Saturday, 26 January 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 26.01.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 26  january 2019

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २६  जानेवारी २०१९  दुपारी १.०० वा.

****



सत्तरावा प्रजासत्ताक दिन आज देशभरात हर्षोल्लासात साजरा होत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिल्ली इथल्या मुख्य समारंभाला दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी राजपथावर भारताची शक्ती, कला, संस्कृती आणि विविधतेचं दर्शन घडवणारं पथसंचलन झालं. यंदाचं वर्ष हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं दिडशेवं जयंती वर्ष असल्यानं यावेळी चित्ररथांना ‘गांधी’ हा विषय देण्यात आला होता. १६ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे चित्ररथ आणि सहा केंद्रीय मंत्रालयाचे चित्ररथ संचलनात सहभागी झाले.  तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह तिन्ही दलांच्या प्रमुखांनी इंडिया गेट इथं अमर जवान ज्योतीवर पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केलं.

****



 मुंबई इथं राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगनाथ यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. राज्यांच्या आणि नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नाची राज्यपालांनी यावेळी माहिती दिली.

****



 विकासाच्या दिशेनं वाटचाल करणारा औरंगाबाद जिल्हा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात चांगली प्रगती करत असल्याचं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद इथं पोलिस आयुक्त कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण रावते यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. औरंगाबाद जिल्ह्यात दुष्काळ जाहीर झाला असून, त्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत रावते म्हणाले,



 दुष्काळात संधी माणून पूर्ण क्षमतेने काम करून आदर्श निर्माण करण्याच्या औरंगाबादच्या शेतकऱ्यांचा हातखंड राहिलेला आहे. तसेच नेत्रदिप कामगिरी यावर्षी देखील आमचे शेतकरी आणि प्रशासन मिळून करून दाखवतील, याची मला खात्री आहे. मराठवाड्याच्या तीव्र दुष्काळ भागाला नजरे समोर ठेऊन जागतिक बँकेच्या सहकार्यातून नानाजी देशमूख कृषी संजीवनी प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. शेतकऱ्यांच्या व्यक्तीगत लाभाच्या योजनावर मृदू व जलसंधारणावर आवश्यक तेवढा खर्च व निधी विना जागतिक बँकेच्या आर्थ सह्यातून उपलब्ध करून देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी संपूर्ण सहभाग दर्शवल्यास या योजना भविष्यात क्रांती घउवून दुष्काळ मूक्तीसाठी वाट दाखवणार असल्याने याचा आपण पूरेपूर फायदा उठवावा. असं मी आव्हानही करतो आहे.

****



 बीड इथं पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. बीड जिल्ह्यात आता विकासानं गती घेतली असून, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक विकासाबरोबरच आता क्रीडा विकासही हा मोठ्या प्रमाणावर करण्याचा आपला मानस असल्याचं मुंडे यावेळी म्हणाल्या.

****



 उस्मानाबाद इथं पालकमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. आकांक्षित जिल्हा म्हणून उस्मानाबाद जिल्ह्यात विविध पायाभूत सुविधा, आरोग्य सुविधा, शिक्षण क्षेत्राचा विकास, महिला सक्षमीकरण, शेती आणि शेतीपूरक व्यवसाय वाढीसाठी विशेष प्रयत्न होत असल्यामुळे, जिल्ह्याचा क्रमांक ३२वा राहिला असल्याचं खोतकर यावेळी म्हणाले. 

****



 जालना इथं पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते, परभणी इथं पालकमंत्री गुलाबराव पाटील, लातूर इथं पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते, नांदेड इथं पालकमंत्री रामदास कदम, तर हिंगोली इथं पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं.

****



 जम्मू काश्मीरमधल्या श्रीनगरच्या पम्पोर परिसरात सुरक्षा बलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले. आज पहाटे उडालेल्या या चकमकीत तीन जवान जखमी झाले. मारले गेलेले दहशतवादी  जैश - ए - मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****



 भारत आणि न्यूझीलंडदरम्यान माऊंट मौंगानुई इथं सुरु असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं न्यूझीलंडसमोर ३२५ धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघानं निर्धारित षटकात चार बाद ३२४ धावा केल्या. सलामीवीर रोहित शर्मानं ८७, तर शिखर धवननं ६६ धावा केल्या. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा न्यूझीलंडनं १६ षटकात तीन बाद ९७ धावा केल्या होत्या.   

****



 जालना जिल्ह्यातल्या अंबड इथले सहाय्यक निबंधक संजीव देवरे यांना ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना काल रात्री अटक करण्यात आली. तक्रारदारानं सहकारी संस्थेविरुद्ध दिलेल्या तक्रारी अर्जाचा निकाल नियमानुसार देण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती. 

****



 भारतीय दिवाळखोरी अधिनियम परिपूर्ण आहे, असं मत व्यक्त करत दिवाळखोरी कायद्याला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. या निर्णयामुळे गैरव्यवहार करुनही व्यावसायिक आस्थापना ताब्यात ठेवण्याची अपेक्षा असणाऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

*****

***

No comments: