Thursday, 24 January 2019

Text - AIR News Bulletin, Aurangabad 24.01.2018....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 24 January 2019

Time 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २४ जानेवारी २०१९ सायंकाळी ६.००

****

अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक - ॲट्रॉसिटी कायद्यातल्या प्रस्तावित सुधारणांना स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. या कायद्यात केलेल्या शिफारशींनुसार, आरोपीला अटकपूर्व जामीन न देण्याची तरतूद आहे. सर्वोच्च न्यायालयानं २० मार्च रोजी दिलेला निर्णय आणि नवीन तरतुदींविरुद्ध दाखल याचिकांवरची सुनावणी न्यायालय एकत्र घेणार असल्याचं न्यायमूर्ती ए के सिकरी यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं म्हटलं आहे. पीठानं हे प्रकरण सरन्यायाधीशांनी स्थापन केलेल्या पीठाकडे पाठवलं असून, या पीठात न्यायमूर्ती यु यु लळीत यांचा समावेश आहे. 

****

कोणत्याही परिस्थितीत कागदी मतपत्रिकांचा वापर पुन्हा सुरू होणार नाही, असं मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी स्पष्ट केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र - ईव्हीएम बाबत सध्या सुरू असलेले वाद दुर्देवी असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. सर्वसमावेशक आणि सर्वांच्या आवाक्यातल्या निवडणुकांसंदर्भात निवडणूक आयोगातर्फे नवी दिल्लीत आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत ते आज बोलत होते. मतदारांच्या जागृतीसाठी राबवण्यात आलेला ‘स्वीप’ हा कार्यक्रम यशस्वी ठरल्याची माहिती त्यांनी दिली. या परिषदेत बांग्लादेश, भूतान, कझाकिस्तान, मालदिव, रशिया आणि श्रीलंका या देशांमधल्या निवडणूक व्यवस्थापन संघटनांचे प्रमुख आणि इतर प्रतिनिधीही सहभागी झाले आहेत. उद्या साजऱ्या होणाऱ्या नवव्या राष्ट्रीय मतदार दिनाच्या पार्श्वभूमीवर या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली इथं राष्ट्रील बाल पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधला. यावेळी या मुलांनी, त्यांनी केलेल्या कार्याविषयी माहिती दिली. पंतप्रधानांनी या मुलांचं कौतुक करत त्यांचं अभिनंदन केलं. मुलांनी निसर्गाशी जोडून राहीलं पाहिजे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

****

काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये दहशतवाद विरोधी मोहिमेत शहीद झालेले लान्स नायक नजीर अहमद वाणी यांना अशोकचक्र शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे. २५ नोव्हेंबरला झालेल्या चकमकीत ठार झालेले वाणी, कुलगाम जिल्ह्यातल्या अश्मुजीचे रहिवासी होते. सुरुवातीला दहशतवादी संघटनेत कार्यरत असलेले वाणी, २००४ मध्ये भारतीय लष्करात दाखल झाले होते.

****

समृद्धी आल्यावर रस्ते बांधणी होते, असं नव्हे तर रस्ते बांधणीतूनही समृद्धी येते असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी इथं आज वडपे ते माजीवडा या २३ किलोमीटर मार्गाच्या चौपदरीकरणाचं भूमिपूजन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. सध्या असलेल्या चार पदरी रस्त्याचं रुंदीकरण करून आठ पदरी रस्ता बनणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

****

बुलडाणा जिल्ह्यातल्या देऊळगाव राजा तालुक्यातल्या खडकपूर्णा प्रकल्पाचं पाणी मराठवाड्यातल्या जिंतूर भागाला देण्यास नागरिकांनी विरोध केला आहे. जिंतूर भागातल्या ९२ गावांसाठी खडकपूर्णा प्रकल्पाचं पाणी आणण्याची योजना मंजूर होऊन, प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली होती. हे काम नियमबाह्य असून, आधी देऊळगाव राजा तालुक्याला पाणी आरक्षित करण्याची मागणी करत ग्रामस्थांनी हे काम बंद पाडलं.

****

नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड इथं मोटारीचा टायर फुटल्यानं ही मोटार बसवर जाऊन आदळली. या अपघातात एकाच कुटुंबातल्या तिघांचा मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला. मृत सर्वजण वणी इथले रहिवासी आहेत. 

****

उस्मानाबाद इथं आज अनुलोम संस्थेचा ‘वस्ती मित्र, स्थान मित्र संगम’ हा मेळावा पार पडला. जिल्हा पोलिस अधीक्षक आर राज यांच्या हस्ते या मेळाव्याचं उद्घाटन झालं.

****

‘महाराष्ट्र फेडरेशन ऑफ इलेक्ट्रीकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन’चं तिसरं महाअधिवेशन उद्यापासून २७ जानेवारी पर्यंत औरंगाबाद इथं होणार आहे. शहानुर मियाँ दर्गा परिसरातल्या श्रीहरी पॅव्हेलियन इथं होणाऱ्या या अधिवेशनाचं उद्घाटन विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्या हस्ते होणार आहे.

****

जकार्ता इथं सुरु असलेल्या इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताची पी व्ही सिंधू महिला एकेरीच्या उपान्त्यपूर्व फेरीत पोहोचली आहे. आज झालेल्या उप उपान्त्यपूर्व फेरीच्या सामन्यात सिंधुनं इंडोनेशियाच्या ग्रीगोरिया मार्सिका तुजुंग हिचा पराभव केला. पुरुष एकेरीत के श्रीकांतनंही उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.

****

भारत आणि न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघादरम्यान नेपियर इथं झालेला पहिला एकदिवसीय क्रिकेट सामना भारतानं नऊ गडी राखून जिंकला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या संघानं भारतीय संघाला १९३ धावांचं लक्ष्य दिलं होतं, हे लक्ष्य भारतीय महिलांनी ३३ षटकांतच पूर्ण केलं.

****

No comments: