Monday, 21 January 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 21.01.2019 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

  जानेवारी  २०१९ सकाळी ११.०० वाजता

****



उत्तर प्रदेशातल्या वाराणसी इथं आज युवा प्रवासी भारतीय दिवस आणि उत्तर प्रदेश भारतीय दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाचं उद्घाटन, परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते झालं. केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री कर्नल राज्यवर्धन सिंह राठोड या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. प्रवासी भारतीयांमुळे भारताची ओळख जगभरात पोहोचली असल्याचं राठोड यावेळी म्हणाले.



 दरम्यान, पंधराव्या प्रवासी भारतीय दिवसाच्या निमितानं आयोजित संमेलनालाही आजपासून वाराणसी इथं सुरुवात होत आहे. तीन दिवसांच्या या कार्यक्रमात सुमारे सहा हजार अनिवासी भारतीय सहभागी होतील, असा अंदाज आहे. 'नव्या भारताच्या निर्मितीत अनिवासी भारतीयांची भूमिका' ही यावर्षीची संकल्पना आहे. मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंदकुमार  जुगनाथ यांच्यासह भारतीय वंशाचे जगभरातले नेते या संमेलनाला उपस्थित राहणार आहेत.

****



 उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं सुरु असलेल्या अर्धकुंभमेळ्यात आज पौष पौर्णिमेनिमित्त मुख्य स्नानाला सुरुवात झाली. मुख्य स्नानासाठी प्रयागराज इथं भाविकांनी गर्दी केली आहे. आजपासून एका महिन्याचा कल्पवास सुरु झाला असून, यादरम्यान संगम क्षेत्रात असलेल्या छोट्या तंबूंमध्ये लाखो भाविक एक महिना मुक्काम करणार आहेत.

****



 मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा या राज्यांचा आज स्थापना दिवस. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. एका वर्षापेक्षा कमी कालावधीत या राज्यांनी उल्लेखनीय प्रगती केली असून, या राज्यांच्या अशाच निरंतर प्रगतीची अपेक्षा पंतप्रधानांनी ट्विटर संदेशाद्वारे व्यक्त केली आहे.

****



 महावितरण कंपनी, वीज आकार देयकावर ‘मीटर रिडींगचं’ छायाचित्र देण्याची पद्धत बंद करणार आहे. येत्या एक फेब्रुवारीपासून हा निर्णय लागू होईल. ग्राहकांना त्यांच्या भ्रमणध्वनीवर एस.एम.एस.द्वारे मीटर रिडींगची अद्ययावत माहिती दिली जाते, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. ग्राहकांना आपला अधिकृत भ्रमणध्वनी क्रमांक ‘नऊशे बावीस पंचावन्न, नऊशे बावीस पंचावन्न ’ या भ्रमणध्वनी क्रमांकावर नोंदवता येईल.

*****

***

No comments: