Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 21 January 2018
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ जानेवारी २०१८ सकाळी ७.१० मि.
****
Ø विरोधी पक्ष घटनात्मक संस्थांना बदनाम करत असल्याचा पंतप्रधानांचा
आरोप
Ø गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेत राज्यात दोन कोटी ६० लाख
बालकांचं लसीकरण
Ø
औरंगाबाद इथं सुरु असलेल्या ‘दहाव्या शार्ङ्गदेव संगीत महोत्सवाचा’ समारोप
आणि
Ø
आगामी
शैक्षणिक वर्षापासून सगळ्या शाळांमध्ये खेळ हा विषय अनिवार्य - केंद्रीय मंत्री प्रकाश
जावडेकर- खेलो इंडिया स्पर्धेत ८५ सुवर्ण पदकांसह महाराष्ट्र अव्वल
****
विरोधी पक्ष घटनात्मक संस्थांना बदनाम करत असल्याचा
आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. राज्यातल्या हातकणंगले, कोल्हापूर, माढा,
सातारा आणि दक्षिण गोव्यातल्या भाजपच्या बुथ पातळीवरच्या कार्यकर्त्यांशी पंतप्रधानांनी
काल दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. विरोधकांच्या
महाआघाडीमध्ये सहभागी पक्षांनी, आयोजित केलेल्या सभेत फक्त कौटुंबिक राजकारणाला चालना
दिली, भाजपनं मात्र देशाचे नागरिक आणि त्यांच्या अपेक्षांशी आघाडी केल्याचं पंतप्रधान
म्हणाले. खुल्या प्रवर्गातल्या आर्थिक मागासवर्गीयांना नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देण्याचा
निर्णय हा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेतल्याचा विरोधकांचा आरोप पंतप्रधानांनी यावेळी
फेटाळून लावला.
****
तामिळनाडू संरक्षण औद्योगिक मार्गिकेचं उद्घाटन संरक्षणमंत्री
निर्मला सीतारामन यांच्या हस्ते काल झालं. यावेळी त्रिची रायफलसह चार नवीन शस्त्रास्त्रं,
संरक्षण दलात सामील करण्यात आली. तामिळनाडू मार्गिकेची त्रिची सालेम, होसूर, कोवई,
मदुराई आणि चेन्नईमध्ये उपकेंद्रं असतील, असं संरक्षण उत्पादन सचिव डॉ. अजय कुमार यांनी
सांगितलं.
****
खुल्या प्रवर्गातल्या आर्थिक मागासवर्गीयांना नोकरी
आणि शिक्षणात आरक्षण देण्याचा सरकारचा निर्णय ऐतिहासिक असल्याचं केंद्रीय सामाजिक न्याय
राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. उत्तर प्रदेशातल्या लखनौ इथं ते काल वार्ताहरांशी
बोलत होते. यासंबंधीचं विधेयक संसदेत पारित करण्यात आलं असून, राष्ट्रपतींनीही या विधेयकाला
मंजुरी दिल्यानं या निर्णयाला न्यायालयात आव्हान देता येणार नाही, असं ते म्हणाले.
दरम्यान, केंद्र सरकारनं यासंदर्भातली अधिसूचना जारी
केली असून, एक फेब्रुवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होणार असल्याचं, याबाबतच्या
वृत्तात म्हटलं आहे.
****
मुंबईत इंदू मील परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांचं स्मारक दोन हजार वीस पर्यंत पूर्ण होईल, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी दिलं आहे. नागपूर इथं काल भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अनुसूचित जाती
मोर्चाच्या ‘भीम संकल्प २०१९’ या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी
ते बोलत होते. महाआघाडीला सामाजिक न्याय नको, तर सत्ता हवी असल्याचं सांगून त्यांनी
विरोधी पक्षांवर टीका केली. वंचितांसाठी सर्व प्रकारचं काम करण्यास सरकार कटीबद्ध असल्याचं
मुख्यमंत्री म्हणाले.
****
गोवर-रुबेला
लसीकरण मोहिमेत राज्यात दोन कोटी ६० लाख बालकांचं लसीकरण झालं असून, ८४
टक्के उद्दिष्ट साध्य झालं आहे. आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत ही माहिती
दिली. उस्मानाबाद, लातूर, पुणे, नाशिक या चार जिल्ह्यांत ग्रामीण भागातलं लसीकरण शंभर
टक्के झालं असून, औरंगाबाद, हिंगोली, नांदेड, परभणी, आणि
अहमदनगर सह १४ जिल्ह्यांतल्या ग्रामीण भागात ९० टक्क्यांहून अधिक बालकांचं
लसीकरण पूर्ण झालं आहे. या मोहिमेत ज्या बालकांचं लसीकरण झालं नाही, अशांसाठी
शाळांमध्ये दुसरा टप्पा सुरू केला
आहे. या लसीकरणाबाबत शंकांचं योग्य
निरसन झाल्यामुळे पालक, आणि
शाळा देखील लसीकरणासाठी पुढाकार घेताना
दिसत आहेत, असं ते म्हणाले.
****
लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी संदर्भात
२८ आणि २९ जानेवारीला राज्य निवड मंडळाची बैठक होणार आणि त्यातून केंद्रीय समितीकडे
प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याचं, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी
सांगितलं. अहमदनगर इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. समविचारी पक्षांना सोबत
घेऊन ही निवडणूक लढवणार असल्याचं, त्यांनी सांगितलं. वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन
जागा वाटप ठरवलं जाणार असल्याचं, त्यांनी नमूद केलं.
****
प्रसिद्ध संशोधक भारतरत्न सी एन राव यांना पहिला
शेख सौद आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. संयुक्त अरब अमिरातीच्या सेंटर फॉर
अॅडव्हान्स मटेरियल्स या संस्थेकडून हा पुरस्कार दिला जाणार आहे.
स्मृतीचिन्ह, आणि एक लाख अमेरिकी डॉलर असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
औरंगाबाद इथं सुरु असलेल्या ‘दहाव्या शार्ङ्गदेव संगीत महोत्सवाचा’
आज समारोप होत आहे. महात्मा गांधी मिशनतर्फे या तीन दिवसीय महोत्सवाचं आयोजन करण्यात
आलं होतं. यात, काल सायंकाळच्या अखेरच्या सत्रात तेलंगणाच्या लोककलेतलं यक्षगानम्,
पंडीत बलभीम आणि कपिल जाधव यांचं सुंद्री वादन, आणि उस्ताद अहसान आणि आदिल हुसैन खान
यांनी सुफी कव्वाली सादर केली. आज दिवसभराच्या दोन सत्रात, सामगान आणि वाचिक
अभिनयावर पियाल भट्टाचार्य आणि शिल्पनृत्य विषयावर करुणा विजयेंद्र यांच्या कार्यशाळेच्या
समापनानं, यंदाच्या महोत्सवाचा समारोप होईल.
****
आगामी शैक्षणिक वर्षापासून सगळ्या शाळांमध्ये खेळ
हा विषय अनिवार्य करण्यात येणार असून, दररोज एक तास खेळासाठी राखीव ठेवला जाईल, असं
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं आहे. पुणे इथं काल खेलो
इंडिया युवा स्पर्धेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. शैक्षणिक सत्रात दहा टक्के आरक्षणाच्या
निर्णयाची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षापासून केली जाणार असल्याचं, जावडेकर यांनी
सांगितलं. यजमान महाराष्ट्रानं ८५ सुवर्ण पदकांसह ६२ रौप्य आणि ८१ कांस्य पदकं अशी
एकूण २२८ पदकं पटकावून खेलो इंडिया स्पर्धेत अव्वल स्थान मिळवलं. हरियाणानं ६२ सुवर्ण,
५६ रौप्य आणि ६० कांस्य पदकांसह दुसरं तर ४८ सुवर्ण, ३७ रौप्य आणि ५१ कांस्य पदकांसह
दिल्लीनं तिसरं स्थान पटकावलं. केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनी
उत्कृष्ट कामगिरीसाठी महाराष्ट्राचं अभिनंदन केलं आहे.
****
वर्धा - नांदेड या प्रगतीपथावर असलेल्या नवीन रेल्वे
मार्गाकरिता राज्य शासनाच्या वतीनं अर्थसंकल्पात तरतूद झालेल्या निधीपैकी शंभर कोटी
रुपये निधी वितरीत करण्यास सरकारनं मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय काल जारी
करण्यात आला. वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार रामदास तडस यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे
ही माहिती दिली.
****
मालवाहतुक करणाऱ्या मोठ्या वाहनांना हिंगोली इथं
वाहनतळ उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी जिल्हा मोटार मालक संघाच्यावतीनं काल हिंगोली-नांदेड
मुख्य रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी मोठ्या संख्येनं वाहन मालक-चालक
या आंदोलनात सहभागी झाले होते. वारंवार मागणी करूनही जागा उपलब्ध करून दिली जात नसून,
मागणी मान्य न झाल्यास २५ जानेवारी रोजी उपोषणाचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. या आंदोलनामुळे
हिंगोली - नांदेड रस्त्यावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
****
लातूर इथं काल पर्यावरण रक्षणाच्या जनजागृतीसाठी
सायकल रॅली काढण्यात आली. जिल्हा क्रीडा संकुलापासून राजीव गांधी चौक ते पुन्हा क्रीडा
संकुल या मार्गावर ही रॅली काढण्यात आली. यामध्ये
विद्यार्थ्यांसह नागरिकांनीही मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला. पेट्रोलियम संरक्षण
संशोधन संघ, पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाच्यावतीनं या रॅलीचं आयोजन करण्यात
आलं होतं.
****
जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये
तुरीला उच्चांकी सहा हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळत असल्याचं आमच्या वार्ताहरानं
कळवलं आहे. यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. मागील आठडाभरापासून जालना
कृषी बाजार समितीत तुरीची आवक वाढली असून चालू हंगामात बाजार समितीमत आतापर्यंत लाल
आणि पांढऱ्या एकूण सुमारे दीड लाख क्विंटल तुरीची आवक झाली आहे.
****
लातूर इथं काल सर्वोत्कृष्ट आशा स्वयंसेविका आणि
गटप्रवर्तक यांसह वैद्यकीय अधिकाऱ्यांना पुरस्कार आणि प्रमाणपत्र प्रदान करुन सन्मानीत
करण्यात आलं. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलतांना पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर
यांनी, आशांच्या वेतन विषयक मागणीचा प्रश्न
मार्गी लावणार असल्याचं नमूद केलं. आशा स्वयंसेविकांसाठी किमान बारा हजार रुपये
वेतन लागू करण्याची शिफारस वेतन मंडळाकडे केली जाईल असं ते म्हणाले.
****
समुध्दी महामार्गाला राजमाता जिजाऊंचं
नाव द्यावं अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीनं बुलडाणा जिल्ह्यातल्या संग्रामपूर तालुक्यात वरवट इथं
जाहीर संवाद यात्रेत ते बोलत होते. राज्य आणि केंद्र सरकार जनतेची दिशाभूल करत असल्याचं
ते म्हणाले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची परिवर्तन यात्रा आज औरंगाबाद
जिल्ह्यात येत आहे. कन्नड, वैजापूर, गंगापूर, बजाजनगर
याठिकाणी जाहीर सभा होणार असल्याचं आमदार सतीश चव्हाण यांनी सांगितलं.
****
पालघर जिल्ह्याच्या डहाणू तालुक्यात काल संध्याकाळी
पावणे सातच्या सुमारास भूकंपाचा धक्का जाणवला. रिश्टर स्केलवर या धक्क्याची तीव्रता
तीन पूर्णांक सहा दशांश असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
महावितरण कंपनी, वीज आकार देयकावर ‘मीटर रिडींगचं’
छायाचित्र देण्याची पद्धत बंद करणार आहे. येत्या एक फेब्रुवारीपासून हा निर्णय लागू
होईल. ग्राहकांना त्यांच्या भ्रमणध्वनीवर एस.एम.एस.द्वारे मीटर रिडींगची अद्ययावत माहिती
दिली जाते, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.
*****
***
No comments:
Post a Comment