Wednesday, 3 May 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 03.05.2017 - 05.25pm


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 03 May 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३ मे  २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

आजारांपासून बचाव करण्यासाठी सर्वसमावेशक आणि प्रतिबंधक उपचार ही काळाची गरज असून, त्यासाठी स्वच्छता, योग आणि आयुर्वेद, ही त्रिसूत्री आचरणात ठेवावी, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे. हरिद्वार इथं पतंजली योगपीठात आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते. यावेळी मोदी यांच्या हस्ते पतंजली संशोधन केंद्राचं उद्घाटन आणि आयुर्वेद विश्वकोषाचं प्रकाशन झालं योगगुरू रामदेव, यांनी योग सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवला, असं नमूद करत, यशस्वी जीवनासाठी निरोगी शरीर आवश्यक असल्यामुळे युवकांनी योग करावा, असं आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केलं. सार्वजनिक जीवनात स्वच्छता बाळगणं, हे देशकार्यच आहे, असं सांगत, त्यांनी स्वच्छ भारत घडवण्याचा संकल्प करण्याचं आवाहन नागरिकांना केलं.

****

जम्मू आणि काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानच्या सीमा कृती दलानं केलेल्या भारतीय जवानांच्या मृतदेहांच्या विटंबनेच्या प्रकरणी आज भारतानं पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांना समन जारी केलं असून, यासाठी जबाबदार असलेल्या पाकिस्तानी सैनिकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ही कृती नियमबाह्य आणि अमानवीय आहे, अशा शब्दात काल भारतानं या घटनेचा निषेध नोंदवला होता.
दरम्यान, या अमानवीय कृत्यामध्ये पाकिस्तानी सैन्याचा हात असल्याचे पुरेसे पुरावे भारताकडे आहेत, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाल बागले, यांनी म्हटलं आहे. या कृतीला उद्युक्त करणारी कृती म्हणून पाहिलं जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. पाक उच्चायुक्त बासित यांनी भारताचं म्हणणं पाक सरकारपर्यंत पोहचवण्याचं मान्य केलं आहे, असंही बागले यांनी सांगितलं.

****

पंचवीस बँकांची सुमारे दोन हजार सहाशे पन्नास कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सक्त वसुली संचालनालयानं मुंबईतल्या एका कंपनीच्या संचालकाला अटक केलं आहे. झूम डेवेलपर्स प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या या कंपनीनं विविध बँकांकडून कर्जं घेऊन नंतर ती परत न केल्याचं स्पष्ट झालं असून, हे देशातल्या सर्वात मोठ्या कर्ज घोटाळ्यांमधलं एक प्रकरण असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. या कंपनीचा संचालक विजय चौधरी याला सक्त वसुली संचालनालयानं काल अवैध संपत्ती बाळगण्याच्या आरोपावरून अटक केलं.

****

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात तूर खरेदीसंदर्भात राज्यशासनाच्या विरोधात तक्रार दाखल झाली आहे. या याचिकेवर आज झालेल्या सुनावणीदरम्यान, केंद्र सरकारलाही प्रतिवादी करण्याची मुभा न्यायालयानं दिली. त्यानुसार, केंद्रसरकारला उद्या न्यायालयात तूरखरेदी संदर्भात माहिती द्यावी लागणार आहे. तूर आयातीबद्दलही माहिती देण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत.

****

नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यातल्या तेरा गावांमध्ये गेल्या रविवारी झालेल्या गारपिटीत सुमारे सहाशे ते सातशे हेक्टर क्षेत्रातल्या पिकांचं नुकसान झाल्याचं स्पष्ट झालं आहे. या गावातल्या द्राक्षं, डाळिंब,कांदा आणि भाजीपाल्याचं मोठं नुकसान झाल्याचं तालुका कृषी विभागाच्या अहवालात म्हटलं आहे. दरम्यान, या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून सरकारनं तातडीनं शासकीय मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट रविंद्र पगार यांनी केली आहे. गारपीटग्रस्त भागाची आमदार अनिल कदम यांनी पाहणी केली असून, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्याचं आश्वासन दिलं आहे.

****

मुख्यमंत्र्यांशी थेट संवाद साधण्याची संधी देणाऱ्या, ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’, या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस युवकांशी संवाद साधणार आहेत. ‘शिक्षण क्षेत्रातील सुधारणा’ या विषयावरचे आपले प्रश्न विद्यार्थ्यांना येत्या शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत एमएमबी डॉट डीजीआयपीआर ॲट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर पाठवता येणार आहेत.

****

सातारा जिल्ह्यातलं भिलार हे गाव देशातलं पहिलं पुस्तकांचं गाव म्हणून साकारत असून या पुस्तकांच्या गावाचं उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. कथा, कादंबरी, बालसाहित्य, स्त्रीसाहित्य, संतसाहित्य, चरित्रं अशा एकूण पंचवीस साहित्यप्रकारांची पंधरा हजारहून जास्त पुस्तकं या गावात उपलब्ध करून देण्यात आली आहेत. गावातली घरं, मंदिरं, शाळा, लॉजेस अशा पंचवीस ठिकाणी ही पुस्तकं ठेवलेली आहेत. राज्यशासनाच्या आवाहनाला या गावानं दिलेल्या प्रतिसादामुळे, पुस्तकांचं गाव, ही शासनाची कल्पना प्रत्यक्षात आली आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी साहित्य महोत्सवासह इतर अनेक साहित्यिक कार्यक्रम आयोजित केले जाणार असल्याची माहिती मराठी भाषा विभागाचे मंत्री विनोद तावडे, यांनी दिली आहे.
****

No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 31.05.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 31 May 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्र...