Tuesday, 22 January 2019

Text- AIR NEWS BULLETIN AURANGABAD 22.01.2019 18.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 22 January 2019

Time 18.00 to 18.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२ जानेवारी २०१९ सायंकाळी ६.००

****

दिव्यांग व्यक्तींसाठी हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनांवरील दुकानं मोफत देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. दिव्यांग व्यक्तींना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या आणि त्यांच्या सामाजिक - आर्थिक संरक्षणासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, यासाठी २५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

मुंबईत दादर इथल्या महापौर निवासस्थानाच्या जागेवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं राष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी १०० कोटी रुपयांच्या निधीला आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. हा निधी महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

पुण्यातल्या फर्ग्युसन महाविद्यालय या स्वायत्त शिक्षण संस्थेचं रुपांतर फर्ग्युसन विद्यापीठामध्ये करण्यास, तसंच मुंबई शहरातल्या सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी केंद्र शासन पुरस्कृत महिला सुरक्षितता हा २५२ कोटी रूपयांचा प्रकल्प राबवण्यासही राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली.

****

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार २०१९ प्रदान केले. महाराष्ट्राच्या तृप्तराज अतुल पंड्या, एंजल देवकुळे यांच्यासह २६ बालकांना विविध क्षेत्रातल्या योगदानाबद्दल बाल शक्ती पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. तर दोन व्यक्ती, तसंच तीन संस्थांना बाल कल्याण पुरस्कार प्रदान करण्यात आले.

****

लोकसभेच्या आगामी निवडणुकीतल्या पराभवाची संभाव्य कारणं काँग्रेस पक्ष आतापासूनच शोधत असल्याचं, केंद्रीय न्याय आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे. लंडनमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र हॅक करण्यासंदर्भात काल झालेल्या एका पत्रकार परिषदेच्या पार्श्वभूमीवर, ते आज दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. काँग्रेस पक्ष सुनियोजित पद्धतीनं भारतीय लोकशाही, आणि निवडणूक आयोगाबाबत गैरसमज पसरवत असल्याचं, ते म्हणाले. निवडणुकीत काँग्रेसचा विजय होतो, त्यावेळी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात काहीही गडबड नसते, मात्र भाजपचा विजय झाल्यास, ईव्हीएमच्या पारदर्शकतेवर शंका घेतली जाते, याकडेही प्रसाद यांनी लक्ष वेधलं.

****

जम्मू काश्मीरमधल्या शोपिया जिल्ह्यात सुरक्षा बलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले, तर एक जवान जखमी झाला. हेफ शिरमल परिसरात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर आज पहाटे जवानांनी शोधमोहीम सुरु केली, त्यावेळी ही चकमक उडाली.

****

राज्य शासकीय, निम शासकीय लिपीकसंवर्गीय हक्क परिषदेनं विविध मागण्यांसदर्भात आज औरंगाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालयावर इशारा मोर्चा काढला. लिपीक संवर्गीय कर्मचाऱ्यांच्या ग्रेड वेतनात सुधारणा करून समान कामास समान वेतन आणि समान पदोन्नतीचे टप्पे करणं, आणि मंत्रालय ते ग्रामपंचायत लिपीकांचं एकसारखं पदनाम करणं, लिपीक संवर्गाची पदे बाह्य यंत्रणेमार्फत कंत्राटी निर्माण न करता ती स्थायी स्वरूपाची निर्माण करण्यात यावी यासह अन्य मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकार्यांना देण्यात आलं. या मागण्यासंदर्भात शासनानं सकारात्मक निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. परभणी, वाशिम इथंही या परिषदेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

****

औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीनं उद्या पासून स्मार्ट सिटी अंतर्गत शहर बससेवा सुरू करण्यात येत आहे. ही बससेवा एसटी महामंडळाच्या माध्यमातून चालवण्यात येणार आहे. यांसदर्भात एसटी महामंडळ आणि महापालिकेत अंतिम करार झाला आहे. पहिल्या टप्प्यात १४ मार्गांवर २४ बसेस सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महानगरपालिकेनं प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

****

औरंगाबादमधल्या विविध बँकांमध्ये आज शिवसेनेच्या वतीनं शेतकऱ्यांच्या कर्जमाफी विषयी चौकशी करण्यात आली. खासदार चंद्रकांत खैरे यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळानं सर्वप्रथम बँक ऑफ महाराष्ट्र अग्रणी बॅंकेचे उप-महाप्रबंधक संजय हिरमिठे यांना शेतकरी कर्ज माफी संदर्भात विविध प्रश्न विचारले. या संदर्भातील माहिती लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याची मागणीही यावेळी शिष्टमंडळाच्या वतीनं करण्यात आली.

****

राज्यातल्या पूर्व भागातलं हवामान अस्थिर होणार असल्यामुळे २४ ते २६ जानेवारी दरम्यान विदर्भात वादळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यांतल्या बऱ्याच भागात या दरम्यान मेघ-गर्जनेसह पावसाची शक्यता असल्यानं, शेतकऱ्यांनी हवामानाच्या स्थितीनुसार नियोजन करावं आणि शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा, असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे.

//***********//

No comments: