Saturday, 27 May 2017

AIR NEWS BULLETIN AURANGABAD 27.05.2017 6.50


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date- 27 May 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २७  मे २०१७ सकाळी ६.५०

****

·       केंद्र सरकारच्या निर्णयांमुळे सामान्य माणसाच्या जीवनात बदल - पंतप्रधानांचं  प्रतिपादन

·       पनवेल महापालिकेत भाजप, तर भिवंडी निजामपूर महापालिकेत काँग्रेसला स्पष्ट बहुमत; मालेगाव महापालिकेत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष

·       देशभरातल्या औषध विक्रेत्यांचा येत्या मंगळवारी लाक्षणिक संप

·       सीबीएसई च्या बारावी परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार

आणि

·       लातूर इथून येत्या नोव्हेंबर महिन्यात मुंबई आणि हैदराबाद विमानसेवेला प्रारंभ 



****

केंद्र सरकारनं गेल्या तीन वर्षात घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सामान्य माणसाचं जीवन बदलल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. केंद्र सरकारला काल तीन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधानांनी ट्विटरवर सरकारचं रिपोर्ट कार्ड जारी केलं. सरकारनं विविध क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा याद्वारे त्यांनी आढावा घेतला.

दरम्यान, आसाम आणि अरुणाचल प्रदेश या दोन राज्यांना जोडणाऱ्या ढोला सादिया या देशातल्या सर्वात लांब पुलाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल लोकार्पण केलं. सव्वा नऊ किलोमीटर लांबीच्या या तीन पदरी पुलामुळे देशाचा, ईशान्येकडील राज्यांशी  संपर्क वाढण्या मदत होणार आहे.

****

भाजप सरकारनं देशात अघोषित आणीबाणी जाहीर केली असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. हे सरकार जातीपातीचे राजकारण करत असल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला. गेल्या तीन वर्षात सामान्य जनतेवर अत्याचार वाढले असल्याचं सांगत चव्हाण यांनी महागाई, नोटाबंदी, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, इत्यादी मुद्यांवरूनही सरकारवर टीका केली. कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आर एन पी सिंग यावेळी उपस्थित होते, भाजपा सरकारने गेल्या तीन वर्षात जनतेची फक्त दिशाभूल केली असल्याचं सिंग म्हणाले.

****

वीजेवर धावणाऱ्या वाहनांसंदर्भात राज्यसरकार लवकरच धोरण ठरवणार असल्याच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल नागपूर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात देशातल्या पहिल्या ओला इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशन तसंच मल्टीमॉडेल इलेक्ट्रीक व्हेईकल प्रकल्पाच उद्घाटन केल्यावर बोलत होते. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. अशा वाहनांमुळे प्रदषणाला आळा बसेल, तसंच रोजगाराच्या संधी मिळणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

****

पनवेल, भिवंडी निजामपूर आणि मालेगाव महापालिका निवडणुकीचे निकाल काल जाहीर झाले. पनवेल महापालिकेत भारतीय जनता पक्षाला, तर भिवंडी निजामपूर महापालिकेत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. मालेगाव महानगरपालिकेत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.

पनवेल महापालिकेच्या एकूण ७८ जागांपैकी भाजपनं ५१, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकाप आघाडीनं २७ जागा जिंकल्या. शिवसेनेला मात्र एकही जागा मिळाली नाही.

भिवंडी महापालिकेच्या एकूण ९० जागांपैकी काँग्रेसनं ४७, भाजपनं १९, शिवसेनेनं १२, आरपीआय आठवले गटानं चार, कोणार्क विकास आघाडीनं चार, तर समाजवादी पक्षानं दोन जागा जिंकल्या.

मालेगाव महापालिकेच्या एकूण ८४ जागांपैकी काँग्रेसनं २८, राष्ट्रवादी काँग्रेस २०, शिवसेना १३, भाजप नऊ, एमआयएम सात, जनता दल सहा, तर एक जागा अपक्ष उमेदवारानं जिंकली.  

लातूर जिल्ह्यातल्या रेणापूर नगर पंचायतीच्या निवडणुकीचा निकाल काल जाहीर झाला. यामध्ये एकूण १७ जागांपैकी भाजपनं सर्वाधिक आठ जागा जिंकल्या, काँग्रेसनं सहा, राष्ट्रवादी काँग्रेसनं एक तर अपक्ष उमेदवारांनी दोन जागा जिंकल्या.

****

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला गुरुवारी निलंगा इथं झालेल्या अपघाताच्या चौकशीला कालपासून सुरुवात झाली. अपघातग्रस्त हेलिकॉप्टरची पाहणी करून हेलिकॉप्टरचा ब्लॅकबॉक्स ही ताब्यात घेण्यात आला आहे. निलंगा पोलिस ठाण्यात या अपघाताची नैसर्गिक अपघात अशी नोंद केली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक कल्याण सुपेकर यांनी दिली आहे

****

देशभरातल्या औषध विक्रेत्यांनी येत्या मंगळवारी म्हणजे ३० मे रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारला आहे. ई पोर्टलच्या माध्यमातून औषधांची विक्री करणं आणि ऑनलाईन फार्मसी सुरू करण्याबाबत सरकारच्या प्रस्तावाविरोधात किरकोळ आणि घाऊक औषध विक्रेत्यांनी हा बंद पुकारला आहे. 

दरम्यान, अन्न आणि औषध प्रशासनानं हा संप मागे घेण्याचं आवाहन केलं असून, सर्व शासकीय रुग्णालयांना औषधांचा पुरेसा साठा असेल याची दक्षता घेण्याची सूचना केली आहे.

****

गायी किंवा इतर गुरं कत्तलखान्यांना विकण्यावर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे. फक्त शेतकरी किंवा शेतजमिनीच्या मालकांनाच गुरांची विक्री करता येऊ शकेल, असा अध्यादेश केंद्र सरकारनं काढला आहे. हा नवा नियम लागू केल्यामुळे प्राण्यांच्या व्यापारावर बंधन येणार आहे.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारित केलं जात आहे, आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

केंद्रीय माध्यमिक परीक्षा मंडळ-सीबीएसई च्या बारावी परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना हे निकाल “सीबीएसई रिझल्टस डॉट एनआयसी डॉट इन” आणि “सीबीएसई डॉट एनआयसी डॉट इन” या संकेतस्थळावर पाहता येतील.

दरम्यान, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या निकालाची तारीख येत्या सोमवारी जाहीर होणार आहे.

****

येत्या नोव्हेंबर महिन्यापासून लातूर मुंबई आणि लातूर हैदराबादला विमानसेवा सुरू होणार असल्याचं लातूरचे खासदार सुनिल गायकवाड यांनी सांगितलं. केंद्र सरकारच्या त्रिवर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते. पुढील दोन वर्षाच्या काळात लातूर इथं आकाशवाणी केंद्र स्थापन करणार असल्याचंही ते यावेळी म्हणाले.  

****

भारतीय जनता पक्षाच्या शिवार संवाद अभियानांतर्गत स्वच्छता आणि पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी काल परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांशी संवाद साधला. पालम तालुक्यात नाव्हा आणि गंगाखेड तालुक्यात धारासूर इथं लोणीकर यांनी शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन शासकीय योजनांची माहिती दिली.

****

अहमदनगर मनमाड मार्गावर काल रात्री एका जीप अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला. दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात, चालकाचं नियंत्रण सुटल्यानं, ही गाडी एका झाडाला आदळून हा अपघात झाला. मृतांमध्ये राहुरी तालुक्यातल्या वरवंडी या गावाचे सरपंच सचिन ढगे यांचा समावेश आहे.

****

औरंगाबाद जालना मार्गावर बदनापूर इथं एका जीप चालकाला गाडी चालवत असताना, हृदयविकाराचा झटका आल्यामुळे झालेल्या अपघातात चालकाचा मृत्यू झाला तर अन्य नऊ जण जखमी झाले. काल दुपारी हा अपघात झाला.

****

हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यातल्या काही भागातही काल दुपारी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसानं तापमानात काहीशी घट जाणवली मात्र, केळीच्या पिकाचं नुकसान झालं आहे.

****

बीड इथल्या विठाई नर्सिंग महाविद्यालयाचे प्राचार्य राणा डोईफोडे याना विद्यार्थिनींशी अश्लील चाळे केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी काल अटक केली. राणा डोईफोडे हे भाजपच्या बीड जिल्हा परिषदेच्या सदस्या सारिका डोईफोडे यांचे पती आहेत.

****

लातूरचे महापौर सुरेश पवार आणि उपमहापौर देविदास काळे यांनी काल आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. स्वच्छ आणि पारदर्शक कारभाराच्या माध्यमातून लातूरकरांचा विश्वास सार्थ ठरवू असा विश्वास महापौर पवार यांनी यावेळी व्यक्त केला

****

औरंगाबाद इथल्या साई अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कॉपी प्रकरणात संस्थाचालक आणि संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसनं केली आहे. यासंदर्भात संघटनेनं काल कुलगुरू डॉ बी ए चोपडे यांना एक निवेदन सादर केलं.

****

परभणी इथल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात येत्या २९ ते ३१ मे दरम्यान कृषी संशोधन आणि विकास समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. कुलगुरु डॉक्टर बी व्यंकटेश्वरलू यांनी काल वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. या बैठकीदरम्यान राज्यातल्या चारही कृषी विद्यापीठांनी केलेलं संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे.

****

राज्यातल्या शून्य ते अठरा या वयोगटातल्या बालकांच्या आधार नोंदणीचं काम पूर्ण करण्यासाठी तीन हजार ६०० अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि ५०० ग्रामीण रुग्णालयांना जून महिन्या अखेर टॅबदेण्यात येणार आहेत. मुख्य सचिव सुमित मलिक यांनी काल मुंबई इथं ही माहिती दिली.

****

पंजाबचे माजी पोलिस महासंचालक के पी एस गिल यांचं काल दिल्लीत निधन झालं, ते ८२ वर्षांचे होते. भारतीय हॉकी महासंघाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं. नागरी सेवेतल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना १९८९ साली पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं.

****

No comments: