Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 30 January 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० जानेवारी २०१९ सायंकाळी ६.००
****
संसदेचं
उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत लोकसभेच्या
अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी बोलावलेली सर्वपक्षीय बैठक सध्या सुरू आहे. या बैठकीला
कॉग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे, के. एस. वेणुगोपाल, रामविलास पासवान, सुदीप
बंडोपाध्याय, भातृहरी मेहताब, नरेंद्र सिंग तोमर, विजय गोयल आणि चंदु माजरा यांच्यासह
अन्य नेते उपस्थित आहेत.
दरम्यान,
या अधिवेशनात एक फेब्रुवारीला संसदेत सादर होणारा अर्थसंकल्प हा अंतरिम अर्थसंकल्पच
असेल, असं सरकारनं आज स्पष्ट केलं आहे. देशात, लोकसभा निवडणुकीच्या आधी अंतरिम अर्थसंकल्प
सादर करण्याची परंपरा आहे, मात्र, यावेळी पूर्ण अर्थसंकल्प सादर होण्याची वृत्तं माध्यमांमध्ये
आल्यानंतर सरकारनं आज हा खुलासा केला आहे.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज गुजरातमध्ये सुरत इथल्या विमानतळाच्या टर्मिनल इमारतीच्या
विस्तारीकरणाच्या कामाचं भूमीपूजन तसंच व्हीनस, या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचं उद्घाटन
आणि लोकार्पण झालं. केंद्र सरकारनं गेल्या साडेचार वर्षात केलेल्या विविध जनकल्याण
योजनांचा आढावा पंतप्रधानांनी यावेळी बोलताना घेतला. नोटबंदीचा निर्णय आणि रेरा कायदा,
उडान योजना, प्रधानमंत्री आवास योजना यासह अन्य योजनांमुळे सामान्य माणसांचं जीवन सोपं
झाल्याचं त्यांनी नमूद केलं. आपल्या सरकारनं या साडेचार वर्षात जितकं काम केलं आहे,
तितकं काम करायला मागच्या सरकारनं अजून पंचवीस वर्षं घेतली असती, असं सांगत, हे सगळं
काम करणं, बहुमताचं मजबूत सरकार असल्यानंच शक्य झालं, असं प्रतिपादन पंतप्रधानांनी
केलं.
नवसारी
जिल्ह्यात ‘दांडी’ इथं उभारण्यात आलेल्या ‘राष्ट्रीय मीठ सत्याग्रह स्मारका’चं आणि
संग्रहालयाचं लोकार्पणही मोदी यांनी केलं.
****
शेतकऱ्यांचं
कर्ज फक्त एकदा पूर्ण माफ केलं आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी सुरू
केली, की पुन्हा सरकारकडे काही मागण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार नाही, यासाठी सरकारनं
याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन तो अंमलात आणावा, असं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी
म्हटलं आहे. आज राळेगणसिद्धी इथे उपोषणाला सुरुवात करताना ते वार्ताहरांशी बोलत होते.
लोकपाल कायद्याची अंमलबजावणी करण्याचं आश्वासन सरकारनं पाच वर्षांत पूर्ण केलं नाही,
असं सांगत, राज्याच्या विधानसभेत लोकायुक्त कायदा मंजूर करून लोकायुक्तांची नियुक्ती
करावी, अशी मागणी हजारे यांनी केली. जनतेला आपल्या मागण्यांसाठी उपोषण करण्याची वेळ
येणं हे दुर्दैवी असल्याचं सांगत, मागण्या मान्य झाल्या नाहीत तर शरीरात प्राण असेपर्यंत
उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार अण्णा हजारे यांनी यावेळी व्यक्त केला.
****
राष्ट्रपिता
महात्मा गांधी यांच्या एक्काहत्तराव्या पुण्यतिथीनिमित्त आज विधानभवनात त्यांना अभिवादन
करण्यात आलं. महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पं अर्पण करून मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ
बागडे यांनी आदरांजली वाहिली. त्याआधी, १९५६च्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात बलिदान
दिलेल्या हुताम्यांचं स्मरण करुन आणि दोन मिनिटं मौन पाळून त्यांना श्रध्दांजली अर्पण
करण्यात आली.
****
राज्यात
आजही थंडीचा कडाका कायम होता. मराठवाड्यापेक्षा विदर्भात थंडीची लाट अधिक तीव्रतेनं
जाणवत आहे. परभणीचं आजचं तापमान चार अंश सेल्शियसपर्यंत घसरल्याची नोंद तिथल्या कृषी
विद्यापीठाच्या हवामान विभागानं केली आहे. थंडीची ही लाट पुढचे दोन दिवस अशीच राहणार
असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.
****
जागतिक
कुष्ठरोग दिनानिमित्त आजपासून राज्यभरात जनजागृती पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त
जिल्हास्तरावर प्रभात फेरी, प्रश्नमंजुषा, पथनाट्य अशा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून
कुष्ठरोगाविषयी जागृती केली जाणार आहे. केंद्र शासनानं कुष्ठरोग्यांचं प्रमाण दर दहा
हजार व्यक्तींमागे एकपेक्षा कमी करण्याचं उद्दिष्ट दिलं असल्याची, तसंच गेल्या वर्षी
राज्यात राबवलेल्या कुष्ठरोग शोध अभियानात बारा हजार चारशे पंधरा नवीन कुष्ठरुग्ण आढळून
आले असल्याची माहिती आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली.
****
No comments:
Post a Comment