Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 21 January 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २१ जानेवारी २०१९ सायंकाळी ६.००
****
स्रोताच्या
ठिकाणी कर कपात - टीडीएसमध्ये चुका आढळल्यास काही छोट्या कंपन्यांवर खटला चालवण्यासंबंधी
नोटीस जारी करण्यात आल्याच्या वृत्ताचं, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ - सीबीडीटीनं खंडन
केलं आहे. माध्यमांमध्ये यासबंधीच्या आलेल्या बातम्या या अफवा पसरवणाऱ्या आणि तथ्यहीन
असल्याचं, सीबीडीटीनं जारी केलेल्या वक्तव्यात म्हटलं आहे. टीडीएसशी संबंधित काही प्रकरणांमध्ये
मुंबईतल्या कार्यालयानं काही मोठ्या प्रकरणात ठराविक कंपन्यांना खटला चालवण्यासंबंधी
कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याचं सीबीडीटीनं म्हटलं आहे. यातल्या काही प्रकरणात कर्मचाऱ्यांकडून
टीडीएसच्या रुपात पाच लाख रुपयांहून अधिक रक्कम जमा करण्यात आली, मात्र ही रक्कम वेळेवर
आयकर विभागात जमा करण्यात आली नसल्याचं, या वक्तव्यात म्हटलं आहे.
****
सरकार
पायरसी विरोधात लक्ष केंद्रीत करत असून, आतापर्यंत २००हून अधिक संकेतस्थळं ब्लॉक करण्यात
आल्याचं, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयातल्या औद्योगिक धोरण आणि संवर्धन विभागाचे संयुक्त
सचिव राजीव अग्रवाल यांनी सांगितलं. मुंबईत आज डिजिटल युगात डेटा संरक्षण या विषयावरच्या
कार्यशाळेत ते बोलत होते. औद्योगिक धोरण आणि संवर्धन विभागानं डेटा संरक्षण करण्यासाठी
अनेक उपाय केले असून, त्याचे परिणामही दिसत असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
सातारा
जिल्ह्यातल्या खंडाळा औद्योगिक वासहतीतल्या जमिनीसंदर्भात अनेक प्रलंबित मागण्यांसाठी
तिथल्या शेतकऱ्यांनी मुंबईत सुरु केलेलं आंदोलन आज मागे घेतलं. उद्योगमंत्री सुभाष
देसाई यांच्या भेटीनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित
करणार नाही, तसंच निरा देवधर सिंचन प्रकल्पग्रस्तांच्या बागायतीखालील जमिनी औद्योगिक
क्षेत्रासाठी संपादित करण्यात आलेल्या आहेत, त्या शेतकऱ्यांना पर्यायी जमिनी त्यांच्या
संमतीनं देण्यात येतील, अशी ग्वाही देसाई यांनी दिली.
****
भारतीय
जनता पक्षाचं सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप भारतीय कम्यूनिस्ट पक्षाच्या
पॉलिट ब्यूरो सदस्या माजी खासदार वृंदा करात यांनी केला आहे. बीड इथं त्या आज वार्ताहरांशी
बोलत होत्या. राज्यात दुष्काळ जाहीर केला, मात्र उपाययोजना काहीच दिसत नाही, महिलांना
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत स्थान मिळत नाही, असं सांगून त्यांनी
सरकारच्या अनेक योजनांवर टीका केली. करात यांनी आज बीड जिल्ह्यातल्या दुष्काळी परिस्थितीची
पाहणी केली.
****
सरकार
कौशल्यपूर्ण रोजगार निर्मितीवर भर देत असल्याचं, यवतमाळचे पालकमंत्री मदन येरावार यांनी
म्हटलं आहे. यवतमाळ इथं आज रोजगार मेळाव्यात ते बोलत होते. नोकरीशिवाय तरुण-तरुणींना
व्यवसायाभिमुख करणं हा मुख्य उद्देश असून, कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी युवकांनी
रोजगारक्षम होणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले. वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्ग, नागपूर-बोरी-तुळजापूर
राष्ट्रीय महामार्ग, जिल्ह्यालगतचा समृध्दी मार्ग आदी दळणवळणाच्या सोयी निर्माण होत
असल्यामुळे तिथल्या उद्योगांना चालना मिळेल, पर्यायानं भविष्यात रोजगाराच्या मोठ्या
संधी निर्माण होतील, असं येरावार यांनी सांगितलं.
****
कोल्हापूर
जिल्ह्यातल्या शिरोली इथं आज पुणे - बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर महाराष्ट्र राज्य
इरिगेशन फेडरेशनच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. राज्यातल्या कृषी वीज पंप
धारकांना चुकीच्या पद्धतीनं आकारली गेलेली वीज बिलं आणि पोकळ थकबाकी रद्द व्हावी या
मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी, शेती पंपांच्या
वीज बिलातली पोकळ थकबाकी रद्द करण्याबाबतचं मुख्यमंत्र्यांचं पत्र दिल्यानंतर हे आंदोलन
मागे घेण्यात आलं.
****
बीड
जिल्ह्यातल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांशी आज अतिरिक्त जिल्हाधिकारी
बी.एम.कांबळे यांनी संवाद साधून, त्यांच्या मागण्या तसचं अडचणी जाणून घेतल्या. आत्महत्याग्रस्त
शेतकऱ्यांच्या कुटुंबियांच्या मागणीनुसार त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना
यावेळी सुचना देण्यात आल्या. ज्या कुटुंबांनी विहिर, शेततळे, शैक्षणिक मदत, शेळीपालन,
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना, घरकुल यासारख्या बाबींची मागणी केली, त्या योजनेचा लाभ
नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करून द्यावा, असे निर्देश कांबळे यांनी यावेळी
दिले.
****
विदर्भाच्या
काही भागात तापमानात लक्षणीय घट तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात
किंचित घट झाली आहे. राज्यात आज सर्वात कमी आठ अंश सेल्सिअस तापमान नागपूर इथं नोंदवलं
गेलं. बीड १६ पूर्णांक चार, औरंगाबाद आणि नांदेड सरासरी १३, तर परभणी इथं ११ अंश सेल्सिअस
तापमानाची नोंद झाली.
****
No comments:
Post a Comment