Tuesday, 2 May 2017


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date- 02 May 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २ मे २०१७ सकाळी ६.५०

****

·   ट्रान्सफॉर्म महाराष्ट्रकार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र पथक तयार करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

·    आधुनिक, प्रगत आणि सक्षम महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी जनतेकडून सहकार्याची राज्यपालांची अपेक्षा

·  अनुदानित गॅस सिलिंडर आणि रॉकेलच्या दरावाढ; मात्र विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात घट

आणि

·  मराठवाड्यात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा



****

नव महाराष्ट्र घडवताना युवा-युवतींच्या संकल्पनांच्या पंखांना बळ देऊन त्या संकल्पना विकासात परावर्तित करण्याचे काम राज्यशासन करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. काल मुंबईत ट्रान्सफॉर्म अर्थात बदलता महाराष्ट्र’ या कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र पथक तयार करण्यात येणार असून राज्याचा संपूर्णपणे विकास होईपर्यंत ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र’ कार्यक्रम सुरूच राहील, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

या कार्यक्रमात सुमारे सहा लाख युवकांनी सहभाग नोंदवला, विविध संकल्पानांवर युवकांकडून प्राप्त झालेल्या दोन हजार तीनशे सादरीकरणांपैकी निवडक ११ प्रकल्प यावेळी सादर करण्यात आले.

एक स्वतंत्र पथक या सादरीकरणांचा अभ्यास करून त्यांच्या अंमलबजावणीसाठी आराखडा तयार करेल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

दरम्यान, काल कोल्हापूर इथं तीनशे तीन फूट उंच ध्वजस्तंभाचं मुख्यमंत्र्यांनी लोकार्पण केलं. देशातल्या दुसऱ्या क्रमांकाच्या तर राज्यातल्या सर्वात उंच ध्वजस्तंभावर डौलाने फडकणाऱ्या या राष्ट्रध्वजावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.

****

आधुनिक, प्रगत आणि सक्षम महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी व्यक्त केली आहे. काल ५७ व्या महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईतील शिवाजी पार्क इथं ध्वजारोहण केल्यानंतर ते बोलत होते. सर्वांच्या एकत्रित सहभागातून आपलं राज्य विकसित आणि समृद्ध बनवू या, असं आवाहन राज्यपालांनी केलं.आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त राज्यपालांनी राज्यातील सर्व कामगारांना शुभेच्छा दिल्या. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी प्राणांची आहुती दिलेल्या हुतात्म्यांना त्यांनी आदरांजली अर्पण केली.

संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मारकावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काल पुष्पचक्र अर्पण करून, अभिवादन केलं. 

****

उद्योजकांच्या सोयीसाठी कामगार कायद्यात बदल करून कामगारांना देशोधडीला लावण्याचे प्रयत्न केंद्र आणि राज्य सरकार करत असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केला आहे. काल महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईत हुतात्मा स्मारकाला अभिवादन तसंच टिळक भवनात ध्वजारोहण केल्यावर ते बोलत होते.

काँग्रेस सरकारांनी राबविलेल्या धोरणामुळे महाराष्ट्रात उद्योगधंद्याची भरभराट होऊन कामगारांच्या हिताचं रक्षण झालं. पण विद्यमान सरकार कामगारविरोधी असल्याची टीका त्यांनी केली. कामगार आणि कष्टकऱ्यांच्या हितासाठी काँग्रेस पक्ष तीव्र संघर्ष करेल असा इशारा चव्हाण यांनी दिला.

****

शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी शेतकरी कर्जमाफी आवश्यक असून, त्यासाठी विधीमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी विरोधी पक्षांकडून केली जात आहे. या मागणीसाठी विरोधी पक्षांचे शिष्टमंडळ आज सकाळी राजभवनात राज्यपाल सी विद्यासागर राव यांची भेट घेणार आहे. विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही माहिती दिली.

****

अनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात एक रुपया ८७ पैसे तर रॉकेलच्या दराप्रतिलीटर २६ पैशांची वाढ करण्याचा निर्णय तेल विपणन कंपन्यांनी काल घेतला. ही दरवाढ तत्काळ लागू करण्यात आली आहे. विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात मात्र ९२ रुपये कपात करण्यात आली आहे.

****

सोलापूरच्या दुधणी स्थानकादरम्यान इंजिनसहित मालगाडीचे पाच डबे घसरल्यामुळे या मार्गावरची रेल्वे वाहतूक काल विस्कळीत झाली. रेल्वे रूळाला तडे गेल्यानं वाडीहून होटगीला जाणारी ही मालगाडी घसरल्याचं रेल्वे प्रशासनानं सांगितलं. यामुळे दक्षिण भारताकडे जाणाऱ्या गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारित केलं जात आहे, आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

५७ वा महाराष्ट्र दिन मराठवाड्यात ठिकठिकाणी ध्वजारोहण करून साजरा करण्यात आला.

औरंगाबाद इथं जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी केलेल्या भाषणात कदम यांनी, महाराष्ट्राचं विभाजन न करता, कर्नाटकातला मराठी भागही महाराष्ट्रात जोडण्याचा प्रयत्न करावा, असं नमूद केलं. जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत झालेल्या कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं, ते म्हणाले......



संयुक्त महाराष्ट्र झालाच.महाराष्ट्राला मुंबई देखिल मिळालीच.पण ज्या दिवशी खऱ्या अर्थानं बेळगाव, कारवाड, धारवाड,निपाणीसह एकसंघ असा हा महाराष्ट्र होईल.त्यावेळी खऱ्या अर्थानं आम्हाला समाधान मिळेल असं मला वाटतं.शेती चांगली फुलली आहे,पिकलेली आहे, हिरवीगार झालेली आहे मराठवाड्यामध्ये, अनेक ठिकाणी जलकुंभ भरलेले पहायला मिळाले.आणि म्हणून मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धन्यवाद दिले पाहिजे.एक चांगली योजना त्यांनी सबंध मराठवाड्यासाठी घेतली महाराष्ट्रासाठी घेतली पाणी आडवलं, मला उध्दवजींचे आभार मानले पाहिजे शिवजलक्रांती योजनेच्या माध्यमातून अनेक ठिकाणी मराठवाड्यात पाणी अडवून पाणी साठवण्याचं काम हे उध्दवजीनीं केलं.

जालना इथं  पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्याहस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं.

जिल्ह्यात जालना, परतूर आणि मंठा तालुक्यातल्या १७६ गावांना ग्रीडद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी २३४ कोटी रुपये निधीतून योजना तयार होत आहे. आगामी काळात या योजनेच्या माध्यमातून मराठवाड्याला शुद्ध पाणी पुरवठा करण्याचं नियोजन असल्याचं पाणी पुरवठा मंत्र्यांनी सांगितलं. 

      बीड इथं पोलिस कवायत मैदानावर पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. बीड हा कष्टकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. सर्वसामान्य जनता आणि शेतकरी यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आपण प्रयत्नशील असल्याची ग्वाही मुंडे यांनी यावेळी दिली. पावसामुळ निर्माण झालेलं शाश्वत पाणीसाठ्याचं श्रेय जलयुक्त शिवार अभियानाला जातं. बीड जिल्हा आता दुष्काळमुक्तीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचा, आपल्याला अभिमान आहे असंही पालकमंत्र्यांनी नमूद केलं.

      लातूर इथं पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी ध्वजारोहण केलं. “उन्नत शेती समृध्द शेतकरी” या मोहिमेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचं आवाहन निलंगेकर यांनी यावेळी केलं.

      उस्मानाबाद इथं पालकमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी केलेल्या भाषणात रावते यांनी शेती क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी या खरीप हंगामात शेतीची उत्पादकता वाढवणं हे मुख्य उद्दीष्ट असल्याचं सांगितलं. ते म्हणाले...

यावर्षी उत्पादकता वाढवणं हे उद्दिष्ट असून उन्नत शेती आणि समृध्द शेतकरी हा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. शेतकरी गट, शेतकरी कंपन्यांची निर्मिती करून गावपातळीवर समुह तयार करून त्याची कृषी भांडवल उपल्बध करून देण्यात येणार आहे.यावर्षी जलयुक्त शिवारच्या कामाला गतीमानता देऊन शेततळी, विहिरींची कामे, मिशन म्हणून युध्दपातळीवर करण्याचा प्रयत्न करण्यात येईल.



पालकमंत्री रावते यांच्या हस्ते यावेळी आदर्श तलाठी, जिल्हा उद्योजक तसंच क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आले. अवैध सावकारांनी बळकावलेली ३० एकर शेतजमीन पालकमंत्र्यांच्या हस्ते मूळ मालकांना परत करण्यात आली.

      परभणी इथं प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलावर जिल्हाधिकारी पी शिवशंकर यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं. ध्वजारोहणानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते धावपटू ज्योती गवते हिचा सत्कार करण्यात आला.

      हिंगोली इथं संत नामदेव पोलिस कवायत मैदानावर सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं. पोलीस प्रशासनाच्या वतीनं तयार करण्यात आलेल्या ‘दामिनी एक स्वयंपूर्णा’ या पुस्तिकेचं प्रकाशनही पालकमंत्री कांबळे यांच्या हस्ते करण्यात आलं.

      नांदेड इथं पोलिस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर राज्याचे पशूसंवर्धन राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं. पोलिस परेडचं निरीक्षण करून पालकमंत्र्यांनी मानवंदना स्वीकारली.

महाराष्ट्र दिनानिमित्त काल सर्वच जिल्हा मुख्यालयात संबंधित पालकमंत्र्यांच्या हस्ते, आदर्श तलाठी पुरस्कार प्रदान करण्यात आले. उल्लेखनीय काम करणारे पोलिस तसंच महसुली अधिकारी कर्मचारी, स्मार्ट ग्राम योजनेत उल्लेखनीय काम करणाऱ्या ग्रामपंचायती, यशस्वी लघुउद्योजक, क्रीडापटू, विद्यार्थी यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.

****

औरंगाबाद शहरातील रस्त्यांच्या कामासाठी १५० कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकत्र येऊन रस्ते बांधकामाचं योग्य नियोजन करावं, असं आवाहन पालकमंत्री रामदास कदम यांनी केलं आहे. शहरातल्या अंतर्गत रस्ते कामाचं उद्घाटन पालकमंत्री कदम यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते.

****




No comments: