Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 30 January 2018
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३०
जानेवारी २०१८ सकाळी ७.१० मि.
****
Ø दुष्काळी उपाययोजनांसाठी राज्याला केंद्राकडून चार हजार
७१४ कोटी रुपये निधी मंजूर
Ø लोकायुक्तांच्या चौकशीच्या कार्यकक्षेत मुख्यमंत्री पदाचा
समावेश
Ø झुंजार कामगार नेते माजी सरंक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस
यांचं निधन; आज दिल्लीत अंत्यसंस्कार
Ø कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी ही देशसेवाच
- विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर
आणि
Ø
भारत आणि न्यूझीलंड महिला एकदिवसीय क्रिकेट मालिकेत भारताची दोन शून्यनं विजयी आघाडी
****
दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी राज्याला
केंद्र सरकारकडून चार हजार ७१४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. गृहमंत्री
राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालच्या एका उच्चस्तरीय समितीनं हा निधी देण्यास मंजुरी
दिली. महाराष्ट्रासह हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि
पुदुच्चेरीसाठीही मदत निधीची घोषणा काल करण्यात आली.
दरम्यान, राज्य शासनानं मागितलेल्या मदतीचा हा पहिला
टप्पा असून ऊर्वरित निधी मिळण्यासाठी राज्य शासन पाठपुरावा करणार असल्याचं मदत आणि
पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. दुष्काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य
शासन खंबीरपणे उभं असून प्रसंगी राज्याच्या निधीतून मदत केली जाईल, अशी ग्वाहीही पाटील
यांनी दिली.
केंद्राच्या निकषात न बसणाऱ्या दुष्काळग्रस्त मंडळं
आणि गावांना, शासनाच्या निधीतून मदत केली जाणार असून त्याचा प्रस्ताव तयार करण्याचं
काम सुरू असल्याचंही पाटील यांनी सांगितलं.
****
विद्यार्थ्यांनी आपल्या उद्दीष्टांवर लक्ष केंद्रीत
करावं, वेळेचं उत्तम व्यवस्थापन करावं आणि तणावाला बळी पडू नये असे आवाहन पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल नवी दिल्लीत ‘परीक्षा पे’ चर्चा' या कार्यक्रमाच्या
दुसऱ्या पर्वात देशातल्या दोन हजार विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधत होते.
परीक्षेच्या निकालाबाबत काळजी न करता आपलं आयुष्य समृद्ध करण्यासाठी, ज्ञान मिळवण्यावर
विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रीत करावं, असा सल्ला त्यांनी दिला.
****
अयोध्येत रामजन्मभूमी- बाबरी मशीद प्रकरणी वादग्रस्त
२ पूर्णांक ७७ शतांश एकरची जागा वगळून उर्वरित ६७ एकर जागा रामजन्मभूमी न्यासला द्यावी,
अशी मागणी केंद्र सरकारनं केली आहे. या बाबत केंद्र सरकारनं काल सर्वोच्च न्यायालयात
अर्ज सादर केला. ही जागा केंद्र सरकारनं अधिग्रहीत केली होती, मात्र सर्वोच्च न्यायालयानं
या निर्णयाला स्थगिती दिली होती.
****
लोकायुक्तांच्या चौकशीच्या कार्यकक्षेत मुख्यमंत्री
पदाचा समावेश करण्यास राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली. या निर्णयामुळे लोकायुक्त
मुख्यमंत्र्यांची चौकशी करु शकतील.
गावातल्या मालमत्तांच्या कर आकारणी पद्धतीत सुधारणा
करण्यासाठी मालमत्ता पत्रक तयार करण्यास, उच्चदाब उपसा जलसिंचन योजनांना वीज दरात सवलत
देण्यास, अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांतल्या नव उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी
त्यांना प्रकल्पाच्या कमाल १५ टक्के फरकाची रक्कम देण्यासही काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या
बैठकीत मान्यता देण्यात आली.
एकात्मिक नगर वसाहत प्रकल्पांसाठी शेतजमीन खरेदी
करताना शेतजमीन धारणेच्या कमाल मर्यादेतून सूट देण्यासाठी महाराष्ट्र शेतजमीन अधिनियमात
सुधारणेलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली.
औद्योगिक वापरासाठी मंजूर केलेल्या शासकीय जमिनीचा
वापर अधिमूल्य आकारून इतर प्रयोजनासाठी करण्यास परवानगी देण्यात आली.
२०१५ मध्ये पार पडलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी
जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी २०१८ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ६६ मध्ये
सुधारणा करण्यासही मंत्रिमंडळानं मान्यता दिली.
****
झुंजार कामगार नेते माजी सरंक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस
यांच्या पार्थिव देहावर आज दिल्लीत अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांचं काल नवी दिल्ली
इथं उपचारादरम्यान निधन झालं. ते ८८ वर्षांचे होते. आणिबाणी विरोधात लढा पुकारणारे
फर्नांडीस यांनी कामगारांच्या अनेक चळवळींचं नेतृत्व केलं. रेल्वे कामगारांसाठी त्यांनी
उभारलेला ऐतिहासिक लढा आजही अनेकांच्या स्मरणात आहे. आणिबाणी नंतर सत्तेवर आलेल्या मोरारजी देसाई सरकारमध्ये
फर्नांडीस यांनी उद्योगमंत्री म्हणून, व्ही पी सिंग सरकारमध्ये रेल्वेमंत्री म्हणून
तर अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये संरक्षणमंत्री म्हणून समर्थपणे जबाबदारी
सांभाळली. त्यांनी स्थापन केलेला समता पक्ष, आणि रामकृष्ण हेगडे यांच्या लोकशक्ती पक्षाचं
विलीनीकरण होऊन, संयुक्त जनता दलाची निर्मिती झाली आहे.
फर्नांडीस यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती
एम.व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राज्यपाल
सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष
शरद पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी श्रध्दांजली वाहिली.
****
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७१ व्या पुण्यतिथी
निमित्त आज देशभरातून त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. यानिमित्तानं ठिकठिकाणी प्रार्थना
सभा तसंच गांधी विचारांच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. आज सकाळी ११ वाजता
देशभरात मौन पाळून गांधीजींना आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं
जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
बालमृत्यू
तसंच कुपोषणाचं प्रमाण कमी करण्यासाठी राज्यातल्या नवजात बालकांना देण्यात येणाऱ्या
‘मुख्यमंत्री शिशू स्वागत पेटी’ या
योजनेचा शुभारंभ महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते काल झाला. शासकीय
रुग्णालयात होणाऱ्या पहिल्या प्रसूतिनंतर अर्भकाच्या
संगोपनासाठी राज्य शासनामार्फत ही
पेटी मोफत देण्यात येणार आहे. या पेटीत झोपण्याची लहान गादी, ब्लँकेट, मच्छरदाणी, छोटं नेलकटर,
इलेक्ट्रॉनिक थर्मामीटर, लंगोट, हातमोजे, पायमोजे आदी साहित्याचा समावेश आहे. बालमृत्यू,
कुपोषण रोखण्याबरोबरच बालसंगोपनाच्या दृष्टीनं ही योजना महत्त्वपूर्ण ठरेल, असं मुंडे यावेळी
म्हणाल्या.
****
सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांची प्रशासकीय अधिकाऱ्यांनी
प्रभावीपणे अंमलबजावणी करून सामाजिक उत्थानाचं कार्य करणे ही मोठी देशसेवा असल्याचं
मत विभागीय आयुक्त डॉ. पुरूषोत्तम भापकर यांनी व्यक्त केलं आहे. त्यांनी काल औरंगाबाद
इथं देवगिरी महाविद्यालयाच्या फुले, शाहू आंबेडकर व्याख्यानमालेचं दुसरं पुष्प ‘प्रशासन
: सामाजिक उत्थानाचे प्रभावी साधन’ या विषयावर गुंफलं. त्यावेळी ते बोलत होते.
या व्याख्यानमालेत आज ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे
हे ‘आम्ही भारतीय लोक’ या विषयावर तिसरं आणि शेवटचं पुष्प गुंफणार आहेत.
****
भारत
आणि न्यूझीलंड महिला क्रिकेट संघादरम्यान माऊंट मौंगानुई इथं झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय
सामन्यात काल भारतानं न्यूझीलंडवर आठ गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंड
संघानं भारतीय संघाला १६२ धावांचं लक्ष्य दिलं, हे लक्ष्य भारतीय महिला संघानी
३६व्या षटकातच पूर्ण केलं. स्मृती मंधानानं
९०, तर मिताली राजनं ६३ धावा केल्या. तीन सामन्याच्या या मालिकेत भारतानं दोन - शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या नेवासे तालुक्यात
जायकवाडी पाणलोट क्षेत्राचा वीजपुरवठा आठ तास करण्यात यावा, या मागणीसाठी काल सकाळी
अहमदनगर- औरंगाबाद महामार्गावर प्रवरासंगम इथं सर्व पक्षीयांच्या वतीनं रस्ता रोको
आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामुळे या महामार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली
होती.
****
वीज महानिर्मिती कंपनीमधल्या प्रकल्पग्रस्त प्रगत
कुशल प्रशिक्षणार्थींच्या मानधनात प्रती महिना ६ हजार रूपये वाढ करण्यात आली आहे. ऊर्जामंत्री
चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला आहे.
१५०० पेक्षा जास्त प्रशिक्षणार्थींना या निर्णयाचा लाभहोणार आहे.
****
राज्य शासनाच्यावतीनं होणाऱ्या ७२ हजार पदांच्या
मेगाभरतीमध्ये लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या भूकंपग्रस्तांच्या दोन टक्के आरक्षणाची
काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी असे निर्देश राज्याचे भूकंप पुनर्वसन मंत्री संभाजी पाटील
निलंगेकर यांनी दिले आहेत. काल यासंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
****
ज्येष्ठ लेखक, कवी वसंत आबाजी डहाके यांना नाशिकच्या
'कुसुमाग्रज प्रतिष्ठान'चा जनस्थान पुरस्कार जाहीर झाला आहे. एक लाख रुपये आणि सन्मान
पत्र असं पुरस्काराचं स्वरूप असून, येत्या २७ फेब्रुवारीला नाशिक इथं हा पुरस्कार प्रदान
केला जाईल.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात भारत संचार निगम - बीएसएनलच्या
फोर जी सेवेचा शुभारंभ काल खासदार रवींद्र गायकवाड यांच्या हस्ते झाला. जिल्ह्यात बीएसएनलच्या
१३२ टॉवरद्वारे फोर जी ची जलद गती मोबाईल सेवा
दिली जाणार आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या मानवत पंचायत समितीचा वरिष्ठ
सहाय्यक लेखाधिकारी शेख हमीद यास चार हजार रुपयांची लाच घेतांना काल रंगेहाथ पकडलं.
आरोग्य सेविकेच्या वेतनातून नियमानुसार कपात न करण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.
****
महिला सक्षमीकरण
ही काळाची गरज असल्याचं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी म्हटलं
आहे. महिलांविषयक कायदे आणि आरोग्य या विषयावर काल जालना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या
सभागृहात आयोजित कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.
****
प्लास्टीक आणि त्यापासून
होणाऱ्या वस्तुंचं उत्पादन, वापर, साठवणूक, वितरण, आयात तसंच वाहतूक करणांऱ्या विरुध्द दंडात्मक कारवाईचे निर्देश
नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले आहेत. काल जिल्हाधिकारी यांच्या कक्षात आयोजित बैठकीत
ते बोलत होते.
****
शेतकरी कामगार पक्ष
शेकापतर्फे उद्या बीड इथं मराठवाडा दुष्काळ परिषद होणार आहे. शेकापचे विभागीय चिटणीस
काका शिंदे यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या परिषदेत ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख पक्षाची मतं आणि धोरणं जाहीर
करणार आहेत.
*****
***
No comments:
Post a Comment