Tuesday, 29 January 2019

Text - AIR News Bulletin, Aurangabad 29.01.2019....Evening Bulletin


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29 January 2019

Time 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ जानेवारी २०१९ सायंकाळी ६.००

****

केंद्र सरकारनं नैसर्गिक आपत्तीमुळे प्रभावित सहा राज्यं आणि एका केंद्रशासित प्रदेशाला राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून सात हजार कोटी रुपये अतिरिक्त सहायता निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. यात महाराष्ट्राला दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी चार हजार ७१४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. महाराष्ट्रासह, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि पुदुच्चेरी यांचा समावेश आहे. गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालच्या एका उच्चस्तरीय समितीनं हा निधी देण्यास मंजुरी दिली.

****

लोक आयुक्तांच्या चौकशीच्या कार्यकक्षेत मुख्यमंत्री पदाचा समावेश करण्यास राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली. यामुळे लोकायुक्त मुख्यमंत्र्यांची चौकशी करु शकतील. सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी या निर्णयाचं स्वागत केलं.

गावातल्या मालमत्तांच्या कर आकारणी पद्धतीत सुधारणा करण्यासाठी मालमत्ता पत्रक तयार करण्यास, उच्चदाब उपसा जलसिंचन योजनांना वीज दरात सवलत देण्यास, अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांतल्या नव उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना प्रकल्पाच्या कमाल १५ टक्के फरकाची रक्कम देण्यासही आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

एकात्मिक नगर वसाहत प्रकल्पांसाठी शेतजमीन खरेदी करताना शेतजमीन धारणेच्या कमाल मर्यादेतून सूट देण्यासाठी महाराष्ट्र शेतजमीन अधिनियमात सुधारणा करण्यासही मंत्रिमंडळानं मान्यता दिली.

औद्योगिक वापरासाठी मंजूर केलेल्या शासकीय जमिनीचा वापर अधिमूल्य आकारून इतर प्रयोजनासाठी करण्यास परवानगी देण्यात आली. या निर्णयामुळे अशा प्रकारच्या जमिनी विकास प्रक्रियेत सामावून घेण्यास मदत होणार आहे.

२०१५ मध्ये पार पडलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी २०१८ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ६६ मध्ये सुधारणा करण्यासही राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली.

****

कृत्रिम बुद्धीमत्ता, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि समाजातल्या सर्वच घटकांच्या सहभागामुळे आपत्तीवर मात करण्याचे नवनवीन मार्ग शोधले पाहिजे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईत आज चौथ्या आंतरराष्ट्रीय आपत्ती निवारण परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. महाराष्ट्रात दुष्काळासारख्या नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार सारखी योजना यशस्वी ठरली असल्याचं ते म्हणाले.

****

माजी केंद्रीय संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडीस यांच्या निधनाबद्दल राज्यपाल सी विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केलं आहे. जॉर्ज फर्नांडीस हे स्वातंत्र्योत्तर काळातले कामगार आणि कष्टकरी वर्गाचे धुरंधर नेते होते, असं राज्यपालांनी आपल्या शोक संदेशात म्हटलं आहे. देशातल्या कामगार चळवळीचे प्रणेते फर्नांडीस यांच्या निधनानं आपण एक महत्वाचं राजकीय व्यक्तिमत्त्व गमावल्याचं सांगून मुख्यमंत्र्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. 

****

प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्ली इथं आयोजित चार दिवसीय कार्यक्रमाचा समारोप आज बीटिंग द रीट्रिट कार्यक्रमानं होत आहे. ऐतिहासिक विजय चौकात हा कार्यक्रम होत असून, लष्कर, नौदल, हवाई दल, दिल्ली पोलीस आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे बँड्स एकूण २७ रचना त्यात सादर करत आहेत.

****

बालमृत्यू तसंच कुपोषणाचं प्रमाण कमी करण्यासाठी राज्यातल्या नवजात बालकांना देण्यात येणार्या ‘मुख्यमंत्री शिशू स्वागत कीट’ या योजनेचा शुभारंभ महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते आज झाला. शासकीय रुग्णालयात होणाऱ्या कोणत्याही महिलेच्या पहिल्या प्रसुतीवेळी मुलांच्या संगोपनासाठी राज्य शासनामार्फत हे कीट मोफत देण्यात येणार आहे. बालमृत्यू, कुपोषण रोखण्याबरोबरच बालसंगोपनाच्या दृष्टीनं ही योजना महत्वपूर्ण ठरेल, असं मुंडे यावेळी म्हणाल्या.

****

भारत आणि न्यूझीलंड महिला क्रिकेट संघादरम्यान माऊंट मौंगानुई इथं झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतानं न्यूझीलंडवर आठ गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडच्या संघानं भारतीय संघाला १६२ धावांचं लक्ष्य दिलं, हे लक्ष्य भारतीय महिलांनी ३६व्या षटकातच पूर्ण केलं. स्मृती मानधनानं ९०, तर मिताली राजनं ६३ धावा केल्या. तीन सामन्याच्या मालिकेत भारतानं दोन - शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे.    

****

विदर्भात तापमानात उल्लेखनीय घट, तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तापमानात लक्षणीय घट झाली आहे. राज्यात आज सर्वात कमी सहा पूर्णांक चार अंश सेल्सिअ तापमान यवतमाळ इथं नोंदवलं गेलं. नाशिक आणि औरंगाबाद सरासरी सात, परभणी आठ पूर्णांक दोन, बीड नऊ पूर्णांक सहा, उस्मानाबाद दहा पूर्णांक सात, तर नांदेड इथं ११ पूर्णांक पाच अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

****

No comments: