Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 27 January 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २७ जानेवारी २०१९ सायंकाळी ६.००
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केरळमधल्या कोची इथं भारत पेट्रोलियम
कॉर्पोरेशनच्या तेलशुद्धिकरण प्रकल्पाच्या विस्ताराच्या कामाच्या कोनशिलेचं अनावरण
केलं. तसंच त्यांनी पेट्रोरासायनिक प्रकल्पाची पायाभरणी, कोची इथं स्वयंपाकाच्या गॅस
सिलिंडरचा प्रकल्प आणि एट्टुमनुर इथं कौशल्य विकास संस्थेची पायाभरणीही केली. तत्पूर्वी
पंतप्रधानांनी आज सकाळी तामिळनाडूमधल्या मदुराई इथं अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था
- एम्सच्या कोनशिलेचं अनावरण केलं. सर्वांसाठी आरोग्य आणि परवडणाऱ्या दरात आरोग्य सुविधा,
याला राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचं सर्वोच्च प्रधान्य असल्याचं, पंतप्रधानांनी नमूद
केलं.
****
संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या
अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी येत्या बुधवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. लोकसभेचं
कामकाज सुरळीत चालावं, याकरता त्या या बैठकीत सर्वपक्षीय खासदारांना आवाहन करणार आहेत.
येत्या ३१ जानेवारीला अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होईल. अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपती
रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानं होईल. येत्या एक फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प
सादर होईल. हे अधिवेशन १३ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.
****
केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल यांनी उद्या सरकारी बँकांच्या
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. केंद्रीय मंत्री अरुण जेटली सध्या
उपचारांसाठी अमेरिकेला गेले असल्यानं अर्थसंकल्प सादर करण्याची जबाबदारी गोयल यांच्यावर
सोपवण्यात आली आहे. बँकांची बुडीत कर्जं आणि लघु तसंच मध्यम उद्योगांना वित्तपुरवठा
या विषयांवर उद्याच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
****
केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्यविषयक योजनांच्या माध्यमातून
प्रत्येक गरीब आणि मध्यमवर्गीय रुग्णांच्या पाठीशी शासन भक्कमपणे उभं आहे, त्यामुळे
प्रत्येक नागरिकाला सुरक्षा कवच मिळाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं
आहे. नागपूर इथं आज अटल आरोग्य शिबिराचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. राज्य शासनाच्या
महात्मा फुले जन आरोग्य योजनेतूनही गरीब आणि मध्यमवर्गीय रुग्णांवर सुमारे तेवीसशे
आजारांवर उपचार होत असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
लातूर महानगरपालिकेनं अतिक्रमणात हटवलेल्या फेरीवाल्यांना जागा
उपलब्ध करुन देण्याबाबतचं धोरण तात्काळ जाहीर करावं, असं पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर
यांनी म्हटलं आहे. लातूर शहरातल्या १२ शौचालयांचं लोकार्पण, रस्ते भूमीपूजन, सामाजिक
सभागृह उद्घाटन तसंच गंजगोलाई सुशोभिकरण आदी कामांच्या शुभारंभ प्रसंगी ते आज बोलत
होते. महानगरपालिकेनं त्वरित सर्वसाधारण सभा घेऊन त्यामध्ये वर्षानुवर्षे लातूर शहरात
राहणाऱ्या, परंतू आजपर्यंत त्यांच्या नावावर जागा न झालेल्या सुमारे तीन हजार कुटुंबांना
पुढच्या दहा दिवसांत कबाले वाटप करण्याचा निर्णय घेण्याचे निर्देश निलंगेकर यांनी दिले.
****
नाटकाच्या माध्यमातून बदलणारा काळ, या बदलत्या काळात मुलांच्या
मनात सुरु असलेली घुसमट, त्यांचा ताण रंगमंचावर व्यक्त व्हायला हवा, असं मत ज्येष्ठ
रंगकर्मी प्रा. गिरीश सहदेव यांनी व्यक्त केलं. लातूर इथं आज सोळाव्या राज्य बाल नाट्य
स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. लहान मुलांच्या विषयांकडे
दिग्दर्शक, नाट्य लेखकांनी अधिक गांभीर्यानं पहायला हवं, असं सांगतानाच त्यांनी मुलांना
आनंदासाठी नाटकांकडे वळा, असा सल्लाही दिला.
****
औरंगाबाद इथं एक ते चार फेब्रुवारी दरम्यान पाचवं राज्यस्तरीय
कृषी प्रदर्शन महा अॅग्रोचं आयोजन करण्यात आलं आहे. या प्रदर्शनाचे समन्वयक वसंत देशमुख
यांनी आज औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत ही माहीती दिली. पैठण मार्गावरच्या कृषी विज्ञान
केंद्र परिसरातल्या मैदानावर हे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.
****
भारतीय बॅडमिंटनपटू सायना नेहवालला इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन
स्पर्धेची विजेती म्हणून घोषित करण्यात आलं. आज झालेल्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत
सायनाची प्रतिस्पर्धी स्पेनच्या कॅरोलिना मरिनला सामन्यादरम्यान दुखापत झाल्यामुळे
तिनं स्पर्धेतून माघार घेतली. मरिन ही उत्तम प्रतिस्पर्धी असून, दुखापतीमुळे तिनं माघार
घेणं दुर्देवी असल्याचं सायनानं म्हटलं आहे.
****
भारत आणि न्यूझीलंडदरम्यान तिसरा एकदिवसीय क्रिकेट सामना उद्या
माऊंट मौंगानुई इथं होणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी साडे सात वाजता सामन्याला सुरुवात
होईल. पाच सामन्यांच्या मालिकेत भारत दोन - शून्यनं आघाडीवर आहे.
****
विदर्भाच्या काही भागात तापमानात लक्षणीय घट, तर मराठवाड्यात
तापमानात किंचित घट झाली आहे. आज सर्वात कमी आठ अंश सेल्सिअस तापमान नाशिक इथं नोंदवलं
गेलं. औरंगाबाद १३, उस्मानाबाद १४ पूर्णांक सहा, परभणी १५, तर नांदेड आणि बीड इथं सरासरी
१६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
****
No comments:
Post a Comment