Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 31 January 2018
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३१
जानेवारी २०१८ सकाळी ७.१० मि.
****
Ø संसदेचं
आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन; उद्या
अंतरिम अर्थसंकल्प सादर होणार
Ø व्हिडिओकॉन कर्ज प्रकरणी आयसीआयसीआय बँकेच्या मुख्य कार्यकारी
अधिकारी तथा व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर दोषी
Ø ज्येष्ठ
सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचं
राळेगणसिद्धी इथं उपोषण सुरू
आणि
Ø
भारत आणि न्यूझीलंडदरम्यान आज चौथा एकदिवसीय क्रिकेट सामना; नाणेफेक जिंकून न्यूझीलंडचा गोलंदाजीचा निर्णय
****
संसदेचं
आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. राष्ट्रपती
रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानं या अधिवेशनाला प्रारंभ होईल. सकाळी अकरा वाजता
संसदेच्या केंद्रीय सभागृहात दोन्ही सदनाच्या सदस्यांना ते संबोधित करतील.
१३ फेब्रुवारीपर्यंत हे अधिवेशन चालेल. दरम्यान, या अधिवेशनात उद्या
संसदेत सादर होणारा अर्थसंकल्प हा अंतरिम अर्थसंकल्पच असेल, असं सरकारनं स्पष्ट केलं
आहे. देशात, लोकसभा निवडणुकीच्या आधी अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्याची परंपरा आहे,
मात्र, यावेळी पूर्ण अर्थसंकल्प सादर होण्याची वृत्तं माध्यमांमध्ये आल्यानंतर सरकारनं
काल हा खुलासा केला.
अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर
लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी काल नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावली
होती. लोकसभेचं कामकाज सुरळीत चालवण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य
करण्याचं आवाहन महाजन यांनी या बैठकीत केलं. या बैठकीला कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे, के. एस. वेणुगोपाल, रामविलास पासवान,
सुदीप बंडोपाध्याय, भर्तृहरी
मेहताब, नरेंद्र सिंग तोमर, विजय गोयल आणि प्रेमसिंह चंदुमाजरा यांच्यासह अनेक नेते
उपस्थित होते.
****
येत्या पाच वर्षात रेल्वे मार्गाचं १०० टक्के विद्युतीकरणाला सरकारनं
प्रारंभ केला असल्याची माहिती, रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दिली. ते काल नवी दिल्ली
इथं एका पुरस्कार प्रदान कार्यक्रमात बोलत होते. यामुळे कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण
कमी होऊन वातावरण बदलाचा सामना करण्याला सहाय्य मिळेल असंही गोयल म्हणाले. आपलं मंत्रालय
रेल्वेच्या जमिनीवर कमी खर्चात सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याच्या संकल्पनेवर भर देत असून
यामुळे रेल्वेच्या महसुलात वाढ होईल असंही त्यांनी नमूद केलं. वातावरण बदलाच्या लढ्यात जगाचं नेतृत्व करण्याचं
भारताचं उद्दीष्ट असल्याचं रेल्वेमंत्री गोयल म्हणाले.
****
अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यात
नुकत्याच केलेल्या बदलांना स्थगिती देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयानं काल पुन्हा
एकदा फेटाळून लावली. या कायद्याशी संबंधित प्रकरणांमधल्या आरोपींना अटकपूर्व जामीन
मिळू नये, ही तरतूद या निर्णयामुळे कायम राहिली आहे. केंद्र सरकारच्या या संदर्भातल्या,
पुनर्विचार याचिकेसह इतर याचिकांची एकत्रित सुनावणी येत्या एकोणीस फेब्रुवारीला घेणार
असल्याचंही न्यायालयानं सांगितलं.
****
व्हिडिओकॉन कर्ज प्रकरणात आयसीआयसीआय बँकेच्या तत्कालीन
मुख्य कार्यकारी अधिकारी तथा व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर दोषी ठरल्या आहेत. पदावर
असताना चंदा कोचर यांनी बँकेच्या अंतर्गत धोरणांचे उल्लंघन करून, वेणूगोपाल धूत यांच्या
व्हिडिओकॉन समूहाला तीन हजार २५० कोटी रुपये कर्ज दिलं. त्याबदल्यात धूत यांनी चंदा
कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या कंपनीत ६४ कोटी रुपये गुंतवल्याचा आरोप होता. या
प्रकरणी, बँकेच्या अंतर्गत चौकशी समिती मार्फत चौकशी करण्यात आली, ही चौकशी सुरू झाल्यावर
कोचर यांनी बँकेतल्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता. राजीनाम्यापूर्वी कोचर यांचे
रोखलेले बोनससह इतर भत्ते आता दिले जाणार नाहीत, असं बँकेनं स्पष्ट केलं आहे.
****
शेतकऱ्यांचं
कर्ज फक्त एकदा पूर्ण माफ केलं आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी सुरू
केली, की पुन्हा सरकारकडे काही मागण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार नाही, यासाठी सरकारनं
सकारात्मक निर्णय घेऊन तो अंमलात आणावा, असं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे
यांनी म्हटलं आहे. काल राळेगणसिद्धी इथं उपोषण सुरू केल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते.
लोकपाल कायद्याच्या अंमलबजावणीचं
आश्वासन सरकारनं पाच वर्षांत पूर्ण केलं नाही, असं सांगत, राज्य विधानसभेत लोकायुक्त
कायदा मंजूर करून लोकायुक्तांची नियुक्ती करावी, अशी मागणी हजारे यांनी केली. जनतेला
आपल्या मागण्यांसाठी उपोषण करण्याची वेळ येणं हे दुर्दैवी असल्याचं नमूद करत, मागण्या
मान्य झाल्या नाहीत तर आमरण उपोषण
सुरू ठेवण्याचा निर्धार अण्णा हजारे यांनी यावेळी व्यक्त केला.
****
जागतिक कुष्ठरोग दिनानिमित्त जनजागृती पंधरवड्याला
राज्यभरात सुरुवात झाली असल्याचं आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी
काल सांगितलं.
त्यानिमित्त जिल्हास्तरावर
प्रभात फेरी, प्रश्नमंजुषा, पथनाट्य अशा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून कुष्ठरोगाविषयी
जागृती केली जाणार आहे. केंद्र शासनानं कुष्ठरोग्यांचं प्रमाण दर दहा हजार व्यक्तींमागे
एकपेक्षा कमी करण्याचं उद्दिष्ट दिल्याचं ते म्हणाले.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं
जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
सद्य:स्थितीत जातीअंताच्या नावाखाली नवा जातीवाद
उभा राहत असल्याची चिंता ज्येष्ठ पत्रकार लेखक संजय आवटे यांनी व्यक्त केली आहे. औरंगाबाद
इथल्या देवगिरी महाविद्यालयाच्या शाहू, फुले, आंबेडकर व्याख्यानमालेत काल तिसरं आणि
शेवटचं पुष्प ‘आम्ही भारतीय लोक’ या विषयावर त्यांनी गुफलं. त्यावेळी ते बोलत होते.
शाहू, फुले, आंबेडकरी चळवळीत महिलांचा सहभाग कमी झाला असून ही चळवळ पुरुषी चळवळ होत
चालली असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. देशाची ख्याती जगवण्यासाठी सर्वांनी सक्रीय
होऊन आपली भूमिका चोख बजावणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले.
****
राष्ट्रपिता
महात्मा गांधी यांच्या एकाहत्तराव्या पुण्यतिथीनिमित्त काल विधानभवनात त्यांना अभिवादन
करण्यात आलं. महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पं अर्पण करून मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ
बागडे यांनी आदरांजली वाहिली. १९५६च्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात बलिदान दिलेल्या
हुताम्यांचं स्मरण करुन आणि दोन मिनिटं मौन पाळून त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात
आली.
****
भारत आणि न्यूझीलंडदरम्यानचा
चौथा एकदिवसीय क्रिकेट सामना थोड्याच
वेळात हॅमिल्टन इथं सुरू होत आहे. न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला
आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होईल.
या आधीचे तीनही सामने जिंकून भारतानं मालिकेत तीन -शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे.
उर्वरीत दोन एकदिवसीय सामने आणि तीन टी-ट्वेंटी सामन्यांच्या मालिकेसाठी रोहित शर्मा
भारतीय संघाचं नेतृत्व करेल. तर आज होणाऱ्या सामन्यासाठी दुखापतग्रस्त महेंद्रसिंह
धोनीच्या समावेशाबाबत निर्णय होणार आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातले गोरेवाडीचे सेंद्रीय शेतीचे
पुरस्कर्ते कृषी तज्ज्ञ शहाजी गोरे यांचं मंगळवारी मुंबईत अल्पशा आजारानं निधन झालं,
ते ७० वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर काल अंत्यसंस्कार करण्यात आले. परभणी
कृषी विद्यापीठाचे कार्यकारणी सदस्य तसंच राज्य सरकारच्या शेतीविषयक समित्यांचे सदस्य
म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं. देशभरातल्या शंभर सर्वोत्कृष्ट शेतकऱ्यांमध्ये नाव
समाविष्ट असलेले शहाजी गोरे यांना शेती क्षेत्राशी निगडित विविध पुरस्कारांनी गौरवण्यात
आलं होतं.
****
शल्यक्रिया तज्ज्ञांच्या मॅसिकॉन परिषदेला आजपासून
औरंगाबाद इथं प्रारंभ होत आहे. महात्मा गांधी मिशनच्या वैद्यकीय महाविद्यालयात ही परिषद
आयोजित करण्यात आली आहे. तीन फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या परिषदेत देशातले १७०० तज्ज्ञ
सहभागी होत असून, ३५ ते ४० शल्यक्रिया मोफत केल्या जाणार असल्याचं, आयोजकांकडून सांगण्यात
आलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या लोहा नगर परिषदेच्या उपाध्यक्षपदी
भारतीय जनता पक्षाचे केशवराव चव्हाण विजयी झाले, त्यांनी काँग्रेसच्या शारदाबाई निर्मले
यांचा नऊ मतांनी पराभव केला. चव्हाण यांना तेरा तर निर्मले यांना चार मतं मिळाली.
****
राज्याच्या एकात्मिक जल आराखड्यामध्ये मराठवाड्याला
पाणी वाटपाचा योग्य हिस्सा मिळावा, यासह मराठवाड्यातल्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी
मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी औरंगाबाद इथं लोकप्रतिनीधींची
बैठक बोलावली आहे. आज दुपारी १२ वाजता औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात
ही बैठक होणार आहे.
****
राज्यात
राबण्यात येत असलेल्या ‘मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजने’चा नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी
जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन, नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केलं
आहे. शाश्वत जलस्रोत उपलब्ध असलेल्या मात्र वीजपुरवठा मिळण्यास अडचणी असणाऱ्या भागांना
सौर कृषी पंप देण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. महावितरणच्या संकेतस्थळावर यासाठी
अर्ज करता येणार आहे.
****
केंद्र सरकाराच्या केंद्रीय विद्युत संशोधन संस्थेच्या
वतीनं नाशिक तालुक्यात शिलापूर इथं नियोजित विभागीय परीक्षण प्रयोगशाळा प्रकल्पाचे
भूमिपूजन केंद्रीय ऊर्जा राज्य मंत्री आर के सिंह यांच्या हस्ते काल करण्यात आलं. सध्या
गरजेपेक्षा जास्त विद्युत निर्मिती होत असल्याने, शेजारच्या देशांना वीज निर्यात करण्यात
येत आहे, येत्या ३१ मार्च पर्यंत देश भारनियमन मुक्त होईल अशी घोषणा त्यांनी यावेळी
केली.
****
भारतीय सेनाध्यक्षांकडून
देण्यात येणाऱ्या मानाच्या ‘सेनाध्यक्ष प्रशंसा पदका’ साठी कोल्हापुरातल्या १०९ इन्फंट्री
टी. ए. बटालियनच्या पाच जवानांची निवड झाली आहे. भारताचे लष्कर प्रमुख बिपिन रावत यांच्यावतीनं
हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
*****
***
No comments:
Post a Comment