Wednesday, 23 January 2019

Text - AIR News Bulletin, Aurangabad 23.01.2019....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 23 January 2019

Time 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २३ जानेवारी २०१९ सायंकाळी ६.००

****

वस्तू आणि सेवा कर अपिलीय न्यायाधिकरण- GSTAT चं राष्ट्रीय पीठ स्थापन करण्याला आज सरकारनं मंजुरी दिली. केंद्रीय मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. नवी दिल्लीत स्थापन होणार असलेल्या या पीठाच्या अध्यक्षपदी राष्ट्रपती असतील, तसंच, केंद्र आणि राज्याचा प्रत्येकी एक सदस्य यात असेल, अशी माहिती केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज दिल्लीत वार्ताहरांशी बोलतांना दिली.

****

काँग्रेस पक्षानं आज उत्तर प्रदेशच्या पूर्व प्रांताच्या सरचिटणीस म्हणून प्रियंका गांधी वड्रा यांची नियुक्ती केली, त्याचबरोबर पश्चिम प्रांताचे सरचिटणीस म्हणून ज्योतिरादित्य शिंदे तर हरियाणाचे सरचिटणीस म्हणून गुलाम नबी आझाद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या संघटन सरचिटणीसपदाचा पदभार के. सी. वेणूगोपाल यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

दरम्यान, प्रियंका गांधी यांच्या नियुक्तीबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना भारतीय जनता पक्षानं, प्रियंका यांची नियुक्ती करून काँग्रेसनं, राहुल गांधी नेतृत्वासाठी अयोग्य असल्याची कबुलीच दिल्याचं म्हटलं आहे.

****

“ई-नाम” प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सक्षम करत बाजार समित्यांच्या जोखडातून मुक्त करण्याचा मानस केंद्र सरकारचा असल्याचं केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी सांगितलं. आज मुंबईत झालेल्या एका कृषीविषयक परिषदेमध्ये ते बोलत होते. सरकार आणि उद्योगपतींनी एकत्र येऊन कृषी क्षेत्राच्या मदतीची गती वाढवण्याची गरज आहे, असं सिंह यांनी सांगितलं. तर, आधुनिक पद्धतीनं शेती करता यावी यासाठी कृषी विद्यापीठांनी संशोधनावर लक्ष केंद्रीत करावं, असं मत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केलं.

****

महिला बचतगटांच्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्याच्या उद्देशानं सुरू करण्यात आलेल्या ”महालक्ष्मी सरस” या प्रदर्शनाचं आज मुंबईत राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते उद्घाटन झालं. महिला बचतगटांच्या वस्तू आता ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या पोर्टल्सवरून विकल्या जातात, यातच या महिलांचं यश आहे, असं राज्यपालांनी यावेळी म्हटलं. तर, आठ जिल्ह्यातल्या काही महिलांपासून सुरू झालेल्या या प्रदर्शनात आज सव्वीस जिल्ह्यातल्या साडेतीन लाख महिला सहभागी झाल्या असल्याची माहिती ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी बोलताना दिली.

****

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत नेताजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.

****

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यासाठी मुंबईतल्या शिवाजी पार्क स्मृती स्थळावर आज शिवसैनिकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियोजित बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकासाठीच्या जागेचं ताबापत्र आणि करारनामा स्मारकाच्या न्यासाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला. सुमारे अडीच हजार चौरस फुटांच्या या जागेत बाळासाहेब ठाकरे यांचं भव्य स्मारक साकारण्यात येणार आहे.

****

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत एकूण पन्नास कोटी रुपयांच्या सतरा पाणी पुरवठा योजनांना मंजुरी दिली असल्याची माहिती पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली आहे. यासंदर्भातल्या उच्चाधिकार समितीची बैठक नुकतीच मंत्रालयात झाली, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. या योजनेअंतर्गत अस्तित्वात असलेल्या आणि नव्यानं सुरू होणाऱ्या सगळ्याच पाणी पुरवठा योजना सौर उर्जेवर चालवण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम राबवण्याचे निर्देशही लोणीकर यांनी संबंधित विभागांना दिले आहेत.

****

राज्यात दूध उत्पादनाला चालना देण्यासाठी पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्य व्यवसाय विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या, दुधाळ संकरीत गाई म्हशींच्या गट वाटप योजनेमध्ये देशी गाईंच्या वाटपांचा समावेश करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला आहे. देशी गोवंशाच्या संवर्धनासाठी शासनानं हा निर्णय घेतला आहे.

****

भारत आणि न्यूझीलंडदरम्यानच्या पाच एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला नॅपिअर इथं आज झालेला पहिला सामना भारतानं आठ गडी राखून जिंकत मालिकेमध्ये एक-शुन्य अशी आघाडी घेतली आहे.

****

No comments: