Tuesday, 29 January 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 29.01.2019 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29  january 2019

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २   जानेवारी २०१९  दुपारी १.०० वा.

****



 परीक्षा महत्त्वाच्या आहेतच, पण परीक्षेपलिकडेही मोठं आयुष्य असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात ते विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी बोलत होते. पालक तसंच विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांच्या उत्तरात पंतप्रधानांनी, पालकांनी पाल्यांना सातत्यानं प्रोत्साहन द्यावं, आपल्या अपेक्षांचं ओझं पाल्यांवर लादू नये, पाल्याचा कल ओळखून त्याच्या कौशल्याचा विकास करावा, विद्यार्थी आणि पालकांमध्ये परीक्षेबाबत सुसंवाद निर्माण व्हावा, अशी मतं मांडली. पालकांनी पाल्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणू नये, एखाद्या परीक्षेत अपयश आल्यास, आयुष्य ठप्प होत नाही, असंही त्यांनी नमूद केलं. विद्यार्थ्यांनी स्वत:शीच स्पर्धा करून, स्वत:चेच विक्रम मोडावेत, असं आवाहन त्यांनी केलं.

 विचारांना संकुचित करणारं तंत्रज्ञान विकासासाठी धोकादायक असून, तंत्रज्ञानाचा योग्य वापर करावा, आपल्या क्षमतांचा विचार करून योग्य लक्ष्य निर्धारित करावं आणि ते प्राप्त करण्यासाठी नियोजनबद्ध वाटचाल करावी, असं पंतप्रधानांनी सांगितलं. विज्ञान शाखेइतक्याच इतरही शाखा महत्त्वाच्या असून, आपल्या संकल्पना सुस्पष्ट असाव्यात, असंही ते म्हणाले. वेळेचं नियोजन, यावर पंतप्रधानांनी भर दिला.

 या कार्यक्रमात देशभरातल्या विविध शाळांमधल्या विद्यार्थ्यांसह त्यांचे पालक आणि शिक्षक तसंच बाहेरच्या अनेक देशातले विद्यार्थी सहभागी झाले होते.

****



 माजी संरक्षणमंत्री जॉर्ज मॅथ्यू फर्नांडीस यांचं आज पहाटे दिल्ली इथं प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते ८८ वर्षांचे होते. आणिबाणीविरोधात लढा पुकारणारे फर्नांडीस यांनी कामगारांच्या अनेक चळवळींचं नेतृत्व केलं. रेल्वे कामगारांसाठी त्यांनी उभारलेला ऐतिहासिक लढा आजही अनेकांच्या स्मरणात आहे. समाजवादी चळवळीत त्यांचं मोलाचं योगदान आहे. आणिबाणीनंतर सत्तेवर आलेल्या मोरारजी देसाई सरकारमध्ये फर्नांडीस यांनी उद्योगमंत्री म्हणून, व्ही पी सिंग सरकारमध्ये रेल्वेमंत्री म्हणून तर अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये संरक्षणमंत्री म्हणून समर्थपणे जबाबदारी सांभाळली. त्यांनी स्थापन केलेल्या समता पक्षाचं, रामकृष्ण हेगडे यांच्या लोकशक्ती पक्षात विलीनीकरण होऊन, संयुक्त जनता दलाची निर्मिती झाली आहे.



 नऊ वेळा लोकसभा आणि एकदा राज्यसभेचे सदस्य असलेले फर्नांडीस, गेल्या सुमारे आठ वर्षांपासून स्मृतिभ्रंश आणि कंपवातानं आजारी होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर दिल्लीतल्या एका रुग्णालयात उपचार सुरू होते, उपचारादरम्यान आज सकाळी त्यांचं निधन झालं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष खासदार राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह अनेकांनी फर्नांडीस यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.

****



 अयोध्येत रामजन्मभूमी- बाबरी मशीद प्रकरणी वादग्रस्त २ पूर्णांक ७७ शतांश एकरची जागा वगळून उर्वरित ६७ एकर जागा रामजन्मभूमी न्यासला द्यावी, अशी मागणी केंद्र सरकारनं केली आहे. या बाबत केंद्र सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयात अर्ज सादर केला. ही जागा केंद्र सरकारनं अधिग्रहीत केली होती, मात्र सर्वोच्च न्यायालयानं या निर्णयाला स्थगिती दिली होती.

 दरम्यान, रामजन्मभूमी- बाबरी मशीद खटल्याची आज होणारी सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं पुढे ढकलली आहे. सुनावणीची पुढची तारीख मात्र अद्याप निश्चित झालेली नाही.

****



 केंद्रीय विद्यापीठ आणि महाविद्यालयामधले शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आणि परीक्षा नियंत्रकाचे भत्ते तसंच विशेष भत्त्यांमधे वाढ करण्याचे आदेश मनुष्यबळ विकास मंत्रालयानं जारी केले आहेत. कुलगुरुंसाठी सुधारित विशेष भत्ता मासिक ११ हजार २५० रुपये, प्रकुलगुरुसाठी मासिक नऊ हजार रुपये, पदव्यूत्तर महाविद्यालयातल्या प्राचार्यासाठी सहा हजार ७५० रुपये आणि पदवी महाविद्यालयातल्या प्राचार्यासाठी मासिक साडे चार हजार रुपये विशेष भत्ता असेल. केंद्रीय विद्यापीठांमधल्या तीस हजार आणि अभिमत विद्यापीठांमधल्या साडे पाच हजार शिक्षक आणि समकक्ष कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळेल, असं मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे. 

****



 औरंगाबाद इथल्या अप्रतिम मीडियाच्या वतीनं देण्यात येणाऱ्या चौथा राज्यस्तरीय स्तंभ पुरस्काराची काल घोषणा करण्यात आली. पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी युवा पत्रकार रमेश भोसले यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

****



 राज्यातल्या शल्यक्रिया तज्ज्ञांची मॅसिकॉन परिषद ३१ जानेवारी ते ३ फेब्रुवारीदरम्यान औरंगाबाद इथं, एमजीएम वैद्यकीय महाविद्यालयात होणार आहे. या परिषदेत देशातले १७०० तज्ज्ञ सहभागी होत असून, ३५ ते ४० शल्यक्रिया मोफत केल्या जाणार असल्याचं, आयोजकांकडून सांगण्यात आलं आहे.

*****

***

No comments: