Sunday, 27 January 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 27.01.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 27  january 2019

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २७   जानेवारी २०१९  दुपारी १.०० वा.

****

मतदार होणं, मताधिकार प्राप्त करणं, हा नागरिकाच्या आयुष्यातला महत्वपूर्ण टप्पा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून ते आज देशवासीयांशी संवाद साधत होते. या मालिकेचा आज ५२वा भाग प्रसारित झाला. २१व्या शतकात जन्मलेल्या युवकांसाठी ही मतदानाची पहिलीच संधी असून, त्यांच्यासाठी देशाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेण्याची वेळ आली असल्याचं सांगून पंतप्रधानांनी, युवकांना मतदान करण्याचं आवाहन केलं. भारतात ज्या विशाल स्तरावर निवडणुकीचं आयोजन केलं जातं, ते पाहून जगातल्या लोकांना आश्चर्य वाटत असल्याचं ते म्हणाले. आपला निवडणूक आयोग ज्या कुशलतेनं त्याचं व्यवस्थापन करतो, ते पाहून प्रत्येक देशवासीयाला निवडणूक आयोगाबद्दल अभिमान वाटत असल्याचंही पंतप्रधानांनी नमूद केलं.



 भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोनं नुकतंच विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कलामसॅट या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केल्याचा पंतप्रधानांनी उल्लेख केला. भारत आज केवळ विकसनशील देशच नव्हे, तर विकसित देशांचे सॅटेलाईट्सही प्रक्षेपित करतो. मुलांनी वेगळा विचार करून आतापर्यंत ज्या मर्यादांच्या पुढे जाणं अशक्य वाटत होतं, त्याही पुढे जाण्याची संधी देशाचा अंतराळ कार्यक्रम देतो, असं त्यांनी सांगितलं. नवीन नवीन ताऱ्यांचा शोध लावण्यासाठी मुलांना प्रेरित करण्याचा सरकारचा दृष्टीकोन असल्याचं पंतप्रधान म्हणाले.



 पुण्यात नुकत्याच झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेतल्या विजेत्यांचं त्यांनी अभिनंदन केलं. पदक जिंकणाऱ्या अनेक खेळाडूंचं जीवन हे प्रेरणा देणारं असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं.



 देशात सर्वत्र स्वच्छ शौचालय स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं ते म्हणाले. सर्व सरपंच आणि गाव प्रमुखांनी आपल्या पंचायतीत या मोहिमेचं नेतृत्व करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं.



 आगामी परीक्षांसाठी पंतप्रधानांनी विद्यार्थी, आई वडील आणि शिक्षकांना शुभेच्छा दिल्या.



 २३ जानेवारीला देशवासीयांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी केल्याचं सांगून पंतप्रधानांनी, नेताजींच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. त्याचबरोबर येत्या १९ फेब्रुवारीला संत रविदास यांची जयंती असल्याचं सांगून, त्यांनी रविदास यांना अभिवादन केलं. कर्नाटकातल्या तुमकुर जिल्ह्यातले श्री सिद्धगंगा मठाचे श्री श्री शिवकुमार स्वामीजी यांच्या आठवणींना उजाळा देत पंतप्रधानांनी, त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. येत्या ३० जानेवारीला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी. यानिमित्त नागरिकांनी दोन मिनिटं मौन पाळून हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्याचं आवाहन त्यांनी केलं.

****



 देशात उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं स्टार्टअप इंडिया आणि नियमांमधला बदल शा विविध माध्यमांतून उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी चांगल्या वातारवणाची निर्मिती केली असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. एका वृत्त विषयक संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. सरकारनं नियामक कायद्यांमध्ये सुधारणा, स्टार्टअपच्या व्याखेची व्याप्ती वाढवणं, कर सवलत असे प्रयत्न केल्यामुळे स्टार्टअप इंडियानं नवी झेप घेतली असल्याचं ते म्हणाले.

****



 भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळ - आयआरसीटीसी येत्या १४ एप्रिलपासून एक विशेष पर्यटक गाडी सुरू करणार आहे. ‘समानता एक्सप्रेस’ असं या गाडीचं नाव असून, ही विशेष भारत दर्शन गाडी नागपूर इथून सुटणार आहे. संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांच्याशी संबंधित महत्वाची स्थळं या प्रवासात जोडली जातील. यामध्ये चैत्यभूमी, महू, बोधगया, सारनाथ, वाराणसी, लुंबिनी, कुशीनगर, आणि दीक्षाभूमी या स्थळांचा समावेश आहे. या प्रवासाकरता दहा रात्री आणि ११ दिवसांचा कालावधी आहे.

****



 अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा नगरपालिकेच्या मतदानाला आज सकाळी सुरुवात झाली. १९ नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदासाठी ही निवडणूक होत असून, नऊ प्रभागातले ३२ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावत आहेत.

****



 राज्यात थंडीचा कडाका वाढला असून, अनेक भागात ढगाळ वातावरण आहे. नांदेड जिल्ह्यात मागील दोन तीन दिवसांपासून सूर्यदर्शन झालेलं नाही. उस्मानाबाद, सातारा, अहमदनगर, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्येही ढग दाटून थंड वारे वाहत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. बुलडाणा जिल्ह्यातही हवामानात गारवा असून, ढगाळ वातावरणामुळे गव्हावर तांबा रोग पडला आहे. औरंगाबाद शहर आणि परिसरातही तापमानात घट झाली आहे. 

****



 जकार्ता इथं सुरू असलेल्या इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेचा महिला एकेरीचा अंतिम सामना आज भारताची सायना नेहवाल आणि स्पेनची कॅरोलिना मरिन यांच्यात होणार आहे.

*****

***

No comments: