्त आहे. या अधिकाऱ्यांविरूध्द
भ्रष्टाचार आणि बेहिशेबी संपत्तीबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानं आयकर विभागानं ही कारवाई
केली आहे. लखनऊ, मेरठ, बागपत, नोएडा, गाझियाबाद आणि दिल्ली इथं आयकर विभागानं ही कारवाई
केली आहे.
****
सरकार कृषी क्षेत्राला प्राधान्य देत असल्याचं प्रतिपादन केंद्रीय
नागरी विकासमंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे. आज राजस्थानातल्या कोटा इथं
राजस्थान अॅग्रीटेक महोत्सवाचं उद्घाटन करताना ते बोलत होते. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याच्या
दृष्टीनं कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा उपयोग जास्तीत जास्त केला जाण्यावर त्यांनी
भर दिला. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेसाठी पन्नास हजार कोटी रूपये निधी देण्यात आल्याचं
नायडू यांनी यावेळी सांगितलं.
****
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर
आणि माहिती- तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज नवी दिल्ली इथं ‘ई-सनद’ प्रणालीचं
उद्घाटन केलं. या प्रणालीद्वारे भारतीय नागरिकांना दस्तावेजांचं प्रमाणीकरण आणि सत्यप्रतीकरण
करता येणार आहे. या कामासाठी त्यांना वैयक्तिकरीत्या उपस्थित राहण्याची आता आवश्यकता
राहणार नाही. तंत्रज्ञानामुळे मिळू शकणाऱ्या सुविधा प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचवण्याचा
सरकारचा हेतू असल्याचं रविशंकर प्रसार यांनी यावेळी बोलताना सांगितलं.
****
जलयुक्त शिवार ही योजना आता फक्त सरकारची योजना राहिली नसून ती
जनतेची योजना झाली असल्याचं मत व्यक्त करत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त
शिवार योजनेच्या यशाचं श्रेय जनतेला दिलं आहे. त्यांनी आज सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला
तालुक्यातल्या मानेगाव आणि डोंगरगाव या दुष्काळग्रस्त गावांना भेट दिली. त्यावेळी ते
बोलत होते. प्रधानमंत्री आवास योजना आणि जलयुक्त
शिवार योजनेतल्या कामांची पाहणी करण्याकरता मुख्यमंत्री आज सोलापूर जिल्ह्यातल्या गावांना
भेट देत असून उद्या लातूर जिल्ह्यातल्या गावांना भेट देणार आहेत.
****
मालेगाव, पनवेल आणि भिवंडी महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठीचं आज
सुरू असलेलं मतदान आता साडेपाचला संपत असून दुपारी दीड वाजेपर्यंत पनवेल मध्ये चौतीस
टक्के तर मालेगाव मध्ये पस्तीस टक्के मतदान झाल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.
मालेगाव इथं मतदानाच्या कालावधीमध्ये
एका मतदानकेंद्रावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये वादविवाद
होऊन त्याचं पर्यवसान मारामारीत झाल्याचं वृत्त आहे.या घटनेत दोन जण जखमी झाले आहेत.
पोलिसांनी लाठीमार करून स्थितीवर नियंत्रण मिळवल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या माजी सैनिकांच्या दोन पाल्यांसाठी बारा हजार
रूपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. यासाठी २०१६-१७ या वर्षात पहिली ते नववी किंवा
अकरावी इयत्ता उत्तीर्ण झालेल्या आणि माजी सैनिकांचे पाल्य असणाऱ्या विद्यार्थ्यांनी
दिल्लीच्या केंद्रीय सैनिक मंडळाकडे ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. हे अर्ज येत्या वीस जूनपर्यंत
करता येणार आहेत. याबद्दलची माहिती www. Ksb.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.
****
मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव तालुक्यातल्या रोपोली गावाजवळ रस्त्यात
मोठा वृक्ष कोसळल्यानं या महामार्गावरच्या वाहतुकीचा मोठा खोळंबा झाल्याचं वृत्त आहे.
दोन्ही बाजूंनी पंधरा किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे.
****
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि पाकिस्तान क्रिकेट मंडळ यांच्या
वरिष्ठ अधिकाऱ्यांची येत्या २९ तारखेला दुबई इथं बैठक होणार आहे. भारत पाक क्रिकेट
मालिका रद्द केल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या झालेल्या आर्थिक नुकसानाबाबत
या बैठकीत चर्चा होणार आहे. राजकीय अस्थिरतेमुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून भारत
पाक मालिकेसाठी सतत नकार मिळाल्यामुळे आपलं नुकसान झालं, असा पाकिस्तान क्रिकेट मंडळाचा
दावा असून, त्यांनी याबाबत कायदेशीर नोटीस पाठवून नुकसान भरपाईची मागणी केली आहे. तर
भारत आणि पाकिस्तान दरम्यान यासंदर्भात फक्त सामंजस्य करार आहे, असं भारतीय क्रिकेट
नियामक मंडळाचं म्हणणं आहे.
****
No comments:
Post a Comment