Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 29 January 2018
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २९ जानेवारी २०१८ सकाळी ७.१० मि.
****
Ø पीकविमा रक्कम आणि दुष्काळी मदत फेब्रुवारी
महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल -मुख्यमंत्र्यांची ग्वाही
Ø रास्त आणि किफायतशीर दर न देणाऱ्या साखर कारखान्यांवर
कारवाईच्या आश्वासनानंतर ऊस उत्पादकांचं आंदोलन मागे
Ø मराठा आरक्षणासंदर्भात मागासवर्ग आयोगाच्या अहवालाची प्रत
याचिकाकर्ते आणि विरोधकांना देण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
Ø मराठवाड्यातल्या विविध सामाजिक समस्यांचा अभ्यास करण्यासाठी
तज्ज्ञांच्या समित्या नियुक्त
Ø
औरंगाबाद इथं फुले शाहू आंबेडकर व्याख्यानमालेला प्रारंभ
आणि
Ø
न्यूझीलंड विरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत भारताची तीन शून्य अशी विजयी आघाडी
****
दुष्काळी परिस्थितीमध्ये
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, पीकविमा रक्कम आणि दुष्काळी मदत फेब्रुवारी
महिन्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी दिली आहे. जालना इथं काल भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्य समितीच्या बैठकीनंतर
आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या
महाआघाडीच्या भूमिकेवर मुख्यमंत्र्यांनी टीका केली.
या सभेपूर्वी भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना
मुख्यमंत्र्यांनी, निवडणुकीत जे येतील, त्यांना सोबत घेऊ आणि जे येणार नाहीत त्यांच्याशिवाय
लढू, असं नमूद केलं. विरोधकांनी महाआघाडी केली तरी परिवर्तन होणार नसल्याचं ते म्हणाले.
पीक विमा योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा विरोधकांचा आरोप चुकीचा असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांनी,
विरोधकांना चर्चेसाठी खुलं आव्हान दिलं. भाजप सरकारच्या तीन वर्षांच्या काळात शेतकऱ्यांना
१२ हजार कोटी रुपये मिळाले असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. भाजपनं दलालांचं राज्य संपुष्टात आणलं असून, जोपर्यंत शेवटच्या
शेतकऱ्याला कर्जमाफी मिळत नाही, तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना
बंद होणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.
****
दरम्यान, भाजपकडून युतीसंदर्भात कोणताही प्रस्ताव
अद्याप आला नसल्याचं, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. काल मुंबईत
शिवसेना खासदारांच्या बैठकीनंतर ते बोलत होते. शिवसेना राज्यात आपल्या अटी आणि शर्तींवरच
राजकारण करत असल्याचं, ठाकरे म्हणाले.
****
ऊस उत्पादक शेतकऱ्यांना रास्त आणि किफायतशीर दर न
देणाऱ्या तसंच थकबाकी टाळणाऱ्या साखर कारखान्यांवर कारवाई करण्यात येईल, असं आश्वासन
साखर आयुक्तांनी दिलं आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्या
नेतृत्वाखाली पुण्यात काल ऊस उत्पादकांचा मोर्चा काढण्यात आला होता. साखर आयुक्तांच्या
आश्वासनानंतर रात्री उशीरा हा मोर्चा मागे घेण्यात आला. मात्र, शेतकऱ्यांची थकबाकी
न मिळाल्यास पुन्हा आंदोलन करण्यात येर्ईल, असा इशारा शेट्टी यांनी दिला आहे. राज्यातल्या
१७४ साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांची तब्बल पाच हजार तीनशे एकोणिस कोटी रुपये थकबाकी
आहे.
****
दहावी - बारावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र
मोदी आज ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमात
दोन हजार विद्यार्थी, त्यांचे
पालक आणि शिक्षक यांच्यासह
बाहेरील देशातले अनेक विद्यार्थीही सहभागी होणार आहेत. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या
राष्ट्रीय वाहिन्यांवरुन सकाळी दहा वाजून पंचावन्न मिनिटांपासून या कार्यक्रमाचं
थेट प्रसारण होईल, विविध संकेतस्थळांवरही तो उपलब्ध असेल. राज्यात सर्व शाळांनी हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना दाखवावा असं राज्य शासनानं
सांगितलं आहे.
****
मराठा आरक्षणासंदर्भात मागासवर्ग आयोगाच्या अहवालाची
प्रत याचिकाकर्ते आणि विरोधकांना देण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला
दिले आहेत. काल झालेल्या सुनावणीदरम्यान, न्यायालयानं याचिकाकर्त्यांना अहवालाची प्रत
देताना, तो आहे तसा देण्याची सूचना केली. हा अहवाल सीडी स्वरूपात देण्यात येईल, असं
यावेळी सांगण्यात आलं. याचिकाकर्त्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी या निर्णयाचे
स्वागत केलं आहे.
****
मराठवाड्यातल्या विविध सामाजिक समस्यांचा अभ्यास
करण्यासाठी तज्ज्ञांच्या विविध समित्या नियुक्त करण्यात येत असल्याचं, मराठवाडा विकास
मंडळाचे सदस्य डॉ. अशोक बेलखोडे यांनी सांगितलं. मंडळाच्या समाजकल्याण, महिला बालकल्याण,
आदिवासी विकास तसंच आरोग्य समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते. आदिवासींच्या मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण वाढविण्यासाठी सामाजिक
कार्यकर्त्या मंगल खिंवसरा, अरुंधती पाटील, सविता शेट्ये यांच्या सहभागातून तर भटक्या
विमुक्तांच्या पुनर्वसनासाठी राम राठोड यांच्या पुढाकारातून अभ्यास समिती नेमण्यात
येणार आहे. परिचर्या प्रशिक्षण केंद्राबाबतचा अभ्यास अंबाजोगाईच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे
डॉ. अंकुशे तर महिलांच्या आरोग्यावरील अभ्यास औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर आणि डॉ. क्रांती रायमाने यांच्या पुढाकारातून
करण्यात येणार आहे. ग्रामीण भागात वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ता वाढावी यासाठी डॉ. मोगरेकर
काम करणार असल्याचं, डॉक्टर बेलखोडे यांनी सांगितलं.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या आखाडा बाळापूर कृषी उत्पन्न
बाजार समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे दत्ता बोंढारे तर उपसभापतीपदी धुरपत पाईकराव
विजयी झाले. बोंढारे यांना नऊ मतं, तर त्यांचे प्रतिस्पर्धी दत्ता माने यांना आठ मतं
पडली. उपसभापतीपदाच्या निवडणुकीत भरत देशमुख यांचा पराभव झाला.
****
सातारा जिल्ह्यातल्या मलकापूर नगर पंचायतीच्या निवडणुकीत
कांग्रेसनं तर रायगड जिल्ह्यातल्या कर्जत नगरपालिकेच्या
निवडणुकीत भाजप शिवसेना युतीनं विजय मिळवला. नागपूर जिल्ह्यातल्या महादुला नगरपरिषद
निवडणुकीत भारतीय जनता पक्ष विजयी झाला आहे.
****
फुले, शाहू, आंबेडकर यांची अनुयायांनी वाटणी केली
असून बहुजनांचा जातीयवाद कोण जोपासत आहे, असा सवाल अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे
माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केला आहे. औरंगाबाद इथं देवगिरी महाविद्यालयाच्या
वतीनं आयोजित 'फुले-शाहू-आंबेडकर व्याख्यानमालेचं' पहिलं पुष्प गुंफतांना काल ते बोलत
होते. 'सामाजिक प्रबोधन आणि परिवर्तनाची नवी दिशा' या विषयावर बोलतांना ते म्हणाले
……
फुले, शाहू, आंबेडकर यांची
सर्व डावी चळवळ प्रामाणिक राहिलेयं का..? जर असेल तर, मग जातीयवाद कसा..? बहूजनाचा
जातीयवाद कोणी जोपासला..? या प्रश्नाची उत्तर आपल्याला शोधावी लागतील..! जातीच्या भिंती
जर राष्ट्रत्वाला अडळळा करत असतील, मानवतेला अडथळा करत असतील, स्त्री – पूरूष्याच्या
असलं प्रेमाला अडथळा करत असतील, संसाराला अडथळा करत असतील, जगण्याला अडथळा करत असतील तर या भिंती का
टिकवायच्या आणि टिकवणारे कोण..?
या व्याख्यानमालेत ‘प्रशासन : सामाजिक उत्थानाचे
प्रभावी माध्यम’ या विषयावर विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर हे आज दुसरं पुष्प गुंफणार आहेत.
****
न्यूझीलंडविरूद्ध सुरू असलेल्या एकदिवसीय क्रिकेट
मालिकेत भारतानं कालचा सामना जिंकून मालिकेत तीन शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे.
माऊंट मौंगानुई इथं झालेला कालचा तिसरा सामना भारतानं सात गडी राखून जिंकला. प्रथम
फलंदाजी करत न्यूझीलंडच्या संघानं भारतासमोर २४४ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. भारतीय
संघानं हे लक्ष्य ४३ षटकात तीन गडी गमावत पूर्ण केलं. रोहीत शर्मानं ६२, विराट कोहलीनं
६०, अंबाती रायडूनं नाबाद ४३ धावा केल्या. मालिकेत पुढचा सामना गुरुवारी होणार आहे,
दरम्यान भारत न्यूझीलंड महिला संघाच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा
सामना आज माऊंट मौंगानुई इथं होत आहे, या मालिकेत भारतीय महिला संघ एक शून्यनं आघाडीवर
आहे.
****
टाटा आणि कोयना जलविद्युत प्रकल्पास दिलं जाणारं
११८ दशलक्ष घनफूट पाणी मराठवाड्यात वळवून उस्मानाबाद जिल्ह्याच्या हक्काचं पाणी मिळावं
या मागणीसाठी पाणी संघर्ष समितीने काल उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं.
नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आलं.
****
ज्येष्ठ विधीज्ञ हरिश्चंद्र पाटील यांचं काल पहाटे
लातूर इथं निधन झालं, ते ९६ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर काल सायंकाळी
लातूर इथं, मारवाडी स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयाचे
मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील यांचे ते वडील होत.
*****
***
No comments:
Post a Comment