Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 22 May 2017
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२ मे २०१७ सायंकाळी ५.२५ मि.
****
राज्य विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या आजच्या अखेरच्या दिवशी वस्तू आणि सेवा कर - जीएसटी विधेयक एकमतानं मंजूर झालं. याबरोबरच जीएसटी संदर्भातली तिन्ही विधेयकंही एकमताने
मंजूर झाली आहेत. दरम्यान जीएसटीला एकमताने मंजुरी मिळाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले. जीएसटीसंबंधी
विरोधी पक्षाच्या सदस्यांनी उपस्थित
केलेल्या शंका राज्याच्या हिताच्याच असल्याचं ते यावेळी म्हणाले.
मूल्याधारित कर - व्हॅट प्रणालीमध्ये जेवढं उत्पन्न मिळालं
तेवढं उत्पन्न जीएसटीमधूनही राज्याला मिळणार असून, नुकसान भरपाईही मिळणार असल्याचं
त्यांनी सांगितलं. महानगरपालिकांचीही आर्थिक स्वायतत्ता राखण्यात येणार असून, महानगरपालिकांना
नुकसान भरपाई देणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य असल्याचं ते म्हणाले. विधानपरीषदेत
कालच पाच तास या विधेयकावर चर्चा झाल्यानंतर त्याला मंजुरी देण्यात आली आहे. येत्या
१ जुलैपासून हा कर देशात सर्वत्र लागू होणार आहे.
****
कोळसा घोटाळ्याशी संबंधित एका खटल्यात नवी दिल्ली इथल्या
विशेष न्यायालयानं माजी कोळसा सचिव एच. सी. गुप्ता यांच्यासह तीन सरकारी अधिकाऱ्यांना
प्रत्येकी दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. ज्या कंपनीला कोळसा खाणपट्टा
दिला गेला होता, त्या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पवन कुमार अहलुवालिया यांना तीन
वर्षांची कैद आणि ३० लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. कोळसा खाणपट्टे घोटाळा खटल्यात
आरोपीला शिक्षा झालेला हा पहिला खटला आहे.
****
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दुसऱ्यांदा दिल्लीचे
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात अब्रु नुकसानीचा खटला दाखल केला आहे.
जेटली यांच्या वकिलांनी दिल्ली उच्च न्यायालयात १० कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईचा
हा दुसरा खटला दाखल केला आहे. केजरीवालांचे वकील राम जेठमलानी यांनी जेटली यांच्या
विरोधात वादग्रस्त शब्दप्रयोग केल्यानं हा दावा करण्यात आला आहे.
****
मुंबई ते गोवा या मार्गावर आजपासून तेजस एक्स्प्रेस या
सर्वात जलदगती रेल्वे गाडी सुरू झाली. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज
या गाडीला हिरवा झेंडा दाखवून तिचा शुभारंभ केला. आठवड्यातून पाच दिवस धावणारी ही रेल्वेगाडी
गोव्यातल्या करमाळी स्टेशनपर्यंत जाणार आहे. सकाळी पाच वाजता ही रेल्वे मुंबईच्या छत्रपती
शिवाजी टर्मिनलवरून सुटेल आणि दुपारी दीड वाजता करमाळीला पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी
ती दुपारी अडीच वाजता करमाळीहून सुटेल आणि रात्री ११ वाजता मुंबईला पोहोचेल.
****
कर्जमाफीसाठी येत्या एक जूनपासून संप करण्याचा निर्णय
राज्यातल्या शेतकऱ्यांनी घेतला आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या पुणतांबा इथं किसान क्रांती
संघटनेची राज्यव्यापी बैठक झाली, या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानुसार
शेतकऱ्यांनी एक जूनपासून कोणत्याही शेतमालाची विक्री न करण्याचं ठरवलं आहे.
****
शेतकऱ्यांचं कल्याण आणि कृषी क्षेत्राचा विकास करण्यासाठी
केंद्रीय कृषी मंत्रालयानं केलेल्या उपाययोजनांचे सकारात्मक परिणाम दिसत असल्याचं केंद्रीय
कृषीमंत्री राधामोहन सिंग यांनी म्हटलं आहे. सरकारच्या त्रिवर्षपूर्तीनिमित्त आयोजित
वार्ताहर परिषदेत ते आज बोलत होते. कृषी आणि त्याच्याशी निगडीत अन्य क्षेत्रात यावर्षी
चार टक्क्यांनी वाढ झाली असल्याचं ते म्हणाले. यावेळी त्यांनी कृषी मंत्रालयाच्या विविध
योजनांची माहिती दिली.
****
लातूर शहरातली पाण्याची दुरावस्था कमी करण्याचा प्रयत्न
करणार असून, पारदर्शी कामकाजावर भर देणार असल्याचं लातूरचे नवनिर्वाचित महापौर सुरेश
पवार यांनी म्हटलं आहे. ते आज महापौर पदाच्या निवडणुकीनंतर वार्ताहरांशी बोलत होते.
आज झालेल्या महापौर पदाच्या निवडणुकीत पवार यांनी काँग्रेसच्या विक्रांत गोजमगुंडे
यांचा पराभव केला. तर उपमहापौरपदी भाजपचे देविदास काळे यांची निवड झाली आहे. सभागृह
नेते पदी शैलेश गोजमगुंडे यांची तर विरोधीपक्ष नेते पदी दिपक सुळ यांची निवड करण्यात
आली.
****
मुंबई महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत राज्यात नगरसेवकांना
पथकर माफ करण्याचा ठराव घेण्यात आला. सर्व नगरसेवकांनी एकमतानं या ठरावाला पाठिंबा
दिला, हा ठराव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे.
****
अहमदनगर तालुक्यातल्या तूर खरेदी केंद्रावर संबंधितांनी
व्यापारी आणि साठेबाज यांची तूर शेतकऱ्यांच्या नावावर खरेदी करून मोठा घोटाळा केला
असल्याचा आरोप शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी केला आहे. ज्या शेतकऱ्यांच्या नावावर ही तूर खरेदी
करण्यात आली, त्यापैकी अनेक शेतकऱ्यांनी यावर्षी तुरीचं पिकच घेतलं नसल्याचा दावा कार्ले
यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
****
No comments:
Post a Comment