Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 23 January 2018
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २३ जानेवारी २०१८ सकाळी ७.१० मि.
****
** शासकीय योजनांमध्ये लाभार्थ्यांसाठी असलेल्या निधीच्या
अपहाराला तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं शंभर टक्के प्रतिबंध - पंतप्रधानांचं प्रतिपादन
** दिव्यांग व्यक्तींना हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही
फिरत्या वाहनांवरील दुकानं मोफत देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
** दहशतवाद विरोधी पथक एटीएसकडून औरंगाबाद आणि ठाण्यातून
नऊ जण ताब्यात
आणि
** आयसीसी मानांकनात कर्णधार विराट कोहली अव्वल
****
शासकीय योजनांमध्ये लाभार्थ्यांसाठी असलेल्या निधीच्या
अपहाराला तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं शंभर टक्के प्रतिबंध केल्याचं, पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी म्हटलं आहे. वाराणसी इथं आयोजित पंधराव्या प्रवासी भारतीय दिवसाचं उद्धाटन
पंतप्रधानांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. गेल्या साडे चार वर्षांच्या
कालावधीत सात कोटी बनावट लाभार्थी शोधून काढले असून, थेट लाभ हस्तांतरण योजनेअंतर्गत
विविध योजनांतर्गत, पाच लाख ऐंशी हजार कोटी रुपये लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात
जमा केल्याची माहितीही पंतप्रधानांनी दिली. मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ, परराष्ट्र
व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
****
राष्ट्रपती
रामनाथ कोविंद यांनी काल नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०१९
प्रदान केले. महाराष्ट्राच्या तृप्तराज
अतुल पंड्या, एंजल देवकुळे यांच्यासह २६ बालकांना विविध क्षेत्रातल्या योगदानाबद्दल
बाल शक्ती पुरस्कार देऊन तर दोन
व्यक्ती, तसंच तीन संस्थांना बाल
कल्याण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
****
लोकसभेच्या आगामी निवडणुकीतल्या पराभवाची संभाव्य कारणं
काँग्रेस पक्ष आतापासूनच शोधत असल्याचं, केंद्रीय न्याय आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री
रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे. लंडनमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र हॅक करण्यासंदर्भात
झालेल्या एका पत्रकार परिषदेच्या पार्श्वभूमीवर, ते काल दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.
या पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते कपिल सिब्बल उपस्थित असल्याबद्दल त्यांनी टीका केली.
काँग्रेस पक्ष सुनियोजित पद्धतीनं भारतीय लोकशाही, आणि निवडणूक आयोगाबाबत गैरसमज पसरवत
असल्याचं, ते म्हणाले. निवडणुकीत काँग्रेसचा विजय होतो, त्यावेळी इलेक्ट्रॉनिक मतदान
यंत्रात काहीही गडबड नसते, मात्र भाजपचा विजय झाल्यास, ईव्हीएमच्या पारदर्शकतेवर शंका
घेतली जाते, याकडेही प्रसाद यांनी लक्ष वेधलं. दरम्यान सिब्बल यांच्या संबंधित पत्रकार
परिषदेत उपस्थितीशी पक्षाचा संबंध नसल्याचं, काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. सिब्बल यांनी मात्र, संबंधित हॅकरनं केलेल्या आरोपांची
सरकारनं चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.
****
दिव्यांग व्यक्तींसाठी हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही
फिरत्या वाहनांवरील दुकानं मोफत देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. दिव्यांग
व्यक्तींना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या आणि त्यांच्या सामाजिक - आर्थिक संरक्षणासाठी
हा निर्णय घेण्यात आला असून, यासाठी २५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
मुंबईत दादर इथं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं
राष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी १०० कोटी रुपयांच्या निधीला काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या
बैठकीत मान्यता देण्यात आली. हा निधी महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत उपलब्ध
करुन देण्यात येणार आहे.
पुण्यातल्या फर्ग्युसन महाविद्यालय या स्वायत्त शिक्षण
संस्थेचं रुपांतर फर्ग्युसन विद्यापीठामध्ये करण्यास, तसंच मुंबई शहरातल्या सार्वजनिक
ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी केंद्र शासन पुरस्कृत महिला सुरक्षा हा २५२ कोटी रूपयांचा
प्रकल्प राबवण्यासही राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली.
राज्यातले निवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षक, हवालदार, पोलीस
नाईक आणि पोलीस शिपाई यांचा महात्मा फुले जन आरोग्य योजनेत समावेश करण्यासही मंत्रिमंडळानं
मान्यता दिली.
****
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे आंतरराष्ट्रीय
दर्जाचे स्मारक उभारण्यासंदर्भात लवकरात लवकर कार्यवाही सुरु करा, असे निर्देश सामाजिक
न्याय आणि विशेष सहाय्य राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले
आहेत. स्मारक उभारण्यासंदर्भात काल मुंबईत आयोजित बैठकीत ते बोलत होते. आंतरराष्ट्रीय
दर्जाचे हे स्मारक उभारण्यासंदर्भात कुठलीही अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता घेऊन
कामकाज वेगाने सुरु करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
****
भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक येत्या
२८ जानेवारी रोजी जालना इथं होणार आहे. पक्षाचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी काल
मुंबईत दिली. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक असेल.
दरम्यान, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत
सांगली इथं आज होणारा पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा रद्द झाल्याचं भंडारी यांनी सांगितलं.
****
ब्राह्मण समाजासाठी आरक्षणासह विविध मागण्यांसाठी काल
मुंबईत आझाद मैदानावर आंदोलन करण्यात आलं. यावेळी एका शिष्टमंडळानं मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांची भेट घेऊन, त्यांना मागण्यांचं निवेदन सादर केलं
****
राज्यातल्या महिला बचत गटांच्या सहभागातून आयोजित ‘महालक्ष्मी
सरस’ या प्रदर्शनाचे उद्घाटन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते आज सकाळी होणार
आहे. मुंबईत वांद्रा कुर्ला संकुल इथं आयोजित या कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते
राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
****
हे बातमीपत्र
आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
दहशतवाद विरोधी पथक एटीएसनं काल औरंगाबाद आणि ठाण्यातून
एकूण नऊ जणांना ताब्यात घेतलं. या सर्वजणांच्या संशयास्पद हालचालींविषयी माहिती मिळाल्यानं,
काल ही कारवाई करण्यात आल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून
या सर्वजणांवर नजर ठेऊन असल्याचं, तसंच सर्वांची सध्या कसून चौकशी सुरू असल्याची माहिती
एटीएसच्या अधिकाऱ्यानं दिल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आयसीसी
मानांकनात भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली अव्वल ठरला आहे. आयसीसीच्या कसोटी
संघ तसंच एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याची निवड
झाली आहे. आयसीसीनं हे मानांकन काल जारी केलं. आयसीसीचा सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूला
दिला जाणारा सर गॅरफिल्ड सोबर्स पुरस्कार ही कोहलीला जाहीर झाला आहे. विराटने गेल्या
वर्षभरात एक दिवसीय क्रिकेटमध्ये १३३ पूर्णांक ५५ शतांशच्या सरासरीने एक हजार २०२ धावा
काढल्या, यामध्ये सहा शतकं आणि तीन अर्धशतकांचाही समावेश आहे.
दरम्यान, भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर
दाखल झाला असून, एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. पाच सामन्यांच्या
या मालिकेनंतर तीन टी ट्वेंटी सामन्यांची मालिकाही होणार आहे.
****
शिवसेनेच्या
वतीनं काल औरंगाबाद इथल्या विविध
बँकांमध्ये शेतकरी कर्जमाफी विषयी माहिती घेण्यात आली. खासदार
चंद्रकांत खैरे यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळानं बँक व्यवस्थापनांची भेट घेऊन, ही माहिती
लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात
आली.
दरम्यान, यासंदर्भात शिवसेनेच्या वतीनं आज विभागीय आयुक्त
कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
****
राज्य शासकीय, निम शासकीय लिपीकसंवर्गीय हक्क परिषदेनं
विविध मागण्यांसदर्भात काल औरंगाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालयावर इशारा मोर्चा काढला.
या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. या मागण्यासंदर्भात शासनानं सकारात्मक
निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. परभणी, वाशिम इथंही
या परिषदेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
****
जालना तालुक्यातल्या रामनगर इथं नियोजित उपजिल्हा रुग्णालयाच्या
इमारतीचं भूमिपूजन काल राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते झालं. ग्रामीण भागात
चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी, तीन कोटी ८० लाख रुपये खर्चून, ३० खाटांचं
हे रुग्णालयात उभारण्यात येत असून, याचा नागरिकांना फायदा होईलं, असं खोतकर म्हणाले.
****
उस्मानाबाद इथं, राष्ट्र सेविका समितीच्या वतीने स्वाधार
मतिमंद मुलींच्या बालगृहात काल संक्रांत स्नेहमिलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं.
यावेळी बालगृहातल्या मुलींना स्वच्छतेचं महत्त्व सांगत, सॅनेटरी नॅपकिनचं वाटप करण्यात
आलं.
****
अहमदनगर पोलिसांच्या गुन्हे शाखेनं परप्रांतीय
सहा दरोडेखोरांच्या एका टोळीला
काल जेरबंद केलं. या सर्वांच्या ताब्यातून सुमारे दहा लाख रुपयांचा मुद्देमाल
हस्तगत करण्यात आला आहे.
****
औरंगाबाद
शहरात अनधिकृतरित्या गर्भलिंग निदान चाचणी केंद्र चालवणाऱ्या डॉक्टरला काल अटक करण्यात आली. सुरज राणा असं या डॉक्टरचं नाव असून, महापालिकेचा आरोग्य विभाग आणि पोलिस पथकानं केलेल्या या कारवाईत, दवाखान्यातला एक कर्मचारी आणि एका रिक्षाचालकालाही ताब्यात घेतलं आहे.
****
औरंगाबाद
महानगरपालिकेच्या वतीनं आजपासून स्मार्ट सिटी अंतर्गत शहर बससेवा सुरू करण्यात येत
आहे. पहिल्या टप्प्यात १४
मार्गांवर २४ बस सुरू
करण्यात येणार आहेत.
****
लातूर
जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संघाचं ३६वं वार्षिक अधिवेशन येत्या २८ जानेवारीला सावरगाव
इथं होणार आहे. लातूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष त्र्यंबकदास झंवर यांच्या अध्यक्षतेखाली हे अधिवेशन होणार आहे.
****
राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेनं
येत्या २९ आणि ३० जानेवारीला संपाचा इशारा दिला आहे. चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना २०१६
पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा, सेवानिवृत्त चतुर्थश्रेणी कर्मचार्ऱ्यांच्या
एका पाल्याला शासन सेवेत सामावून घ्यावं, इत्यादी मागण्यांसाठी हा संप करणार असल्याचं
संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांनी सांगितलं.
//**************//
No comments:
Post a Comment