Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 31 January 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३१ जानेवारी २०१९ सायंकाळी ६.००
****
संसदेच्या
अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानं सुरुवात झाली.
संसदेच्या दोन्ही सभागृहात राष्ट्रपतींचं अभिभाषण पटलावर ठेवल्यानंतर कामकाज स्थगित
करण्यात आलं. राज्यसभेत माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडीस यांना श्रद्धांजली अर्पण
करण्यात आली. उद्या केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल लोकसभेत अंतरिम अर्थसंकल्प सादर
करतील.
****
दरम्यान,
राष्ट्रपतींचं अभिभाषण हे निवडणुकीचं भाषण होतं, अशी टीका काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन
खरगे यांनी केली आहे. या भाषणात काहीही नाविन्य नव्हतं, असं त्यांनी संसद परिसरात वार्ताहरांशी
बोलताना सांगितलं.
सरकारनं
भेदभाव न करता सर्व स्तरातल्या लोकांचा विकास सुनिश्चित केल्याचं अल्पसंख्यांक व्यवहार
मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटलं आहे. शेतकरी आणि गरीबांना या विकासाचा लाभ
झाल्याचं त्यांनी नमूद केलं.
****
केंद्रीय
गुन्हे अन्वेषण विभाग - सीबीआयचे माजी विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्या नागरी हवाई
वाहतूक सुरक्षा मंडळाच्या संचालकपदी झालेल्या नियुक्तीला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च
न्यायालयानं आज फेटाळून लावली. दिल्ली उच्च न्यायालयानं ११ जानेवारीला अस्थाना यांच्याविरुद्ध
लाचखोरी संदर्भातला प्राथमिक पाहणी अहवाल रद्द करायला नकार दिला होता आणि या प्रकरणाची
तपासणी करायला दहा आठवड्यांची मुदत दिली होती.
****
मराठवाड्याचा
प्रादेशिक असमतोल दूर होऊन विकास व्हावा, यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अभ्यासकांनी
एकत्र यावं, असं आवाहन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केलं आहे. औरंगाबाद इथं
आज एकात्मिक राज्य जल आराखडा आणि मराठवाड्यातल्या विविध प्रश्नांवर चर्चासत्र झालं,
त्यावेळी ते बोलत होते. मराठवाड्यात पाण्याची प्रमुख मागणी आहे, त्यासाठी सर्वोत्तोपरी
प्रयत्न करण्यासाठी कटीबध्द असल्याचं त्यांनी सांगितलं. या चर्चासत्रात मराठवाड्यातले
लोकप्रतिनिधी कमी संख्येनं उपस्थित राहिल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. वैधानिक
विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ.भागवत कराड, आमदार प्रशांत बंब, महापौर नंदकुमार घोडेले,
नांदेडच्या महापौर शिला भवरे, मराठवाडा विकास परिषदच्या सदस्यांनी मराठवाड्यातल्या
विविध प्रश्नांवर यावेळी चर्चा केली.
****
औरंगाबाद
महानगरपालिका कार्यक्षेत्रातल्या रहिवाशांच्या थकीत मालमत्ता करावरील संपूर्ण व्याज
आणि दंड माफ करावं अशी मागणी आमदार सतीश चव्हाण यांनी महापौर नंदकुमार घोडेले आणि महापालिका
आयुक्त निपुण विनायक यांच्याकडे केली आहे. औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीनं थकीत मालमत्ता
करावर व्याज आणि दंड आकारणीमध्ये ५० टक्के सुट देण्याची अभय योजना सुरू आहे. मात्र
शहरात गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांना आवश्यक त्या सोयी सुविधा मिळत नसल्यामुळे
व्याज आणि दंड माफ करावं, असं चव्हाण यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. मलनि:सारण वाहिन्या
अर्धवट टाकून सुध्दा त्याची वसूली नागरिकांकडून कर रूपाने होत असल्याचं चव्हाण यांनी
या पत्रात नमूद केलं आहे.
****
परभणी
जिल्ह्याच्या पालम तालुक्यातल्या ६५ गावांमध्ये राबवण्यात येणाऱ्या वॉटर ग्रीड पाणी
पुरवठा योजनेचा शुभारंभ आज पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या
हस्ते झाला. मराठवाड्यातल्या भीषण पाणी टंचाईवर मात करण्यासाठी वॉटर ग्रीड योजना सुरु
केल्याचं लोणीकर यावेळी म्हणाले.
****
उस्मानाबाद
जिल्हा पोलिस दलाच्या कार्यतत्परतेमुळे जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत असल्याचं
जिल्हा पोलिस अधीक्षक आर राजा यांनी म्हटलं आहे. ते आज उस्मानाबाद इथं वार्ताहरांशी
बोलत होते. उस्मानाबाद, नळदुर्ग, तुळजापूर, कळंब, उमरगा याठिकाणी पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी
९४० निवासस्थानं बांधण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला असल्याचं त्यांनी सांगितलं.
जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीसाठी पाच कोटी ९८ लाख शहात्तर
हजार रुपयांच्या अंदाजपत्रकास मंजुरी मिळाली असून, लवकरच हे काम पूर्ण होईल, असं राजा
यांनी यावेळी सांगितलं.
****
परभणी
शहरातल्या सय्यद शहा तुराबूल हक यांच्या उरुसास आजपासून सुरुवात झाली. या उरुसास राज्यातल्या
विविध भागातून हिंदु मुस्लिम भाविक येतात. १५ दिवस हा उरुस चालणार असून, दोन फेब्रुवारीला
मानाचा संदल निघणार आहे.
****
बुलडाणा
जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातल्या १२ ग्रामपंचायतींवर निधीचा योग्य वापर न केल्याबद्दल
कारवाई होणार आहे. या ग्रामपंचायतींना शुध्द पिण्याचं पाणी उपलब्ध व्हावं यासाठी १४
व्या वित्त आयोगातून आर ओ फिल्टर बसवण्याकरता प्रत्येक ग्रामपंचायतीच्या खात्यातून
तीन लाख ९९ हजार रुपये काढण्यात आले होते. मात्र या ग्रामपंचायतींनी फिल्टर बसवलेच
नसल्याचं उघडकीस आल्यानं त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी
दिले आहेत.
****
No comments:
Post a Comment