आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
३० जानेवारी २०१९ सकाळी ११.०० वाजता
****
महात्मा गांधी यांच्या एक्काहत्तराव्या पुण्यतिथीनिमित्त
आज देशभरातून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात
येतो. राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांना
आदरांजली वाहिली आहे. गांधीजींना वंदन करण्यासाठी नवी दिल्लीतल्या राजघाट इथल्या त्यांच्या
समाधीवर विविध राजकीय नेते हजेरी लावत असून, त्या ठिकाणी सर्व धर्म प्रार्थना आयोजित
करण्यात आली आहे.
****
गुजरात मध्ये नवसारी जिल्ह्यात दांडी इथे उभारण्यात
आलेल्या राष्ट्रीय मीठ सत्याग्रह स्मारकाचं लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या
हस्ते होणार आहे. त्यापूर्वी पंतप्रधान आज सुरत विमानतळ इमारतीच्या विस्तारीकरणाच्या
प्रकल्पाचं भूमीपूजन करतील. सुरतमध्ये नवभारत युवा परिषदेतही पंतप्रधान सहभागी होत
असून, युवकांशी संवादही साधणार आहेत.
****
संसदेच्या येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर
लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी आज सर्व पक्षीय बैठक बोलावली आहे. या सत्राच्या
सुरुवातीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करतील. येत्या
एक फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प सादर केला जाईल. संसदेचं हे सत्र येत्या तेरा फेब्रुवारीपर्यंत
चालणार आहे.
****
लोकायुक्त अधिनियम सुधारणेचा
प्रस्ताव विधिमंडळात मंजूर होऊन कायदा बनेपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचं, ज्येष्ठ
सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे. लोकपाल आणि लोकायुक्त नियुक्तीच्या
मागणीसाठी अण्णा आजपासून उपोषण पुकारत आहेत. त्यांना उपोषणापासून परावृत्त करण्यासाठी जलसंपदामंत्री
गिरीश महाजन त्यांच्या भेटीला येणार होते. मात्र अण्णांनी महाजन यांच्याशी भेट नाकारल्याचं,
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment