Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 28 January 2018
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ जानेवारी २०१८ सकाळी ७.१० मि.
****
Ø पात्र तरुणांनी मतदार यादीत नाव नोंदवून
मतदान करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन
Ø राज्यातल्या पर्यटन वृध्दीसाठी उडान उपक्रमाच्या तिसऱ्या
टप्प्यात पाचशे कोटी रुपयांची तरतूद
Ø मराठवाडा जनता विकास परिषदेच्या अध्यक्षपदी डॉ. व्यंकटेश
काब्दे यांची बहुमतानं निवड
आणि
Ø
सायना नेहवाल इंडोनेशिया
मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेची विजेती घोषीत
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पात्र तरूणांना मतदार
म्हणून मतदार यादीत नाव नोंदवण्याचं आवाहन केलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाच्या
माध्यमातून काल देशवासियांशी संवाद साधतांना त्यांनी मताधिकार प्राप्त करणं, हा नागरिकाच्या
आयुष्यातला महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचं सांगितलं. २१व्या शतकात जन्मलेल्या युवकांसाठी मतदानाची ही
पहिलीच संधी असून, त्यांनी देशाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेण्याची वेळ आली असल्याचं सांगून पंतप्रधानांनी, युवकांना येत्या निवडणुकीत मतदानाचं आवाहन केलं.
विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘कलामसॅट’ या उपग्रहाचं भारतीय अंतराळ
संशोधन संस्था - इस्रोनं यशस्वी प्रक्षेपण केल्याचा पंतप्रधानांनी उल्लेख केला.
पुण्यात नुकत्याच झालेल्या ‘खेलो इंडिया’ स्पर्धेतल्या विजेत्यांचं त्यांनी अभिनंदन केलं.
देशात सर्वत्र ‘स्वच्छ शौचालय’ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं ते म्हणाले. सर्व सरपंच आणि गाव प्रमुखांनी आपल्या पंचायतीत या मोहिमेचं नेतृत्व करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं.
आगामी परीक्षांसाठी पंतप्रधानांनी विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. नेताजी सुभाषचंद्र बोस, संत रविदास यांचं पंतप्रधानांनी स्मरण केलं. कर्नाटकातल्या तुमकुर जिल्ह्यातले श्री सिद्धगंगा मठाचे श्री श्री
शिवकुमार स्वामीजी यांच्या आठवणींना
उजाळा देत पंतप्रधानांनी, त्यांना श्रद्धांजली
अर्पण केली. येत्या ३० जानेवारीला
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी. यानिमित्त नागरिकांनी दोन मिनिटं मौन
पाळून हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्याचं आवाहन त्यांनी केलं.
****
उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी शिक्षण व्यवस्थेची
पुनर्रचना करण्याचं आवाहन केलं आहे. ते काल नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते.
स्वातंत्र्य सैनिक तसंच इतर नेत्यांचा त्याग, शौर्य आणि योगदान यांचा शिक्षणात महत्त्वाचा
घटक म्हणून समावेश करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. शिक्षणबाह्य कार्यक्रम घेऊन
विद्यापीठ परिसरातलं वातावरण विकृत करु नये यावर जोर देत चारित्र्यसंपन्न माणूस घडवणं
हा शिक्षणाचा धर्म असल्याचं उपराष्ट्रपती यावेळी म्हणाले.
****
अयोध्येतल्या राम जन्मभूमी- बाबरी मस्जिद मालकी वादाच्या
प्रकरणावर उद्या २९ जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली
आहे. सुनावणीची नवीन तारीख अद्याप निश्चित झालेली नाही.
****
केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल यांनी आज सरकारी
बँकांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. केंद्रीय मंत्री अरुण जेटली
सध्या उपचारांसाठी अमेरिकेला गेले असल्यानं अर्थसंकल्प सादर करण्याची जबाबदारी गोयल
यांच्यावर सोपवण्यात आली आहे. बँकांची बुडीत कर्जं आणि लघु तसंच मध्यम उद्योगांना वित्तपुरवठा
या विषयांवर आजच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
****
संपूर्ण भारतीय तंत्रज्ञानाच्या मदतीनं तयार करण्यात
येणाऱ्या आणि सर्वाधिक वेगानं धावणाऱ्या दिल्ली
वाराणसी रेल्वे गाडीला ‘वंदे -भारत’ अस नांव दिलं जाणार आहे. रेल्वे मंत्री
पियुष गोयल यांनी काल नवी दिल्लीत ही माहिती दिली. १६ यान असलेली ही रेल्वे गाडी चेन्नईच्या
इंटीग्रल कोच फॅक्टरीत तयार करण्यात आली असून, भारतीय अभियंत्यांनी दीड वर्षांत या
रेल्वेची निर्मिती केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच या नव्या रेल्वे गाडीचा
शुभारंभ करणार आहेत.
****
भारतीय रेल्वेतर्फे येत्या चौदा एप्रिलपासून ‘समानता
एक्सप्रेस’ ही विशेष रेल्वेगाडी नागपूर इथून सुरु केली जाणार आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह तथागत
गौतम बुद्धांशी संबंधित स्थळांना भेटी देणारी ही विशेष पर्यटन रेल्वे असणार आहे. दहा
रात्री- अकरा दिवसांचा हा प्रवास असेल.
****
राज्यातल्या पर्यटन वृध्दीसाठी उडान उपक्रमाच्या
तिसऱ्या टप्प्यात पाचशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती नागरी विमान
वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली आहे. कोकणातल्या सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर
आयोजित विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी काल ते बोलत होते. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी
इथल्या विमानतळांचा या योजनेत समावेश केल्याचं त्यांनी जाहीर केलं. कोकणात किनाऱ्यांवर
लवकरच समुद्रावर विमान उड्डाण आणि उतरवण्याची सुविधा सुरु होणार असल्याचं प्रभू यांनी
सांगितलं. रेल्वे आणि विमान सेवेद्वारे कोकणात पर्यटनाला चालना मिळेल, आणि तरुणांना
मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल असं ते म्हणाले.
****
केंद्र आणि
राज्य शासनाच्या आरोग्यविषयक योजनांच्या माध्यमातून प्रत्येक गरीब आणि मध्यमवर्गीय
रुग्णांच्या पाठीशी शासन भक्कमपणे उभं आहे, त्यामुळे प्रत्येक नागरिकाला सुरक्षा कवच
मिळाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नागपूर इथं काल अटल आरोग्य
शिबिराचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. राज्य शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य
योजनेतूनही गरीब आणि मध्यमवर्गीय रुग्णांवर सुमारे तेवीसशे आजारांवर उपचार होत असल्याचं
त्यांनी सांगितलं.
****
भारतीय जनता पक्षाच्या राज्य
कार्यकारिणीची आज जालना इथं बैठक
होणार आहे. या बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य मंत्रिमंडळातले भाजपचे मंत्री, पक्षाचे पदाधिकारी, प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित
राहणार आहेत. या बैठकीत कृषी आणि राज्यकीय ठरावांसह बारा विषयांवर चर्चा होणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची
जाहीर सभा होणार आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
इसीस या दहशतवादी संघटनेशी संबंधीत आणखी एका आरोपीला
दहशतवाद विरोधी पथक एटीएसनं काल औरंगाबाद इथं न्यायालयासमोर हजर केलं, न्यायालयानं
त्याला पाच फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. या आरोपीला एटीएसनं परवा शनिवारी
मुंब्रा इथून ताब्यात घेतलं होतं. त्याच्याकडून संगणकीय साहित्य जप्त करण्यात आलं आहे.
गेल्या आठवड्यातच एटीएसनं, राज्यात एका अल्पवयीन आरोपीसह दहा जणांना अटक केली होती.
****
मराठवाडा जनता विकास परिषदेच्या अध्यक्षपदी नांदेड
इथले सामाजिक कार्यकर्ते, माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे यांची बहुमतानं निवड झाली.
काल झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत परिषदेचे मावळते अध्यक्ष विधीज्ञ प्रदीप देशमुख
यांनी अध्यक्षपदासाठीची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी प्रयत्न केले. त्यानुसार शरद
अदवंत यांच्यासह अनेक उमेदवारांनी माघार घेतली, मात्र, औरंगाबाद जिल्हा कार्यकारिणीचे
अध्यक्ष गोपीनाथ वाघ यांनी उमेदवारी कायम ठेवल्यामुळे दुपारनंतर मतदान घेण्यात आले.
मराठवाडाभरातून आलेल्या ८७ सदस्यांनी अध्यक्षपदासाठी मतदान केलं. त्यात डॉ. काब्दे
यांना ६० मतं मिळाल्यानं, ते विजयी झाले. डॉ.
काब्दे यांनी यापूर्वीही परिषदेचं अध्यक्षपद सांभाळलं आहे.
****
लातूर
महानगरपालिकेनं अतिक्रमणात हटवलेल्या फेरीवाल्यांना जागा देण्याबाबतचं धोरण तत्काळ
जाहीर करावं, असं पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी म्हटलं आहे. लातूर शहरातल्या
१२ शौचालयांचं लोकार्पण, रस्ते कामाचं
भूमिपूजन, सामाजिक सभागृह
उद्घाटन तसंच गंजगोलाई सुशोभीकरण
आदी कामांच्या शुभारंभ प्रसंगी ते काल बोलत होते. महानगरपालिकेनं त्वरित सर्वसाधारण
सभा घेऊन, वर्षानुवर्षे लातूर शहरात
राहणाऱ्या, मात्र आजपर्यंत जागा
नावावर न झालेल्या सुमारे तीन हजार कुटुंबांना पुढच्या दहा दिवसांत कबाले वाटप करावेत, असं निलंगेकर
म्हणाले.
****
प्राचार्य ना.य.डोळे स्मृती पुरस्कार
अभिनेते-सामाजिक कार्यकर्ते अतुल कुलकर्णी यांना काल प्रदान करण्यात आला. लातूर जिल्ह्याच्या
उदगीर इथं आयोजित कार्यक्रमात शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य अनिरुध्द जाधव यांच्या
हस्ते कुलकर्णी यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.
****
भारतीय
बॅडमिंटनपटू सायना नेहवालला इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेची विजेती म्हणून
घोषित करण्यात आलं. काल झालेल्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत सायनाची प्रतिस्पर्धी
स्पेनच्या कॅरोलिना मरिनला सामन्यादरम्यान दुखापत झाल्यामुळे तिनं स्पर्धेतून माघार
घेतली. मरिन ही उत्तम प्रतिस्पर्धी असून, दुखापतीमुळे तिनं माघार घेणं दुर्देवी असल्याचं
सायनानं म्हटलं आहे.
****
भारत आणि न्यूझीलंडदरम्यान तिसरा एकदिवसीय क्रिकेट
सामना आज माऊंट मौंगानुई इथं थोड्याच वेळात सुरू होणार आहे. न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत भारत दोन - शून्यनं आघाडीवर
आहे.
****
नाटकाच्या माध्यमातून
बदलणारा काळ आणि या बदलत्या काळात मुलांच्या मनात सुरु असलेली घुसमट, तसंच त्यांचा
ताण रंगमंचावर व्यक्त व्हायला हवा, असं मत ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. गिरीश सहदेव यांनी
व्यक्त केलं. लातूर इथं काल सोळाव्या राज्य बाल नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचं
उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. लहान मुलांच्या विषयांकडे दिग्दर्शक, नाट्य लेखकांनी
गांभीर्यानं पहायला हवं, असं सांगतानाच त्यांनी मुलांना आनंदासाठी नाटकांकडे वळा, असा
सल्लाही दिला.
****
औरंगाबाद इथं एक ते
चार फेब्रुवारी दरम्यान पाचवं राज्यस्तरीय महा अॅग्रो कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात
आलं आहे. या प्रदर्शनाचे समन्वयक वसंत देशमुख यांनी काल औरंगाबाद इथं वार्ताहर परिषदेत
ही माहीती दिली. पैठण रसत्यावर हे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.
*****
***
No comments:
Post a Comment