Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 31 january 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
३१
जानेवारी २०१९ दुपारी १.०० वा.
****
शासकीय योजना अपेक्षित कालमर्यादेत
पूर्ण करण्यासाठी विद्यमान सरकार ओळखलं जात असल्याचं, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी
म्हटलं आहे. संसदेच्या संयुक्त सभेला ते संबोधित करत होते. काळ्या पैशाविरोधात सरकारच्या
कारवाईत नोटाबंदी हे महत्त्वाचं पाऊल ठरलं, या निर्णयामुळे समांतर अर्थव्यवस्थेला पायबंद
बसला, सुमारे तीन लाखावर बनावट कंपन्या समोर आल्या, तसंच आयकर दात्यांची संख्या सुमारे
सहा कोटींवर पोहोचल्याचं, राष्ट्रपती म्हणाले. डिजीटायझेशनमुळे सरकारी योजनांच्या सुमारे
आठ लाख बनावट लाभार्थ्यांना दिला जाणारा निधी थांबला असल्याचं त्यांनी नमूद केलं. सरकारच्या
इतर योजनांचाही राष्ट्रपतींनी आढावा घेतला. अत्याधुनिक राफेल विमान लवकरच वायुसेनेच्या
ताफ्यात दाखल होऊन, देशाची शस्त्रसज्जता वाढणार असल्याचा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त
केला.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून प्रारंभ
झाला. १३ फेब्रुवारीपर्यंत हे अधिवेशन
चालेल. उद्या अंतरिम अर्थसंकल्प सादर होईल. हा अंतरिम अर्थसंकल्पच असेल,
असं सरकारनं स्पष्ट केलं आहे.
****
ऑगस्टा वेस्टलँड
घोटाळा प्रकरणी आरोपी असलेला दुबईस्थित व्यापारी राजीव सक्सेना आणि दीपक तलवार यांचं
संयुक्त अरब अमिरातीनं भारताकडे प्रत्यर्पण
केलं आहे. या प्रत्यार्पणामुळे, सक्सेना
आणि तलवार यांचा हात असलेल्या दोन वेगवेगळ्या प्रकरणातल्या भ्रष्टाचाराचा तपास
करणाऱ्या भारतीय यंत्रणांना मोठी मदत होणार आहे. सक्तवसुली
संचालनालयानं सक्सेना याला याप्रकरणी अनेकदा समन्स बजावलं होतं. तलवारच्या बाबतीत
एक हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त अघोषित उत्पन्न आणि या हवाई करारात भूमिका
बजावल्याच्या आरोपाबाबत चौकशी सुरु आहे.
****
भारतात
नोंदणी झालेल्या आणि हिंदू पद्धतीनं झालेल्या विवाहासंबंधीत घटस्फोटाचे खटले
परदेशी न्यायालयात निकाली निघू शकत नाही, असा निकाल मुंबई उच्च न्यायालयानं
दिला आहे. हिंदू विवाह पद्धतीनं झालेल्या आणि २०१३ मध्ये मुंबईत विवाह नोंदणी
झालेल्या एका पुरुषानं ब्रिटनमध्ये घटस्फोटाचा खटला दाखल केला होता. भारतात
परतलेल्या त्याच्या पत्नीनं ब्रिटन न्यायालयानं पाठवलेल्या
घटस्फोटाच्या नोटीसीविरुद्ध मुंबई
उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी
न्यायाधीश आर डी धनुका यांनी हा निर्णय दिला.
****
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी लोकपाल
आणि अन्य मागण्यांसाठी पुकारलेल्या उपोषणासंदर्भात त्यांची भेट घेऊन चर्चा करू, असं
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर इथं
ते आज वार्ताहरांशी बोलत होते. हजारे यांनी आंदोलन मागं घ्यावं यासाठी आपण पुन्हा प्रयत्न
करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा
यांनी युतीसाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दूरध्वनी केला, ही अफवा असल्याचं
महाजन यांनी स्पष्ट केलं. मात्र निवडणूक आचारसंहिता लागू होण्यासाठी कमी कालावधी असल्यानं
युतीबाबतचं चित्र लवकर स्पष्ट व्हावं, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
****
नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वर
इथं आज संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेला प्रारंभ झाला. आज सकाळी नाशिकचे पालकमंत्री
गिरीश महाजन यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. राज्यातला दुष्काळ दूर व्हावा आणि
यंदा भरपूर पाऊस पडावा यासाठी निवृत्तीनाथ महाराजांच्या चरणी साकडं घातल्याचं महाजन
यावेळी म्हणाले. या यात्रेसाठी त्र्यंबकेश्वर इथं शेकडो दिंड्या आणि दोन लाखांहून आधिक
वारकरी दर्शनासाठी दाखल झाले आहेत. त्र्यंबकेश्वर नगरपालिका, जिल्हा प्रशासन आणि संत
निवृत्तीनाथ महाराज ट्रस्टच्या वतीनं भाविकांसाठी पाणी, फिरते शौचालय आणि आरोग्य उपचाराच्या
व्यवस्था करण्यात आल्या आहेत.
****
येत्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं नांदेड जिल्ह्यात
अंतिम मतदार यादी आज प्रसिद्ध झाली. जिल्ह्यातल्या सर्व मतदारांनी या यादीत आपलं नाव
आहे का, याची खात्री करुन घेण्याचं आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केलं आहे.
****
जालना - नाव्हा रस्त्यावर नागपूरहून पुण्याकडे जाणारी
खासगी बस उलटून झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला, तर १५ प्रवासी जखमी झाले.
आज पहाटे हा अपघात झाला.
****
भारत आणि स्पेन यांच्या महिला संघांमधला हॉकी
मालिकेचा अंतिम सामना आज मुर्सिया इथं खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार
संध्याकाळी साडे पाच वाजता सामन्याला सुरुवात होईल. मालिकेत दोन्ही संघ एक - एकनं
बरोबरीत आहेत.
****
भारत आणि
न्यूझीलंडदरम्यान हॅमिल्टन इथं झालेला चौथा एकदिवसीय क्रिकेट सामना न्यूझीलंडनं आठ
गडी राखून जिंकला. प्रथम फलंदाजी करणारा भारतीय संघ ९२ धावांवरच सर्वबाद झाला. न्यूझीलंडच्या
संघानं हे लक्ष्य अवघ्या पंधराव्या षटकातच पूर्ण केलं.
*****
***
No comments:
Post a Comment