Friday, 25 January 2019

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 25.01.2019 7.10


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 25 January 2018

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २५ जानेवारी २०१ सकाळी ७.१० मि.

****   

§   कागदी मतपत्रिकांचा वापर पुन्हा सुरू होणार नाही - मुख्य निवडणूक आयुक्तांची स्पष्टोक्ती

§   ॲट्रॉसिटी कायद्यातल्या प्रस्तावित सुधारणांना स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

§   व्हिडीओकॉन समूहाच्या मुंबई तसंच औरंगाबाद इथल्या कार्यालयांवर सीबीआयचे छापे

§   नांदेड-बंगळूरू जलद रेल्वेला घाटनांदूर स्थानकावर एक मिनिटाचा थांबा मंजूर

आणि

§   पहिल्या एक दिवसीय क्रिकेट सामन्यात भारतीय महिला संघाचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय

****

कोणत्याही परिस्थितीत कागदी मतपत्रिकांचा वापर पुन्हा सुरू होणार नाही, असं मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी स्पष्ट केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र - ईव्हीएम बाबत सध्या सुरू असलेले वाद दुर्दैवी असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. सर्वसमावेशक आणि सर्वांच्या आवाक्यातल्या निवडणुकांसंदर्भात निवडणूक आयोगातर्फे नवी दिल्लीत आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत ते काल बोलत होते. या परिषदेत बांग्लादेश, भूतान, कझाकिस्तान, मालदिव, रशिया आणि श्रीलंका या देशांमधल्या निवडणूक व्यवस्थापन संघटनांचे प्रमुख आणि इतर प्रतिनिधीही सहभागी झाले आहेत. आज साजऱ्या होत असलेल्या नवव्या राष्ट्रीय मतदार दिनाच्या पार्श्वभूमीवर या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे.

****

सत्तरावा प्रजासत्ताक दिन उद्या साजरा होत आहे, प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज राष्ट्राला संबोधित करतील. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व केंद्रावरुन संध्याकाळी सात वाजता राष्ट्रपती प्रथम हिंदी आणि नंतर इंग्रजीतून देशाला संबोधित करतील. त्यानंतर दूरदर्शनवरून प्रादेशिक भाषेतून संदेशाचा अनुवाद प्रसारित होईल. आकाशवाणीवरुन संदेशाचा प्रादेशिक भाषेतून अनुवाद रात्री साडेनऊ नंतर प्रसारित होणार आहे.

****

दहशतवाद विरोधी मोहिमेत हुतात्मा झालेले लान्स नायक नजीर अहमद वानी यांना अशोक चक्र शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे. काश्मीरमधल्या कुलगाम जिल्ह्यातल्या अश्मुजीचे रहिवासी असलेलेल नजीर किशोरवयात दहशतवादी संघटनेत कार्यरत होते, मात्र २००४ मध्ये ते दहशतवाद सोडून, भारतीय लष्करात दाखल झाले. काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात गेल्या वर्षी २५ नोव्हेंबरला दहशतवादी हल्ला मोडून काढताना, त्यांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं, मात्र या चकमकीत नजीर यांना वीरमरण आलं.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत ‘राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यां’ शी संवाद साधला. यावेळी या मुलांनी, आपण केलेल्या कामगिरीचा अनुभव कथन केला. पंतप्रधानांनी या मुलांचं कौतुक केलं. मुलांची नाळ निसर्गाशी जोडलेली राहावी, असंही पंतप्रधान म्हणाले

****

अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक - ॲट्रॉसिटी कायद्यातल्या प्रस्तावित सुधारणांना स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. या कायद्यात केलेल्या शिफारशींनुसार, आरोपीला अटकपूर्व जामीन न देण्याची तरतूद आहे. सर्वोच्च न्यायालयानं २० मार्च रोजी दिलेला निर्णय आणि नवीन तरतुदींविरुद्ध दाखल याचिकांवरची सुनावणी, न्यायालय एकत्र घेणार असल्याचं न्यायमूर्ती ए के सिकरी यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं म्हटलं आहे. पीठानं हे प्रकरण सरन्यायाधीशांनी स्थापन केलेल्या पीठाकडे पाठवलं आहे. 

****

समृद्धी आल्यावर रस्ते बांधणी होते असं नव्हे, तर रस्ते बांधणीतूनही समृद्धी येते असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी इथं काल वडपे ते माजीवडा या २३ किलोमीटर मार्गाच्या चौपदरीकरणाचं भूमिपूजन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. सध्या असलेल्या चार पदरी रस्त्याचं रुंदीकरण करून आठ पदरी रस्ता बनणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

****

बालिकांचं सक्षमीकरण करण्यासाठी सरकारनं अनेक पावलं उचलल्याचं केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मेनका गांधी यांनी म्हटलं आहे. ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या योजनेच्या वर्धापन दिनानिमित्त काल नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. प्रसुतिपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल पाच राज्यं आणि २५ जिल्ह्यांना यावेळी गौरवण्यात आलं.

****

भारतीय अवकाश संशोधन संस्था - इस्त्रोने काल रात्री मायक्रोसॅट आर आणि कलामसॅट या दोन उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण केलं. मायक्रोसॅट आर हा ७४० किलो वजनाचा उपग्रह, संरक्षण क्षेत्रातल्या संशोधनाला सहकार्य करेल, तर कलामसॅट हा विद्यार्थ्यांनी बनवलेला अवघ्या बाराशे ग्रॅम वजनाचा छोटा उपग्रह आहे.

****

राज्यातल्या दुष्काळी भागात चारा छावण्या सुरु करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला असल्याची माहिती मदत आणि पुर्नवसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल दिली. दुष्काळ निवारणासाठी गठित समितीच्या बैठकीनंतर ते मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

****

हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

आयसीआयसीआय बॅँक आणि व्हिडीओकॉन कर्जवाटप प्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग सीबीआयनं प्राथमिक माहिती अहवाल - एफआयआर दाखल केला असून, व्हिडीओकॉन समूहाच्या मुंबई तसंच औरंगाबाद इथल्या कार्यालयांवर छापे घालून तपास सुरू केला आहे. २०१२ साली आयसीआयसीआय बँकेनं, व्हिडीओकॉन कंपनीला तीन हजार २५० कोटी रुपयांचं कर्ज मंजूर केलं होतं, त्यासाठी कंपनीचे प्रमुख वेणूगोपाल धूत यांनी, बँकेच्या प्रमुख चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या नूपॉवर कंपनीत गुंतवणूक केल्याचा आरोप आहे. यासंदर्भात सीबीआयनं, नूपॉवर रिन्युएबलच्या विरोधातही गुन्हा दाखल केला आहे.

****

भारतीय जनता पक्षानं केंद्र आणि राज्यात सत्तेत येण्यासाठी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. ते काल हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत इथं परिवर्तन निर्धार सभेत बोलत होते.

दरम्यान, काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा काल रायगड जिल्ह्यातल्या पेण इथं पोहोचली, यावेळी केलेल्या भाषणात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी, खोट्या आश्वासनांना कंटाळलेले नागरिक या सरकारला घरी बसवतील असा विश्वास व्यक्त केला.

****

नांदेड-बंगळूरू जलद रेल्वेला बीड जिल्ह्यात घाटनांदूर स्थानकावर एक मिनिटाचा थांबा देण्यात आला आहे. आजपासून सकाळी नऊ वाजून चौदा मिनिटांनी ही गाडी घाटनांदूर स्थानकावर पोहचेल आणि नऊ वाजून १५ मिनिटांनी पुढे रवाना होईल. त्याचबरोबर बंगळूरू -नांदेड ही जलद रेल्वे सकाळी पाच वाजून ५९ मिनिटांनी घाटनांदूर स्थानकावर येईल आणि सहा वाजता निघेल. अंबाजोगाई तालुक्यातली महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या घाटनांदूर इथं सर्वच रेल्वे गाड्यांना थांबा देण्याची मागणी रेल्वे संघर्ष समितीने केली होती. 

****

बीदर- लातूर -मुंबई या रेल्वे गाडीला १८० नवीन शयिका- बर्थ वाढवण्यात येणार आहेत. महाराष्ट्र, कर्नाटक आणि मध्यप्रदेश क्षेत्रीय सल्लागार समितीचे सदस्य निजाम शेख यांनी ही माहिती दिली. अनेक प्रवाशांना या गाडीचं आरक्षण मिळत नसल्यानं, शयिका वाढवून देण्याची मागणी  केली जात होती.

****

जकार्ता इथं सुरु असलेल्या इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताची पी व्ही सिंधू महिला एकेरीच्या उपान्त्यपूर्व फेरीत पोहोचली आहे. काल झालेल्या उप उपान्त्यपूर्व फेरीच्या सामन्यात सिंधुनं इंडोनेशियाच्या ग्रीगोरिया मार्सिका तुजुंग हिचा पराभव केला. पुरुष एकेरीत के श्रीकांतनंही उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.

****

भारत आणि न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघादरम्यान नेपियर इथं झालेला पहिला एकदिवसीय क्रिकेट सामना भारतानं नऊ गडी राखून जिंकला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या संघानं भारतीय संघाला १९३ धावांचं लक्ष्य दिलं होतं, स्मृती मंधानाच्या एकशे पाच धावांच्या बळावर, भारतीय संघानं, हे लक्ष्य ३३ षटकातच पूर्ण केलं.

*****

सोलापूर इथं स्वतंत्र प्रादेशिक साखर सह संचालक हे नवीन कार्यालय सुरु करण्यास मान्यता मिळाली असल्याची माहिती सहकार मंत्री सुभाष देसाई यांनी दिली. सोलापूर जिल्ह्यातल्या साखर कारखान्यांची संख्या आणि ऊस गाळपाचं प्रमाण लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

****

लातूर जिल्ह्यातल्या मुरुड ग्रामपंचायतीला नगर परिषद म्हणून मान्यता देण्यात आली आहे. राज्याच्या नगरविकास विभागानं यासंदर्भातली अधिसूचना जारी केली. याशिवाय मुरुड इथल्या ग्रामीण रुग्णालयातल्या ट्रॉमा केअर युनिटसाठी सात कोटी रुपये निधी देऊन कामास तांत्रिक मान्यताही राज्य सरकारनं प्रदान केली आहे.

****

परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा इथल्या बौध्द विहारासाठी पहिल्या टप्प्यात एक कोटी रुपये निधी मंजूर केला असला तरी विविध कामांचा प्रस्ताव आल्यास राज्य शासन आठ कोटी रूपये निधी मंजूर करेल अशी घोषणा सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी केली. पूर्णा इथं बौध्द विहाराच्या विकास कामाचं भूमिपूजन करताना ते बोलत होते.

//**********//


No comments: