Sunday, 27 January 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 27.01.2019 07.10AM


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 27 January 2018

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २७ जानेवारी २०१ सकाळी ७.१० मि.

****   



Ø सत्तरावा प्रजासत्ताक दिन काल देशभरात हर्षोल्लासात साजरा; राजपथावर देशाचं सामर्थ्य आणि संस्कृतीचं शानदार दर्शन

Ø २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध - राज्यपाल

Ø लोकायुक्त कायद्याबाबत समिती तयार करण्याचं सरकारनं आश्वासन दिल्यानंतरही जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे उपोषणावर ठाम

Ø न्यूझीलंडविरूद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा ९० धावांनी विजय

आणि

Ø इंडोनेशिया बॅडमिंटन स्पर्धेच्या विजेतेपदासाठी भारताच्या सायना नेहवालची आज स्पेनच्या करोलिना मारिन सोबत लढत.

****



 सत्तरावा प्रजासत्ताक दिन काल देशभरात हर्षोल्लासात साजरा करण्यात आला. राजधानी दिल्लीत राजपथावर झालेल्या मुख्य कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी तिरंग्याला २१ तोफांची सलामी देण्यात आली. विशेष पथसंचलनात राष्ट्रपतींनी विविध दलांच्या मानवंदनेचा स्वीकार केला. दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. लान्स नायक नझीर अहमद वानी यांना मरणोत्तर अशोक चक्र प्रदान करण्यात आलं. शस्त्र सज्जता आणि तांत्रिक प्रगतीसह देशाच्या सामर्थ्य आणि संस्कृतीचं प्रदर्शन संचलनातून घडलं.

****



 मुंबईत राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जगन्नाथ, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचं राज्यपाल म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत सुमारे ४१ लाख शेतकऱ्यांना लाभ झाला असल्याचं त्यांनी सांगितलं. भारतीय नौसेना, तटरक्षक दल, राज्य राखीव सुरक्षा दल, मुंबई सशस्त्र पोलिस दल, मुंबई अग्निशमन दल आणि राष्ट्रीय छात्रसेनेच्या दलानं राज्यपालांना मानवंदना दिली.

****



 मराठवाड्यासह संपूर्ण राज्यभरात ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून सत्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा झाला.



 औरंगाबाद इथं पोलिस आयुक्त कार्यालयाच्या देवगिरी मैदानावर परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याहस्ते ध्वजारोहण झालं. विकासाच्या दिशेनं वाटचाल करणारा औरंगाबाद जिल्हा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात चांगली प्रगती करत असल्याचं रावते म्हणाले. औरंगाबाद जिल्ह्यात दुष्काळ निवारणासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत रावते म्हणाले,



दुष्काळात संधी माणून पूर्ण क्षमतेने काम करून आदर्श निर्माण करण्याच्या औरंगाबादच्या शेतकऱ्यांचा हातखंड राहिलेला आहे. तसेच नेत्रदिप कामगिरी यावर्षी देखील आमचे शेतकरी आणि प्रशासन मिळून करून दाखवतील, याची मला खात्री आहे. मराठवाड्याच्या तीव्र दुष्काळ भागाला नजरे समोर ठेऊन जागतिक बँकेच्या सहकार्यातून नानाजी देशमूख कृषी संजीवनी प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतलेला आहे. शेतकऱ्यांनी संपूर्ण सहभाग दर्शवल्यास या योजना भविष्यात क्रांती घउवून दुष्काळ मूक्तीसाठी वाट दाखवणार असल्याने याचा आपण पूरेपूर फायदा उठवावा. असं मी आव्हानही करतो आहे.



 जालना इथं पोलीस कवायत मैदानावर पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते तर लातूर इथं पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं.



 बीड इथं पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. बीड जिल्ह्यात आता विकासाची नांदी येत असून, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक विकासाबरोबरच क्रीडाविकासही मोठ्या प्रमाणावर करण्याचा आपला मानस असल्याचं मुंडे यावेळी म्हणाल्या. 

****



परभणी इथं पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. त्यानंतर पोलिस दलासह विविध पथकांनी संचलन केलं. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.



 हिंगोली इथं संत नामदेव कवायत मैदानावर, पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी झालेल्या संचलनात विविध पथकांनी दिलेली मानवंदना पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी स्वीकारली.

****



 नांदेड इथं पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. दुष्काळ निवारणासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज व्यक्त करतानाच, एकात्मतेची भावना सर्वांमध्ये निर्माण व्हावी, असं आवाहन कदम यांनी केलं, ते म्हणाले....

हम सब एक है  हे फक्त १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला घोषणा देण्यासाठी कामाचं नाही. हे खरं असेन तर आम्ही एका कुंटूंबातील आहोत. आम्ही एका रक्तामासांचे आहोत. ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये रूजणं अत्यंत आवश्यक आहे. अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं. आम्ही राजकारण सोडून, आम्ही सर्व एकत्र येऊन या ज्या काही समस्या आहे, दुष्काळाशी सामोर गेलं पाहिजे. आणि मराष्ठवाड्याच्या प्रत्येक व्यक्तीला आम्ही मदतीचा हात दिला पाहिजे.

 उस्मानाबाद इथं पालकमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. आकांक्षित जिल्हा म्हणून उस्मानाबाद जिल्ह्यात विविध पायाभूत सुविधा, आरोग्य सुविधा, शिक्षण क्षेत्राचा विकास, महिला सक्षमीकरण, शेती आणि शेतीपूरक व्यवसाय वाढीसाठी विशेष प्रयत्न होत असल्यामुळे, जिल्ह्याचा क्रमांक ३२वा राहिला असल्याचं खोतकर यावेळी म्हणाले. पालकमंत्र्यांच्या हस्ते यावेळी जिल्हा क्रीडा पुरस्कार, लोकराज्य पुरस्कार, दिव्यांग प्रेरणा पुरस्कार, आदी पुरस्कार प्रदान करण्यात आले. पाणी वाचवा, रस्ते सुरक्षा, जननी शिशु सुरक्षा योजना यासह विविध विषयांवरचे चित्ररथ या संचलनात सहभागी झाले होते.



 विभागात सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयं, राजकीय तसंच सामाजिक संघटना आणि शैक्षणिक संस्थांमधून प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणासह विविध कार्यक्रम घेण्यात आले.

****



 सरकारनं येत्या २९ जानेवारीला लोकायुक्त कायद्याबाबत समिती तयार करण्याचं आश्वासन दिलं आहे, मात्र या संदर्भातील मागणीबाबत उपोषणावर ठाम असल्याचं, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे. ते काल राळेगणसिद्धी इथं वार्ताहरांशी बोलत होते. राज्यात मुख्यमंत्र्यांनी लोकायुक्त कायदा करण्याबाबत कोणतीही हालचाल न केल्यानं सरकारवर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे जोपर्यंत प्रत्यक्षात लोकायुक्त कायदा अस्तित्वात येण्याची खात्री होत नाही, तोपर्यंत आपण उपोषणावर ठाम राहू असा इशारा हजारे यांनी दिला आहे.  

****



 पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरच्या `मन की बात` या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ५२वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

****



 हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****



 लातूर जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजने’अंतर्गत एक ते आठ मेगावॅट क्षमतेचे २५ सौर उर्जा प्रकल्प मंजूर करण्यात आले असून, यातून एकूण ९१ मेगा वॅट वीज निर्मिती होणार असल्याची घोषणा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी काल केली. लातूर इथं काल प्रजासत्ताक दिनाचं मुख्य शासकीय ध्वजारोहण निलंगेकर यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. हे सौर ऊर्जा प्रकल्प निलंगा, औसा, अहमदपूर, चाकूर, रेणापूर, जळकोट आणि शिरुर अनंतपाळ या तालुक्यात प्रस्तावित असून, यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरु झाल्याची माहिती त्यांनी दिली.

****



 न्यूझीलंडविरूद्ध काल माऊंट मौंगानुई इथं झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं ९० धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघानं ५० षटकांत चार बाद ३२४ धावा केल्या. न्यूझीलंडचा संघ मात्र ४१व्या षटकात २३४ धावांवर सर्वबाद झाला. कुलदीप यादवनं चार, यजुवेंद्र चहल आणि भुवनेश्वर कुमारनं प्रत्येकी दोन गडी बाद केले. रोहीत शर्मा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. या विजयाबरोबरच भारतानं पाच सामन्यांच्या मालिकेत दोन - शून्यनं आघाडी मिळवली आहे.

****



 जकार्ता इथं सुरू असलेल्या इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सायना नेहवालचा अंतिम सामना आज स्पेनच्या करोलिना मारिन सोबत होईल.

काल तिनं उपान्त्य फेरीच्या सामन्यात चीनच्या बिंग जियाओ हिचा पराभव केला.

****



 दिवंगत सामाजिक कार्यकर्ते नानाजी देशमुख यांना ' भारतरत्न ' सन्मान जाहीर झाल्याबद्दल हिंगोली जिल्ह्यात विशेष आनंद व्यक्त करण्यात येत आहे. नानाजी देशमुख यांचं मूळ गाव असलेल्या कडोळी इथं काल सायंकाळी फटाके फोडून, गावात साखर वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

****



 नांदेड जिल्ह्यात काल देगलूर-भक्तापूर ते नागराळ रस्त्याचं भूमिपजून पर्यावरण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते करण्यात आलं. सव्वीस किलोमीटर लांबीचा हा रस्ता आहे.

****



 बीड जिल्ह्यात, यशवंत बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीनं पालवन इथं तुकाराम गुरुजी गोधाम प्रकल्पात उभारलेल्या चारा छावणीचं, पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन झालं.

*****

***

No comments: