Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 23 May 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २३ मे २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
भारतीय सैन्यानं जम्मू काश्मीरमध्ये
नौशेरा सेक्टरमधल्या नियंत्रण रेषेजवळच्या पाकिस्तानी लष्कराच्या चौक्या उद्ध्वस्त
केल्या आहेत. मेजर जनरल अशोक नरुला यांनी वार्ताहर परिषदेत ही माहिती देताना नऊ मे
रोजी केलेल्या या कारवाईचा व्हिडीओही सार्वजनिक केला आहे. पाकिस्तानी लष्कराकडून घुसखोरांना
मदत केली जात असल्याचं भारतीय सैन्यानं म्हटलं आहे.
****
येत्या एक जुलै पासून लागू होणाऱ्या
वस्तु आणि सेवा कर - जीएसटी मध्ये मनोरंजन, केबल, डीटीएच या सेवा समाविष्ट असतील, असं
केंद्र सरकारनं म्हटलं आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयानं दिलेल्या पत्रकानुसार मनोरंजनाचे
कार्यक्रम अथवा सिनेमागृहात दाखवण्यात येणाऱ्या चित्रपटांवर २८ टक्के, तर केबल टीव्ही,
डीटीएच सेवांवर १८ टक्के कर निश्चित केला आहे. मात्र पंचायत तसंच नगरपालिका यांनी निश्चित
केलेले मनोरंजनाचे कर तसेच राहतील, असं या पत्रकात नमू्द करण्यात आलं आहे.
****
संपूर्ण वैज्ञानिक समुदायाला एकत्र
आणण्यासाठी सामंजस्य वाढवण्याची गरज असल्याचं प्रतिपादन केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान
मंत्री हर्षवर्धन यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं केंद्र सरकारच्या त्रिवर्षपूर्तीनिमित्त
आपल्या मंत्रालयाच्या कामांची माहिती देताना बोलत होते. भाजप सरकारनं विज्ञानाला प्रयोगशाळेच्या
बाहेर आणण्याचा प्रयत्न केला असल्याचं ते म्हणाले.
****
डिजिटल भारत मोहिमेअंतर्गत आतापर्यंत
८२ लाख लोकांना डिजिटल साक्षर बनवलं असल्याचं केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर
प्रसाद यांनी म्हटलं आहे. ते आज सरकारच्या त्रिवर्षपूर्तीनिमित्त आयोजित वार्ताहर परिषदेत
बोलत होते. मोबाईल फोन बनवणारऱ्या ७२ कंपन्या देशात आल्या असल्याचं ते म्हणाले. यावेळी
त्यांनी तीन वर्षात मंत्रालयानं केलेल्या कामांचा आढावा घेतला.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २८
मे रोजी आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत.
या मालिकेचा हा ३२वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार
एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या नि:शुल्क क्रमांकावर, तसंच माय जी ओ
व्ही ओपन फोरम वर किंवा नरेंद्र मोदी ॲप वर नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
सक्तवसुली संचालनालयानं दिल्लीतल्या
बिजवासन इथल्या बेनामी संपत्तीप्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालुप्रसाद यादव
यांची कन्या आणि राज्यसभा सदस्य मिसा भारती यांचे सनदी लेखापाल राजेश अग्रवाल यांना
अटक केली आहे. आठ हजार कोटी रुपयांचा हा घोटाळा आहे. गेल्या सोमवारी प्राप्तिकर विभागानं
दिल्ली आणि गुरूग्राम इथं लालूप्रसाद यादव यांच्याशी निगडीत विविध ठिकाणं आणि कंपन्यांवर
छापे मारले होते. गेल्या १५ वर्षांत अनेक बनावट कंपन्यांच्या माध्यमातून हजारो कोटी
रूपयांचा काळा पैसा पांढरा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
****
लोकप्रतिनिधींनी शासनाच्या कल्याणकारी
योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचं आवाहन पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी केलं
आहे. परभणी इथं भारतीय जनता पक्षाच्या शिवार संवाद विस्तारक कार्यक्रमात ते आज बोलत
होते. विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून समाजातल्या सर्वच घटकांच्या विकासाचं
उद्दिष्ट पूर्ण करणं सहज शक्य असल्याचं ते म्हणाले.
जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनीही
अहमदनगर इथं यासंदर्भात बैठक घेऊन, शिवार संवाद यात्रेच्या माध्यमातून सरकारच्या योजना,
केलेल्या कामांची माहिती लोकांपर्यत पोहचवण्याचं काम केलं जाणार असल्याचं सांगितलं.
२८ मे ते १५ जून या काळात ही यात्रा काढली जाणार आहे.
****
दरम्यान, एक जून रोजी संपावर जाणाऱ्या
शेतकऱ्यांशी चर्चा करुन प्रश्न मार्गी लावण्याची सरकारची तयारी असल्याचं शिंदे यांनी
म्हटलं आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजकारण केलं जात असल्याचं ते म्हणाले. कर्जमाफीसाठी
राज्यातले शेतकरी एक जून पासून संपावर जाणार आहेत.
****
कौटुंबिक न्यायालय ही समाज स्वास्थ
टिकवणारी न्यायसंस्था असून, समाजाच्या सशक्त बांधणीत कौटुंबिक न्यायालयाची भूमिका महत्वपूर्ण
असल्याचं प्रतिपादन औरंगाबादचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केलं आहे. औरंगाबाद
कौटुंबिक न्यायालय इथल्या मोबाईल कॉम्पॅक्टरचं आज जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन
झालं, त्यावेळी ते बोलत होते. कोटुंबिक न्यायालयातल्या नोंदी अद्यावत ठेवण्यासाठी मोबाईल
कॉम्पॅक्टर ही यंत्रणा सहाय्यक ठरेल असं ते म्हणाले. जिल्हा प्रशासनाकडून ई - गव्हर्नन्सच्या
माध्यमातून कौटुंबिक न्यायालयाच्या अद्यावत कार्यप्रणालीसाठी जे काही सहकार्य आवश्यक
असेल ते वेळोवेळी केलं जाईल, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं.
****
लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर नगरपंचायतीच्या
सार्वत्रिक निवडणुकीसाठी आणि औसा नगर परिषदेतल्या प्रभाग क्रमांक -दहा अ मधल्या पोटनिवडणूकीसाठी
उद्या मतदान होणार आहे. त्यामुळे या मतदान क्षेत्रात उद्या सार्वजनिक सुट्टी जाहीर
करण्यात आली आहे.
****
No comments:
Post a Comment