Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date –
28 january 2019
Time
1.00 to 1.05pm
Language
Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
२८ जानेवारी २०१९ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज
नवी दिल्ली इथं प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रीय छात्र सेना - एनसीसीच्या शिबिराच्या
समारोप कार्यक्रमात सहभाग घेतला. पंतप्रधानांनी छात्रसेनेच्या कवायतीचं निरीक्षण केलं.
संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यावेळी उपस्थित होत्या. लष्कर, हवाई दल आणि नौदलाच्या
कॅडेट्ससह सिंगापूर, रशिया, व्हिएतनाम तसंच श्रीलंका इथल्या पथकांनी यावेळी पंतप्रधानांना
मानवंदना दिली. विविध राज्यांची ओळख असलेले नृत्यप्रकार यावेळी सादर करण्यात आले.
****
मराठा आरक्षणासंदर्भात मागासवर्ग आयोगाच्या अहवालाची
प्रत याचिकाकर्ते आणि विरोधकांना देण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं राज्यसरकारला
दिले आहेत. आज झालेल्या सुनावणीदरम्यान, न्यायालयानं याचिकाकर्त्यांना अहवालाची प्रत
देताना, तो आहे तसा देण्याची सूचना केली. हा अहवाल सीडी स्वरूपात उद्यापर्यंत देण्यात
येईल, असं यावेळी सांगण्यात आलं. याचिकाकर्त्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी या
निर्णयाचे स्वागत केले आहे.
****
लोकसभा निवडणुकीत स्पष्ट पराभव समोर दिसत असल्यानेच,
काँग्रेस पक्ष इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र - ईव्हीएमवर आक्षेप घेत असल्याचं, भारतीय जनता
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. भाजप राज्य कार्य समितीच्या
बैठकीचं आज सकाळी जालन्यात उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. विधानसभा अध्यक्ष
हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास
मंत्री पंकजा मुंडे, शिक्षणमंत्री विनोद तावडे, यांच्यासह अनेक मान्यवर या बैठकीला
उपस्थित आहेत. या बैठकीत कृषी आणि राज्यकीय ठरावांसह बारा विषयांवर चर्चा होणार असून, त्यानंतर मुख्यमंत्र्यांची
जाहीर सभा होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी लाला लजपतराय यांची आज
जयंती. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी लालाजींना
आदरांजली अर्पण केली आहे. लाला लजपतराय यांनी सामाजिक सुधारणा आणि स्वदेशी उद्योगांना
चालना दिल्याचं राष्ट्रपतींनी ट्विटरच्या संदेशात म्हटलं आहे. तर लालाजींची देशभक्ती
देशवासीयांच्या सदैव स्मरणात राहील, असं सांगून उपराष्ट्रपतींनी वंदे मातरम आणि सायमन
गो बॅक चळवळीत लालाजींच्या योगदानाचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला.
****
दहावी - बारावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या ‘परीक्षा
पे चर्चा’ या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. दूरदर्शनच्या राष्ट्रीय
वाहिन्यांवरुन या कार्यक्रमाचं प्रक्षेपण होणार असून, विविध संकेतस्थळांवर तो उपलब्ध
असेल. राज्यात सर्व शाळांनी हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना
दाखवावा असं राज्य शासनानं सांगितलं आहे.
****
ज्येष्ठ विधीज्ञ हरिश्चंद्र पाटील यांचं आज पहाटे
लातूर इथं निधन झालं, ते ९६ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर आज सायंकाळी लातूर
इथं, मारवाडी स्मशान भूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती
नरेश पाटील यांचे ते वडील होत.
****
नाशिक जिल्ह्यात एकीकडे थंडीचा कडाका वाढत असताना
दुसरीकडे ग्रामीण भागात दुष्काळी परिस्थितीही वाढत आहे. जिल्ह्यातल्या २३२ गावं आणि
सहाशे वाड्यांवर १२२ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. यंदा कमी पाऊस झाल्यानं फेब्रुवारी
महिन्यात या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
हवामान बदलाचा फटका अमरावती जिल्ह्याला
बसला आहे. यंदा उन्हाची तीव्रता, अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान, आणि आता थंडीचा कहर
अशा नैसर्गिक संकटांचा सामना जिल्ह्याला करावा लागला आहे. सध्याची थंडी गहू आणि हरभरा
पिकासाठी पोषक असल्याचं, आमच्या वार्ताहाराने कळवलं आहे.
****
पर्यावरण संरक्षणासाठी शासन आणि स्वयंसेवी संस्थांनी
एकत्रित काम करण्याची गरज, महाराष्ट्र
बांबू मिशनचे कार्यकारी संचालक थंगम साईकुमार रेड्डी यांनी व्यक्त केली. लातूर जिल्ह्यातल्या
लोदगा इथं हवामान बदल आणि नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन या विषयावर आयोजित कार्यशाळेच्या
समारोप सत्रात ते बोलत होते. वनक्षेत्र वाढवण्यासाठी ७५ लाख एकरवर झाडं लावण्याची गरज
व्यक्त करत, बांबू लागवडीच्या माध्यमातून आपण वनक्षेत्र वाढवू शकतो असंही त्यांनी नमूद
केलं.
*****
***
No comments:
Post a Comment