Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 30 january 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
३०
जानेवारी २०१९ दुपारी १.०० वा.
****
अनुसूचित जाति-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यात नुकत्याच केलेल्या बदलांना
स्थगिती देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयानं आज पुन्हा एकदा फेटाळून लावली. या कायद्याशी
संबंधित प्रकरणांमधल्या आरोपींना अटकपूर्व जामीन मिळू नये, ही तरतूद या निर्णयामुळे
कायम राहिली आहे. केंद्रसरकारच्या या संदर्भातल्या, पुनर्विचार याचिकेसह इतर याचिकांची
एकत्रित सुनावणी येत्या एकोणीस फेब्रुवारीला घेणार असल्याचंही न्यायालयानं सांगितलं.
****
कायद्यातल्या पळवाटा
काढत तपास यंत्रणांच्या कामात अडथळे आणण्याऐवजी, कार्ती चिदंबरम यांनी येत्या ५,६,७
आणि १२ मार्चला सक्त वसुली संचालनालया समोर हजर व्हावं, अशी तंबी सर्वोच्च न्यायालयानं
दिली आहे. एअरसेल मॅक्सिस आर्थिक घोटाळा प्रकरणात सक्त वसुली संचालनालयाला कार्ती यांची
चौकशी करायची आहे, त्या संदर्भात न्यायालयानं आज हा आदेश दिला आहे. फेब्रुवारी आणि
मार्च महिन्यात आंतरराष्ट्रीय टेनिस सामन्यांसाठी आपल्याला परदेशी जाण्याची परवानगी
द्यावी, अशी विनंती कार्ती यांनी आज न्यायालयात केली. त्यावर, सर्वोच्च न्यायालयाच्या
महासचिवांकडे दहा कोटी रुपयांची अनामत रक्कम जमा करून, परदेशातून परत येण्याबाबतचं
आणि तपासात सहकार्य करण्याबाबतचं प्रतिज्ञापत्र देण्यास सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं
आहे.
****
अर्थव्यवस्थेतली
तरलता वाढवण्याच्या उद्दिष्टानं भारतीय रिजर्व्ह बँक पुढच्या महिन्यात सदोतीस हजार
पाचशे कोटी रुपये आर्थिक प्रणालीमध्ये टाकणार आहे. सरकारी प्रतिभूतींच्या खरेदीद्वारे
ही रोख अर्थव्यवस्थेत आणली जाईल. अर्थव्यवस्थेतल्या तरलतेबाबतच्या स्थितीवर सातत्यानं
देखरेख ठेवली असून, आवश्यकतेनुसार हा निर्णय घेतला असल्याचं बँकेनं जारी केलेल्या याबाबतच्या
पत्रकात म्हटलं आहे.
****
ज्येष्ठ सामाजिक
कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी आज राळेगण सिद्धी इथे उपोषणाला सुरुवात केली. केंद्र
सरकारनं दिलेल्या आश्वासनांची पूर्ती केली नाही, तसंच राज्य सरकारनं लोकायुक्त कायदा
मंजूर केला नाही आणि लोकपाल नियुक्ती केली नाही, या कारणांसाठी आपण हे उपोषण करत असल्याचं
त्यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्र्यांना लोकायुक्तांच्या कक्षेत आणण्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या
निर्णयाचं आपण स्वागत करतो, तरीही, निवडणुकीपूर्वी दिलेल्या लोकपाल आणि लोकायुक्त कायद्याबाबतची
आश्वासनं पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरू ठेवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आज सकाळी राळेगण
सिद्धी येथे यादवबाबा मंदिरात दाखल होत, अण्णांनी उपोषण सुरू केलं आहे.
****
देशाचं सुवर्ण धोरण
लवकरच जारी करण्यात येणार असून त्या दृष्टीनं नीती आयोग आणि संबंधितांशी चर्चा सुरू
असल्याची माहिती वाणिज्य आणि उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली आहे. ते काल मुंबईत
दागिने आणि रत्न राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. ही परिषद देशाच्या
आर्थिक उन्नतीला सहाय्य करून रोजगार निर्मिती करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
****
२०१८ या वर्षाच्या
भ्रष्टाचाराबाबतच्या जागतिक क्रमवारीत भारतानं आपल्या स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणल्याचं,
जागतिक भ्रष्टाचारावर देखरेख ठेवणाऱ्या, ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय
संस्थेनं जारी केलेल्या अहवालात स्पष्ट झालं आहे. जागतिक भ्रष्टाचार निर्देशांकात तीन
गुणांची सुधारणा करत भारत आता, एकशे ऐंशी देशांच्या यादीत अट्ठ्याहत्तराव्या क्रमांकावर
आला आहे. या क्रमवारीत चीन सत्त्याऐंशीव्या आणि पाकिस्तान एकशे सतराव्या स्थानावर असल्यानं
भारताच्या तुलनेत खूपच पिछाडीवर आहेत. या यादीत डेन्मार्क हा देश सर्वात कमी भ्रष्टाचारासह
पहिल्या स्थानी आणि न्यूझीलंड दुसऱ्या स्थानी आहेत. तर,सोमालिया, सीरिया आणि दक्षिण
सुदान हे देश सर्वात खालच्या स्थानी आहेत.
****
राज्याच्या एकात्मिक
जल आराखड्यामध्ये मराठवाड्याला पाणी वाटपाचा योग्य हिस्सा मिळावा, यासह मराठवाड्यातल्या
विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड
यांनी औरंगाबाद इथं लोकप्रतिनीधींची बैठक बोलावली आहे. उद्या दुपारी १२ वाजता औरंगाबाद
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात ही बैठक होणार आहे.
*****
***
No comments:
Post a Comment