Friday, 25 January 2019

Text - AIR News Bulletin, Aurangabad 25.01.2019....18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 25 January 2019

Time 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २५ जानेवारी २०१९ सायंकाळी ६.००

****

सत्तरावा प्रजासत्ताक दिन उद्या साजरा होत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व केंद्रांवरुन संध्याकाळी सात वाजता प्रथम हिंदी आणि नंतर इंग्रजीतून राष्ट्राला संबोधित करतील. त्यानंतर दूरदर्शनवरून प्रादेशिक भाषेतून त्यांच्या या संदेशाचा अनुवाद प्रसारित होईल, तर आकाशवाणीवरुन तो रात्री साडेनऊ नंतर प्रासारित होईल.

दरम्यान, प्रजासत्ताक दिनाच्या दिल्ली इथं होणाऱ्या मुख्य समारंभाला दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

****

प्रजासत्ताक दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा सरकारनं आज केली. लान्स नायक नजीर अहमद वाणी यांना मरणोत्तर अशोक चक्र जाहीर झालं आहे. मेजर तुषार गौबा आणि विजय कुमार यांना किर्ती चक्र, तर नऊ जवानांना शौर्य चक्र पुरस्कार जाहीर झाले. परम विशिष्ठ सेवा पदक १९ जणांना, उत्तम युद्ध सेवा पदक तीन जणांना, अति विशिष्ठ सेवा पदक ३२ जणांना, युद्ध सेवा पदक दहा जणांना, शौर्य सेवा पदक १०९ जणांना, वैशिष्ठ्यपूर्ण सेवा पदक ४० जणांना, तर विशिष्ठ सेवा पदक शहात्तर जणांना जाहीर झाले. 

राष्ट्रपती पोलिस वीरता पदक तीन जणांना, तर पोलिस वीरता पदक १४६ पोलिसांना प्रदान करण्यात येणार आहे. राज्यातल्या ४४ पोलिसांना पुरस्कार जाहीर झाले असून, त्यापैकी चार जणांना उत्कृष्ट कार्याबद्दल राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले. यात बिपिन कुमार सिंग, भास्कर महाडिक, दिनेश जोशी आणि विष्णु नागले यांचा समावेश आहे.

जीवन रक्षा पदक पुरस्कारही आज जाहीर झाले. दैनंदिन जीवनात मानवाच्या संरक्षणासाठी उत्तम कामगिरी बजावणाऱ्या देशातल्या ४८ व्यक्तींना हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. यात राज्यातल्या पाच जणांचा समावेश आहे. कौस्तुभ तारमाळे आणि प्रथमेश वाडकर यांना मरणोत्तर 'सर्वोत्तम जीवन रक्षा पदक', डॉ. चरणजित सिंह सलुजा आणि अमोल लोहार यांना ‘उत्तम जीवन रक्षा पदक’, तर धैर्यशील आडके यांना ‘जीवन रक्षा पदक’ जाहीर झालं आहे.

****

आगामी निवडणुकांमध्ये पहिल्यांदा मतदान करणाऱ्या युवकांवर २१व्या शतकातला भारत निर्माण करणारं सरकार निवडण्याची जबाबदारी असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आज नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. नवीन मतदारांनी जबाबदारी आणि जागरुकतेनं आपल्या अधिकाराचा वापर करावा, असं ते म्हणाले. मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी निवडणूक आयोगानं केलेल्या प्रयत्नांची राष्ट्रपतींनी प्रशंसा केली.

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त’ राज्याचे अपर मुख्य सचिव बिपिन मलिक यांनी आज मंत्रालयातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शपथ दिली.

****

आयकरातून प्राप्त होणाऱ्या महसुलाचा उपयोग देशाचा विकास आणि नागरिकांच्या कल्याणासाठी केला जात असल्याचं अर्थमंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आज आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रामाणिक करदात्यांकडून मिळालेल्या महसुलाचा योग्य विनियोग करण्यासंदर्भात सरकार दक्ष असल्याचं ते म्हणाले. अधिकाऱ्यांनी ग्राहकांच्या अनुकूल दृष्टीकोन ठेवायला पाहिजे, असंही गोयल यावेळी म्हणाले.

****

वातावरण बदलाचं आव्हान स्वीकारण्यासाठी बदलत्या जीवनशैलीवर गांभीर्यानं चर्चा व्हावी, अशी अपेक्षा केंद्रीय कृषी आणि ग्रामीण विकास राज्यमंत्री पुरषोत्तम रुपाला यांनी व्यक्त केली. लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातल्या लोदगा इथं आज आयोजित हवामान बदल आणि नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यशाळेचं प्रास्ताविक करताना राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी, मानव जातीच्या कल्याणासाठी विकासाच्या दिशा बदलण्याची गरज व्यक्त केली.

****

परभणी जिल्ह्याच्या पाथरी तालुक्यातला आमराई-तारूगव्हाण-पोहनेर हा रस्ता दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी आज तारुगव्हाण इथं रस्ता रोको आंदोलन केलं. गोदावरी नदीवरच्या पोहनेर पुलावरून बीड जिल्ह्यात जाण्यासाठीचा हा जवळचा मार्ग असून, या मार्गावर खड्डे पडल्यानं वाहतुकीस मोठी अडचण होत असल्याची तक्रार नागरिक अनेक दिवसांपासून करत आहेत. सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं.

****

परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातल्या हट्टा गावाजवळ ऑटो रिक्षा उलटून झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले. आज दुपारी हा अपघात झाला.

****

जकार्ता इथं सुरु असलेल्या मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या सायना नेहवालनं उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे. आज झालेल्या उपान्त्यपूर्व फेरीत सायनानं थायलंडच्या खेळाडुचा पराभव केला.

****

No comments: