Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 26 January 2019
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २६ जानेवारी २०१९ सायंकाळी ६.००
****
२०२२
पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचं राज्यपाल
सी विद्यासागर राव यांनी म्हटलं आहे. मुंबईत आज प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित मुख्य
शासकीय सोहळ्यात ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत सुमारे
४१ लाख शेतकऱ्यांना लाभ झाला असल्याचं त्यांनी सांगितलं. ध्वजवंदनाचे प्रमुख पाहुणे
म्हणून मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित
होते. यावेळी भारतीय नौसेना, तटरक्षक दल, राज्य राखीव सुरक्षा दल, मुंबई सशस्त्र पोलिस
दल, मुंबई अग्निशमन दल आणि राष्ट्रीय छात्रसेनेच्या दलानं राज्यपालांना मानवंदना दिली.
****
लातूर
जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजने’अंतर्गत एक ते आठ मेगावॅट क्षमतेचे २५
सौर उर्जा प्रकल्प मंजूर करण्यात आले असून, यातून एकूण ९१ मेगा वॅट वीज निर्मिती होणार
असल्याची घोषणा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी आज केली. लातूर इथं आज प्रजासत्ताक
दिनाचं मुख्य शासकीय ध्वजारोहण निलंगेकर यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते.
हे सौर ऊर्जा प्रकल्प निलंगा, औसा, अहमदपूर, चाकूर, रेणापूर, जळकोट आणि शिरुर अनंतपाळ
या तालुक्यात प्रस्तावित असून, यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरु झाल्याची माहिती
त्यांनी दिली. या योजनेमुळे जिल्ह्यातल्या सुमारे ३२ हजारापेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या
पंपाला दिवसा वीज मिळणार असून, हे सर्व शेतकरी भारनियमनातून मुक्त होणार असल्यानं कृषि
उत्पादनात वाढ होईल, असा विश्र्वास पालकमंत्री निलंगेकर यांनी व्यक्त केला.
****
नांदेड
इथं पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. मराठवाड्याची दुष्काळाची
समस्या सोडवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याचं आवाहन कदम यांनी यावेळी
केलं.
****
बीड
इथं पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. जिल्ह्याच्या विकासासाठी
दळवळणाची चांगली सुविधा निर्माण होणं गरजेचं असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं. अपुऱ्या
पावसामुळे निर्माण होणाऱ्या दुष्काळसदृष्य परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्ह्यात जलसंधारणाची
कामे मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहेत. ही कामं पूर्ण झाल्यास येणाऱ्या काळात बीड
जिल्हा दुष्काळमुक्त होईल, असा विश्वास मुंडे यांनी व्यक्त केला.
****
अहमदनगर
इथं पालकमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. दुष्काळी परिस्थितीत
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करण्यात येत असल्याचं ते यावेळी
म्हणाले.
****
ज्येष्ठ
समाजसेवक अण्णा हजारे यांना सरकारनं येत्या २९ जानेवारीला लोकायुक्त कायद्याबाबत समिती
तयार करण्याचं आश्वासन दिलं आहे, मात्र या संदर्भातील मागणीबाबत उपोषणावर ठाम असल्याचं
अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे. ते आज राळेगणसिद्धी इथं वार्ताहरांशी बोलत होते. राज्यामध्ये
मुख्यमंत्र्यांनी लोकायुक्त कायदा करण्याबाबत कोणतीही हालचाल न केल्यानं सरकारवर विश्वास
राहिलेला नाही. त्यामुळे जोपर्यंत प्रत्यक्षात लोकायुक्त कायदा अस्तित्वात येण्याची
खात्री होत नाही, तोपर्यंत आपण उपोषणावर ठाम राहू असा इशारा अण्णा हजारे यांनी दिला
आहे.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या `मन की बात` या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद
साधणार आहेत. या मालिकेचा हा ५२वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन
सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
भारत
आणि न्यूझीलंडदरम्यान माऊंट मौंगानुई इथं झालेला दुसरा एकदिवसीय सामना भारतानं ९० धावांनी
सहज जिंकला. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघानं ५० षटकांत चार बाद ३२४ धावा केल्या. रोहित
शर्मानं ८७, शिखर धवननं ६६, महेंद्रसिंह धोनीनं नाबाद ४८ धावा केल्या. न्यूझीलंडचा
संघ ४१व्या षटकात २३४ धावांवर गारद झाला. कुलदीप यादवनं चार, यजुवेंद्र चहल आणि भुवनेश्वर
कुमारनं प्रत्येकी दोन गडी बाद केले. रोहीत शर्मा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
या विजयाबरोबरच भारतानं पाच सामन्यांच्या मालिकेत दोन - शून्यनं आघाडी मिळवली आहे.
मालिकेतला तिसरा सामना माऊंट मौंगानुई याच मैदानावर येत्या सोमवारी होणार आहे.
****
जकार्ता
इथं सुरू असलेल्या इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सायना नेहवालनं
अंतिम फेरीत धडक मारली आहे. महिला एकेरीच्या आज झालेल्या उपान्त्य फेरीच्या सामन्यात
सायनानं चीनच्या बिंग जियाओ हिचा १८-२१, २१-१२, २१-१८ असा पराभव केला.
****
राज्यात
आज सर्वात कमी आठ पूर्णांक तीन अंश सेल्सिअस तापमान नाशिक आणि पुणे इथं नोंदवलं गेलं.
औरंगाबाद इथं १३, तर परभणी आणि बीड इथं १५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढच्या
दोन दिवसांत विदर्भात काही ठिकाणी, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता
पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे.
****
No comments:
Post a Comment