Saturday, 26 January 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 26.01.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 26 January 2018

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २६ जानेवारी २०१ सकाळी ७.१० मि.

****   



आमच्या सर्व श्रोत्यांना सत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा



Ø विकासापासून वंचित बांधवांना पुढे घेऊन जाणं हे आपलं लक्ष्य - सत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचं प्रतिपादन

Ø  माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, दिवंगत गायक भुपेन हजारिका आणि दिवंगत सामाजिक कार्यकर्ते नानाजी देशमुख यांना भारत रत्न सन्मान जाहीर

Ø  बाबासाहेब पुरंदरे पद्मविभूषण, डॉ अशोक कुकडे पद्मभूषण, रंगकर्मी वामन केंद्रे यांना पद्मश्री सन्मान

आणि

Ø  आर्थिक दुर्बल घटकांसाठीच्या दहा टक्के आरक्षणाला तत्काळ स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

****



 सत्तरावा प्रजासत्ताक दिन आज देशभरात हर्षोल्लासात साजरा होत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिल्ली इथं होणाऱ्या मुख्य समारंभाला दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. राजपथावर भारताची शक्ती, कला, संस्कृती आणि विविधतेचं दर्शन घडवणारं पथसंचलन होणार आहे. देशभरात सर्वत्र प्रजासत्ताकाचा सोहळा साजरा केला जात असून शासकीय- निमशासकीय कार्यालयं, खाजगी संस्था आणि अन्य ठिकाणीही ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. 

****



 विकासापासून वंचित असलेल्या आपल्या बांधवांना पुढे घेऊन जाणं हे आपलं लक्ष्य असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला काल त्यांनी राष्ट्राला संबोधित केलं. देशातल्या सर्व समुदायांचा विकास झाला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करत राष्ट्रपतींनी देशाच्या साधनसंपत्तीवर प्रत्येकाचा हक्क असल्याचं नमूद केलं. देशानं प्रगतीच्या दृष्टीनं एक मोठा प्रवास केला असून भविष्यातही हा प्रवास असाच चालू राहील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.



 यावर्षी महात्मा गांधी यांची शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती साजरी होत आहे. गांधी विचारांचं आजही अनन्य साधारण महत्त्व असून, त्यांचा आदर्श विचार सखोलपणे जाणून घेणं, ही काळाची गरज असल्याचं राष्ट्रपती म्हणाले.

****



 माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, सामाजिक कार्यकर्ते नानाजी देशमुख आणि गायक डॉ. भुपेन हजारिका यांना भारत रत्न हा सर्वोच्च सन्मान जाहीर झाला आहे. नानाजी देशमुख आणि भुपेन हजारिका यांना मरणोत्तर हा सन्मान दिला जाणार आहे.



 देशाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासात योगदानाबद्दल माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना तर आसाममधले ज्येष्ठ गायक भुपेन हजारिका यांना कलाक्षेत्रातल्या सर्वोच्च योगदानाबद्दल हा सन्मान जाहीर झाला आहे.



 हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यात कडोळी गावात जन्मलेले चंडिकादास अमृतराव उर्फ नानाजी देशमुख यांनी ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कार्याबद्दल त्यांना हा सन्मान मरणोत्तर जाहीर झाला आहे. नानाजी यांनी आपलं संपूर्ण जीवन दीनदयाल शोध संस्थेच्या माध्यमातून सामाजिक आणि रचनात्मक कार्यासाठी वाहिलं. विनोबा भावे यांची भूदान चळवळ तसच जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. उत्तर प्रदेश सरकारमध्ये ते काही काळ मंत्री होते, राज्यसभेचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केलं. चित्रकूट इथं ग्रामोद्योग विश्वविद्यालय स्थापन करून त्यांनी ग्रामविकासाला एक नवी दिशा दिली. त्यांच्या या कार्याबद्दल भारत सरकारनं त्यांना पद्मविभुषण या पुरस्कारानं गौरवलं होतं. कर्मभूमी असलेल्या चित्रकूट इथंच सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार दहा रोजी त्यांनी शेवटचा श्वास घेतला.

****



 राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पद्म पुरस्कार काल जाहीर केले. पंडवानी गायिका तीजनबाई, जिबुतीचे राष्‍ट्रपती इस्‍माइल उमर गुयेलेह, एल ॲण्ड टी उद्योग समूहाचे अध्यक्ष अनिलकुमार नाईक, आणि बळवंत मोरेश्वर उर्फ शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे या चार मान्यवरांना पद्मविभूषण सन्मान जाहीर झाला आहे.

 पद्मभूषण सन्मान जाहीर झालेल्या चौदा मान्यवरांमध्ये गिर्यारोहक बचेंद्री पाल, लोकसभेचे माजी उपाध्यक्ष करिया मुंडा, हुकुमदेव नारायण यादव, दिवंगत पत्रकार कुलदीप नायर, आणि लातूरच्या विवेकानंद रुग्णालयाचे डॉ अशोक कुकडे यांचा समावेश आहे.

 पद्मश्री सन्मान जाहीर झालेल्या चौऱ्याण्णव मान्यवरांमध्ये अभिनेता मनोज वाजपेयी, प्रभुदेवा, गायक संगीतकार शंकर महादेवन, तालवादक शिवमणी, क्रिकेटपटू गौतम गंभीर, कुस्तीपटू बजरंग पुनिया, फुटबॉलपटू सुनील छेत्री, तीरंदाज बोंबायला देवी, सिकल सेल या रक्तविकारावर संशोधन करणारे डॉ सुदाम काटे, मेळघाटात आदिवासी समाजासाठी कार्यरत डॉ रवींद्र आणि डॉ स्मिता कोल्हे, आणि राष्ट्रीय नाट्य विद्यालय - एनएसडीचे संचालक रंगकर्मी वामन केंद्रे यांचा समावेश आहे. यंदाच्या या पद्म पुरस्कार जाहीर झालेल्या मान्यवरांमध्ये अकरा परदेशी व्यक्तींचाही समावेश आहे.

****



 प्रजासत्ताक दिनानिमित्त काल शौर्य पुरस्कारांची घोषणा झाली. लान्स नायक नजीर अहमद वाणी यांना मरणोत्तर अशोक चक्र जाहीर झालं आहे. मेजर तुषार गौबा आणि विजय कुमार यांना कीर्ती चक्र, तर नऊ जवानांना शौर्य चक्र पुरस्कार जाहीर झाले. एकोणीस परम विशिष्ट सेवा पदकं, तीन उत्तम युद्ध सेवा पदकं, बत्तीस अति विशिष्ट सेवा पदकं, दहा युद्ध सेवा पदकं, एकशे नऊ शौर्य सेवा पदकं, चाळीस वैशिष्ट्यपूर्ण सेवा पदकं, तर शहात्तर जवानांना विशिष्ट सेवा पदक जाहीर झाले. 



 राष्ट्रपती पोलिस वीरता पदक तीन जणांना, तर पोलिस वीरता पदक एकशे शेहेचाळीस पोलिसांना जाहीर झाले. राज्यातल्या चव्वेचाळीस पोलिसांना पुरस्कार जाहीर झाले असून, त्यापैकी बिपिन कुमार सिंग, भास्कर महाडिक, दिनेश जोशी आणि विष्णु नागले या चौघांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झालं आहे.



 जीवन रक्षा पदक पुरस्कारही काल जाहीर झाले. दैनंदिन जीवनात मानवाच्या संरक्षणासाठी उत्तम कामगिरी बजावणाऱ्या देशातल्या अट्ठेचाळीस व्यक्तींना हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. यात राज्यातल्या पाच जणांचा समावेश आहे. कौस्तुभ तारमाळे आणि प्रथमेश वाडकर यांना मरणोत्तर 'सर्वोत्तम जीवन रक्षा पदक', डॉ. चरणजित सिंह सलुजा आणि अमोल लोहार यांना ‘उत्तम जीवन रक्षा पदक’, तर धैर्यशील आडके यांना ‘जीवन रक्षा पदक’ जाहीर झालं आहे.

****



 ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ साहित्यिक कृष्णा सोबती यांचं काल वृद्धापकाळानं नवी दिल्लीत निधन झालं. त्या त्र्याण्णव वर्षांच्या होत्या. मिंत्रो मारजानी, जिंदगीनामा ही त्यांची पुस्तकं लोकप्रिय आहेत. त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार तसंच पद्मभूषण सन्मानानं गौरवण्यात आलं होतं.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 आर्थिक दुर्बल घटकांसाठीच्या दहा टक्के आरक्षणाला तत्काळ स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. न्यायालयानं या प्रकरणी केंद्र सरकारला नोटीस बजावली असून पुढील सुनावणी एक महिन्यानंतर होणार आहे. या आरक्षणाविरोधात एका बिगर सरकारी संस्थेनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

****



 सामाजिक न्याय विभागांतर्गत अनुसूचित जाती आणि नवबौद्ध मुला-मुलींसाठी नवीन ५० शासकीय निवासी शाळांना मंजुरी देण्यात आली असून यासाठी २६२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी ही माहिती दिली.

****



 वातावरण बदलाचं आव्हान स्वीकारण्यासाठी बदलत्या जीवनशैलीवर गांभीर्यानं चर्चा व्हावी, अशी अपेक्षा केंद्रीय कृषी आणि ग्रामीण विकास राज्यमंत्री पुरषोत्तम रुपाला यांनी व्यक्त केली आहे. लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातल्या लोदगा इथं ‘हवामान बदल आणि नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन'  या विषयावर आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते काल बोलत होते. राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी, मानव जातीच्या कल्याणासाठी विकासाच्या दिशा बदलण्याची गरज यावेळी व्यक्त केली.

****



 येत्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची राज्यात ४८ जागा लढण्याची तयारी असल्याची माहिती, प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी दिली. जालना इथं  काल ते वार्ताहरांशी बोलत होते. आतापार्यंत राज्यातल्या ४६ मतदार संघांचा आढावा घेतला असून येत्या ३० तारखेला  रायगड आणि रत्नागिरी या दोन मतदारसंघांचा आढावा घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं.



 दरम्यान, परवा सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक जालना इथं होणार आहे. या बैठकीत कृषी आणि राजकीय ठराव घेण्यात येतील, त्यानंतर मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होईल असं दानवे यांनी सांगितलं.

****





 जकार्ता इथं सुरु असलेल्या मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या सायना नेहवालनं उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे. काल झालेल्या उपान्त्यपूर्व फेरीच्या सामन्यात सायनानं थायलंडच्या खेळाडूवर मात करत, उपान्त्य फेरी गाठली.

****



 भारत आणि न्युझीलंड यांच्या दरम्यानच्या पाच एकदिवसीय क्रिकेट मालिकेतील दुसरा सामना आज माऊंट मौंगानुई इथं खेळला जाणार आहे. मालिकेतला नपिअर इथं झालेल पहिला सामना जिंकून भारत एक-शन्यनं आघाडीवर आहे.

*****

***

No comments: