Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 22 January 2018
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२ जानेवारी २०१८ सकाळी ७.१० मि.
****
§ खुल्या प्रवर्गातल्या आर्थिक दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षणासंदर्भात मद्रास
उच्च न्यायालयाची केंद्र सरकारला नोटीस
§ इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र पूर्णपणे सुरक्षित असल्याचा केंद्रीय निवडणूक आयोगाचा
पुनरुच्चार
§ सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचा भाकप नेत्या वृंदा करात यांचा आरोप
§ कर्नाटकातल्या सिद्धगंगा मठाचे मठाधीश शिवकुमार स्वामी यांचं निधन
आणि
§ ड्रोन तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं पीक पेरा सर्वेक्षणाला सुरुवात
****
सर्वसाधारण वर्गातल्या आर्थिक दुर्बल घटकांना दिलेल्या १० टक्के आरक्षणाच्या
विरोधात मद्रास उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर न्यायालयानं केंद्र सरकारला नोटीस जारी
केली आहे. द्रविद मुनेत्र कळघम - द्रमुकचे सचिव आर. एस. भारती यांनी दाखल केलेल्या
या याचिकेत, आर्थिक दृष्ट्या मागास लोकांची संख्या किती आहे याबाबत कसलंही सर्वेक्षण
न करता, १० टक्के आरक्षणाचं विधेयक संसदेत घाईगडबडीनं मंजूर केलं, असं म्हटलं आहे.
अतिरिक्त महान्यायअभिकर्ता जी. राजगोपालन यांनी न्यायालयात यासंदर्भात युक्तिवाद करताना,
ही याचिका राजकीय हेतूनं दाखल केली असून ती या टप्प्यावरच फेटाळून लावण्याची मागणी
केली. न्यायालयानं मात्र या याचिकेची सुनावणीचा निर्णय घेत, केंद्रीय कायदे मंत्रालय
तसंच सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाला येत्या १८ फेब्रुवारीपर्यंत उत्तर देण्यास
सांगितलं आहे.
****
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र पूर्णपणे सुरक्षित असल्याचं, केंद्रीय निवडणूक आयोगानं
म्हटलं आहे. ईव्हीएम हॅकिंग संदर्भात लंडन इथं झालेल्या पत्रकार परिषदेच्या पार्श्वभूमीवर
आयोगानं ही बाब स्पष्ट केली. या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल
यांच्या सहभागाबद्दल केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी टीका केली आहे. काँग्रेसनं
मात्र या पत्रकार परिषदेत सिब्बल यांच्या सहभागाशी पक्षाचा काहीही संबंध नसल्याचं म्हटलं
आहे.
****
स्रोताच्या ठिकाणी कर कपात - टीडीएसमध्ये चुका आढळल्यामुळे काही छोट्या कंपन्यांवर
खटला चालवण्यासंबंधी नोटीस जारी करण्यात आल्याच्या वृत्ताचं, केंद्रीय प्रत्यक्ष कर
मंडळ - सीबीडीटीनं खंडन केलं आहे. माध्यमांमध्ये यासबंधीच्या आलेल्या बातम्या या अफवा
पसरवणाऱ्या आणि तथ्यहीन असल्याचं, सीबीडीटीनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. .
****
सरकार पायरसी विरोधात लक्ष केंद्रीत करत असून, आतापर्यंत २००हून अधिक संकेतस्थळं
ब्लॉक करण्यात आल्याचं, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे संयुक्त सचिव राजीव अग्रवाल
यांनी सांगितलं. मुंबईत काल डिजिटल युगात डेटा संरक्षण या विषयावरच्या कार्यशाळेत ते
बोलत होते. औद्योगिक धोरण आणि संवर्धन विभागानं डेटा संरक्षणासाठी केलेल्या उपायांचे
चांगले परिणाम दिसत असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
३१ डिसेंबरपर्यंत विक्री झालेल्या कांद्यावर शेतकऱ्यांना अनुदान मिळणार असल्याचं,
सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितलं आहे. ते काल सोलापूर इथं वार्ताहरांशी
बोलत होते. कांद्याचे भाव घसरल्यामुळे, १ ते १५ डिसेंबरपर्यंत जो कांदा बाजार समितीमध्ये
विकला गेला, त्यावर प्रति क्विंटल २०० रुपये या दरानं प्रत्येक शेतकऱ्याला २० क्विंटलपर्यंत
अनुदान राज्य सरकारनं घोषित केलं होतं. ही मुदत वाढवून देण्याची शेतकऱ्यांची मागणी
होती. त्यानुसार ही मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली होती.
****
गेल्या चार वर्षात राज्यातल्या अठरा हजार गावांमधल्या पिण्याच्या पाण्याच्या
योजना पूर्ण झाल्या असून हा आतापर्यंतचा उच्चांक आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी म्हटलं आहे. सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यात चोपन्न पाणीपुरवठा योजनांसह
इतर काही कामांचं भूमीपूजन काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी काल मुंबईत राष्ट्रकुल परिषदेच्या एंटरप्राईज अॅण्ड
इन्व्हेस्टमेंट कौन्सिलचे अध्यक्ष लॉर्ड मरलॅण्ड आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अॅलेन
जेमेल यांची भेट घेतली. महाराष्ट्रात सुट्ट्या भागांची निर्मिती करणारे निर्यातक्षम
असे लघु आणि मध्यम उद्योग मोठ्या संख्येनं असून, त्यांच्यासाठी राष्ट्रकुल परिषदेकडून
मिळणारं प्रोत्साहन महत्त्वपूर्ण ठरू शकेल, असं मुख्यमंत्री म्हणाले.
****
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज यंदाच्या प्रधानमंत्री राष्ट्रीय
बाल पुरस्कारांचं वितरण होणार आहे.नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात होणाऱ्या एका समारंभात
सव्वीस बालकांना बाल शक्ती पुरस्कारानं सन्मानित केलं जाणार आहे, तर बाल कल्याण पुरस्कार
दोन व्यक्ती आणि तीन संस्थांना प्रदान करण्यात येणार आहे.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं
हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
पोलाद मंत्रालयाच्यावतीनं आजपासून मुंबईत भारत पोलाद २०१९ प्रदर्शन आणि परिषद
घेण्यात येणार आहे. पोलाद मंत्री विरेंद्र सिंग चौधरी या परीषदेचं उदघाटन करतील. वाणिज्य
आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यावेळी मार्गदर्शन करतील. २४ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या
या परिषदेत १५ देशांमधल्या अडीचशेहून अधिक कंपन्या सहभागी होत आहेत.
****
भारतीय जनता पक्षाचं सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचा आरोप भारतीय कम्युनिस्ट
पक्षाच्या पॉलिट ब्युरोच्या सदस्य माजी खासदार वृंदा करात यांनी केला आहे. बीड जिल्ह्यातल्या
दुष्काळी परिस्थितीची पाहणी केल्यानंतर त्या काल वार्ताहरांशी बोलत होत्या. राज्यात
दुष्काळ जाहीर केला, मात्र उपाययोजना काहीच दिसत नाही, महिलांना महात्मा गांधी राष्ट्रीय
ग्रामीण रोजगार हमी योजनेत स्थान मिळत नाही, असं सांगून त्यांनी सरकारच्या अनेक योजनांवर
टीका केली.
दरम्यान, बीडचे अतिरिक्त जिल्हाधिकारी बी. एम. कांबळे यांनी काल जिल्ह्यातल्या
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांशी काल संवाद साधून, मागण्या तसचं अडचणी जाणून
घेतल्या. संबंधित कुटुंबांनी मागणी केलेल्या योजनेचा लाभ नियमानुसार आवश्यक ती कार्यवाही
पूर्ण करून देण्याचे निर्देश, कांबळे यांनी यावेळी दिले.
****
कर्नाटकातल्या सिद्धगंगा मठाचे मठाधीश शिवकुमार स्वामी यांचं काल निधन झालं.
ते एकशे अकरा वर्षांचे होते. लिंगायत समाजाच्या या मठाचे प्रमुख असलेले शिवकुमार स्वामी
यांना त्यांचे अनुयायी, बसवेश्वरांचा अवतार मानतात. त्यांच्या निधनामुळे कर्नाटक मध्ये
तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. शिवकुमार स्वामी यांच्या पार्थिव
देहावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.
****
ड्रोनच्या सहाय्यानं पीक पेऱ्याच्या माहितीचं सर्वेक्षण करण्याचं काम सुरु केल्याची
माहिती, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली आहे. यानुसार, लातूर
जिल्ह्यातल्या लातूर तालुक्यातल्या सहा, औसा तालुक्यातल्या अठरा आणि निलंगा तालुक्यातल्या
सहा गावातल्या पीक पेऱ्याची माहिती येत्या २३ जानेवारी ते १९ फेब्रुवारी या काळात संकलित
केली जाणार असल्याचं पटेल यांनी सांगितलं.
****
सरकार कौशल्यपूर्ण रोजगार निर्मितीवर भर देत असल्याचं, यवतमाळचे पालकमंत्री
मदन येरावार यांनी म्हटलं आहे. यवतमाळ इथं काल रोजगार मेळाव्यात ते बोलत होते. नोकरीशिवाय
तरुण-तरुणींना व्यवसायाभिमुख करणं हा मुख्य उद्देश असून, कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न
वाढवण्यासाठी युवकांनी रोजगारक्षम होणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले. वर्धा- यवतमाळ
-नांदेड रेल्वे मार्ग, नागपूर- बोरी -तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग, जिल्ह्यालगतचा समृध्दी
मार्ग आदी दळणवळणाच्या सोयी निर्माण होत असल्यामुळे तिथल्या उद्योगांना चालना मिळेल,
पर्यायानं भविष्यात रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होतील, असं येरावार यांनी सांगितलं.
****
राज्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत यावर्षी चाळीस हजार किलोमीटर लांबीचे
रस्ते मंजूर केले असून त्यापैकी तीस हजार किलोमीटर्सचे रस्ते पूर्ण केले असल्याची माहिती
सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या
गडहिंग्लज तालुक्यात हिरण्यकेशी नदीवर निलजी आणि जरळी इथं उभारण्यात येणाऱ्या मोठ्या
पुलांच्या कामाचा, तसंच अनेक रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते काल करण्यात
आला, त्यावेळी ते बोलत होते.
****
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद-आयसीसीच्या ताज्या कसोटी मानांकन यादीत ११६ गुणांसह
भारत प्रथम स्थानी कायम आहे. कर्णधार विराट
कोहलीनं ९२२ गुणांसह अव्वल स्थान अबाधित राखलं आहे. आय सी सी नं काल ही यादी जाहीर
केली. चेतेश्वर पुजारा तिसऱ्या तर ऋषभ पंत सतराव्या स्थानावर आहे.
//************//
No comments:
Post a Comment