Monday, 22 May 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 22.05.2017 - 06.50


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date- 22 May 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२  मे २०१७ सकाळी ६.५०

****

·      महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विधेयक काल विधान परिषदेत मंजूर; विधानसभेत चर्चेदरम्यान विरोधकांची सरकारवर जोरदार टीका.

·      वस्त आणि सेवा कर विधेयक लागू झाल्यानंतर महागाई दोन टक्क्यांनी कमी होईल, केंद्रीय महसूल सचिवाचा दावा.

·      मुंबई- गोवा अतिजलद तेजस रेल्वे गाडीला आजपासून प्रारंभ.

आणि

·      इंडीयन प्रिमिअर लिग  टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचं मुंबई इंडीयन्स संघाला विजेतेपद.

****

महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर विधेयक काल विधान परिषदेत मंजूर करण्यात आलं. वस्तू आणि सेवा कर विधेयक लागू झाल्यानंतर महागाई वाढणार नाही असा विश्वास अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी या विधेयकाच्या चर्चेला उत्तर देताना व्यक्त केला. त्याआधी जीएसटी बाबतचं सुधारणा विधेयक केसरकर यांनी सभागृहात मांडल्यानंतर या कायद्यामुळे रद्द होणाऱ्या करांच्या प्रलंबित रकमेची वसुली करण्यासाठी आपण कोणत्या उपाययोजना करणार आहोत हे स्पष्ट करावं अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. कायदे करताना संबंधित मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली स्थायी समिती स्थापन करावी अशी मागणी काँग्रेस गटनेते शरद रणपिसे यांनी केली.

विधानसभेत या विधेयकावर चर्चा करतांना काल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी विविध मुद्यांवर दोन तास भाषण केलं. या कायद्यात बऱ्याच उणिवा असल्याचं देशाचे प्रमुख आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी म्हटलं आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. राज्यात आणि देशात चुकीचं काय होतंय हे सांगणारा वर्ग कमी झाला असून तसं कोणी करु नये अशी दहशत केंद्र शासनानं निर्माण केली असल्याचा आरोप पाटील यांनी केला. यावर उत्तर देताना सत्ताधारी सदस्यानी मावळमध्ये शेतकऱ्यांवर झालेला गोळीबार आणि कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना पोलिसांनी केलेली मारहाण याची आठवण जयंत पाटील यांना करुन दिली.

****

वस्त आणि सेवा कर - जीएसटी विधेयक लागू झाल्यानंतर महागाई दोन टक्क्यांनी कमी होईल, आणि अर्थव्यवस्थेला गती प्राप्त होईल, असं केंद्रीय महसुल सचिव हसमुख अधिया यांनी म्हटलं आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेला काल दिलेल्या मुलाखतीत बोलताना, अधिया यांनी जीएसटी परिषदेच्या पुढच्या बठकीत सोनं, बिस्कीटं आणि विडी यासारख्या वस्तुंवरचे कराचे दर निश्चित करण्यात येणार असल्याचं सांगितलं. राज्यांना कमी महसुलामुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई, कार आणि तंबाखूसारख्या वस्तूंवर उपकर लावून केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.  

****

औद्योगिक प्रशिक्षण संस्था-आयटीआय मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना इतर शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसारखे विषय शिकता यावेत म्हणून देशातल्या आयटीआय संस्थांना आता सर्वसामान्य शाळांचा दर्जा दिला जाणार आहे. केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयानं तयार केलेल्या याबाबतच्या प्रस्तावाला मनुष्यबळ विकास मंत्रालयाची मान्यता मिळाली आहे. त्यामुळे देशभरातल्या १३ हजारांहून अधिक आयटीआय संस्थांमध्ये दरवर्षी प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या वीस लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना बारावी इयत्ता पास झालेल्या विद्यार्थ्यामध्ये गणलं जाणार आहे. या विद्यार्थ्यांच्या परीक्षा राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण परिषदेद्वारे घेतल्या जातील अशी माहिती मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्यानं काल नवी दिल्लीत वार्ताहरांना दिली.

****

मुस्लिम समाजातली तिहेरी तलाकची पध्दत बंद करण्यासाठी आवश्यकता भासली तर केंद्र सरकार कायदा करेल मात्र त्यापूर्वी या विषयावर अंतर्गत चर्चा करुन सकारात्मक तोडगा काढण्याची संधी मुस्लिम समाजाला दिली जाईल, असं केंद्रीय नगर विकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे. ते काल बंगळुरु इथं बोलत होते. तिहेरी तलाक बंद करायची आपली भूमिका सरकारनं स्पष्ट केली असल्याचं त्यांनी सांगितलं. हिंदू समाजानं जशा महिलांच्या हिताविरोधातल्या अनेक अनिष्ठ प्रथा दूर केल्या आहेत तसंच मुस्लिम समाजानंही तिहेरी तलाकची प्रथा बंद करण्यासाठी पुढे यावं असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

****

माऊंट एव्हरेस्टवर केवळ पाच दिवसांच्या अंतरानं सलग दुसऱ्यांदा चढाई करायचा विक्रम भारताच्या अंशु जॉन्सन पा हिनं नोंदवला आहे. हा विक्रम नोंदवणारी ती जगातली पहिली महिला गिर्यारोहक ठरली आहे. तसंच माऊंट एव्हरेस्ट पाच वेळा सर करणारी अंशू ही पहिली भारतीय महिला आहे. ड्रीम हिमालय ॲडव्हेंचर संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक दावा एस लामा यांनी ही माहिती दिली.

****

देशात रेल्वेचा एकच विकास आराखडा तयार करण्यावर भर देणार असल्याचं रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितलं. कोकण रेल्वेच्या २८ स्थानकांवर आता मोफत वायफाय सुविधा मिळणार आहे. त्याचं उद्घाटन प्रभू यांच्या हस्ते कुडाळ इथं झालं, त्यावेळी ते बोलत होते. येत्या पाच वर्षात भारतीय रेल्वेचा कायापालट करणार असल्याचं ते म्हणाले. देशभरात रेल्वेचं विद्युतीकरण आणि दुपदरीकरण यासाठी तीन लाख कोटींचा निधी उपलब्ध करुन देणार असल्याचं प्रभू यांनी सांगितलं.

****

मुंबई- गोवा अतिजलद तेजस रेल्वे गाडी अत्याधुनिक सुविधेसह सज्ज असून, रेल्वे मंत्री सुरेश प्रभ या गाडीला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. या गाडीमुळे मुंबई गोवा प्रवास साडे आठ तासांत पूर्ण करता येणार आहे. आठवड्यातून पाच दिवस ही रेल्वे चालणार आहे. या गाडीला रायगड जिल्ह्यात पेण किंवा रोहा इथं थांबा द्यावा, अशी मागणी या भागातल्या नागरिकांकडून केली जात आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे येत्या २८ मे रोजी रविवारी, देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेचा हा ३२वा भाग असणार आहे.

****

हे बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमी तर्फे दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कार-पारितोषिकांसाठी पात्र व्यक्तींची निवड करण्यासाठी गठीत समितीचे अध्यक्ष म्हणून औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उर्दू विभागाचे प्राध्यापक मोहम्मद गयसुद्दिन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसंच, दहा विविध सदस्य असलेल्या या समितीमध्ये औरंगाबादचे उर्दू लेखक नक्शबंदी सय्यद नुरुल हुसेन यांची निवड झाली आहे.

****

इंडीयन प्रिमिअर लिग टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद मुंबई इंडीयन्स संघानं पटकावलं. काल हैदराबाद इथं मुंबई इन्डीयन्स आणि रायझींग पुणे सुपरजायंट यांच्यात स्पर्धेचा अंतिम सामना झाला. शेवटच्या चेंडूपर्यंत रोमहर्षक ठरलेल्या या सामन्यात मुंबई इंडीयन्सनं पुणे सुपरजायंट संघावर एका धावेनं विजय मिळवला. मुंबई इंडीयन्स संघानं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. निर्धारीत २० षटकात संघानं आठ बाद १२९ धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरादाखल पुणे रायझिंग सुपरजायन्ट संघाला सहा बाद १२८ धावाच करता आल्या.

****

मराठा रक्षण आणि विविध मागण्यांसाठी मुंबई इथं येत्या ३० मे रोजी मराठा क्रांती मोर्चा काढण्यात येणार आहे. यासंदर्भात मराठवाडयातल्या विविध गावांमध्ये बैठका घेतल्या जात आहेत.

****

उत्तराखंडात बद्रीनाथ परिसरात दरड कोसळल्यामुळे अडकलेले मराठवाड्यातले सुमारे अडीचशे यात्रेकरू काल हरिद्वार इथं सुखरूप पोहचले. औरंगाबाद इथले यात्रा व्यवस्थापक मंगेश कपोते यांनी ही माहिती दिली. बद्रीनाथ मार्गावर कोसळलेला मलबा हटवून वाहतूक सुरू झाल्यानं यात्रेकरूंना टप्प्याटप्यानं परतीच्या मार्गावर सोडण्यात येत असल्याचं कपोते यांनी सांगितलं.

****

अहमदनगर शहरातल्या एका कांदा व्यापाऱ्याकडून सुमारे एक कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. नगर शहरातली ही पहिलीच मोठी कारवाई असून या प्रकरणी व्यापाऱ्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. याबाबत आयकर विभागाला माहिती देण्यात आली आहे.

****

लातूर महानगर पालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज निवडणूक होणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीनं दोन पदांसाठी चार तर काँग्रेसकडून दोन जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. लातूर महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आहे.

****

नांदेड जिल्ह्याच्या नायगाव आणि बिलोली तालुक्यातल्या जलयुक्त शिवार अभियानाच्या नाला खोलीकरण- रुंदीकरण, नालाबांध, शेततळे, गाळमुक्त धरण आणि शिवार आदी कामांना जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी काल भेटी देन पाहणी केली. या भेटी दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानिक नागरिकांशी चर्चा केली, तसंच शेती विषयक उद्योग प्रकल्पांचीही पाहणी केली.

****

राज्यातल्या साखर कारखान्यांवरच्या कर्जाचं पुनर्गठन करण्यात यावं अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली असल्याचं सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितलं. सोलापूर इथं काल ते बोलत होते. गेल्या दोन वर्षातल्या दुष्काळी परिस्थितीमुळे पुरेशा ऊसाअभावी बहुतांश साखर कारखान्यांचं गाळप पूर्ण क्षमतेनं झालं नाही तर काही कारखाने बंद ठेवावे लागले. या पार्श्वभूमीवर या कारखान्यांवरच्या कर्जाची परतफेड होऊ शकली नाही. मात्र, यंदा ऊस उत्पादन चांगलं आहे तरी, आगामी गळीत हंगामासाठी कारखान्यांना नव्यानं कर्ज पुरवठा आणि आधीच्या कर्जाचं पुनर्गठन गरजेचं असल्याचं सहकार मंत्री देशमुख म्हणाले.

//*******//

No comments: