आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
२२ मे २०१९ सकाळी ११.०० वाजता
****
देशभरात
झालेल्या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या होत असून, राज्यात मतमोजणीची तयारी पूर्ण
झाली आहे. जनतेला निकालाची माहिती जलदगतीनं मिळण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं
विविध सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. राज्यातल्या लोकसभेच्या
अट्ठेचाळीस जागांसाठी फेरी पद्धतीनं निकाल जाहीर करण्यात येणार असून निवडणूक
निरीक्षकांच्या देखरेखीखाली मतमोजणी होणार आहे. राज्यात मतदानासाठी प्रथमच व्हीव्हीपॅटचा
वापर करण्यात आला आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच व्हीव्हीपॅट यंत्रांमधल्या
पावत्यांची पडताळणी करण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर जिल्हा निवडणूक अधिकारी हे जनतेला
निकालाची फेरीनिहाय माहिती देणार आहेत. सर्वप्रथम टपाली मतदान आणि त्यानंतर मतदान यंत्रांतल्या
मतमोजणीला प्रारंभ होईल. दुपारनंतर निकाल हाती येण्यास सुरुवात होईल.
औरंगाबाद लोकसभा
मतदार संघातल्या मतदानाची मोजणी चिकलठाणा औद्योगिक परिसरातल्या मेल्ट्रॉन इमारतीत होणार
आहे. सकाळी सात वाजता उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींसमक्ष सुरक्षित कक्ष उघडण्यात
येईल आणि आठ वाजता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होईल. सव्वीस फे-यांमध्ये मतमोजणी प्रक्रिया
पूर्ण होणार असल्याची माहिती निवडणूक कार्यालयानं दिली आहे.
आकाशवाणीचा वृत्त
विभाग, सकाळी साडेदहा पासून निकाल प्रक्रियेचं प्रसारण करणार आहे. ‘निवाडा जनतेचा’
या नावाच्या या कार्यक्रमात, राजकीय तज्ञ निकालांचं सर्व समावेशक आणि सखोल विश्लेषण
करतील. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या वृत्त विभागाची अधिकृत `यू ट्यूब` वाहिनी, `फेसबुक
पेज`, `ट्विटर` आणि `आरएनयु औरंगाबाद डॉट ब्लॉग स्पॉट डॉट कॉम`वरही या निकालांचं थेट
प्रसारण केलं जाईल.
****
बँकांच्या कामकाजावर
देखरेख आणि नियमन करण्यासाठी, स्वत:चं देखरेख आणि नियामक मंडळ विकसित करण्याचा निर्णय
भारतीय रिजर्व्ह बँकेनं घेतला आहे. काल चेन्नई इथं, बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास
यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. प्रामुख्यानं, वाणिज्य
बँका, नागरी सहकारी बँका, तसंच बिगर बँकिंग आर्थिक कंपन्यांच्या कामकाजावर देखरेख आणि
नियमन अधिक बळकट करण्यासाठी हे स्वतंत्र मंडळ विकसित केलं जाणार असल्याचं, रिझर्व बँकेनं
कळवलं आहे.
****
भारतीय अवकाश
संशोधन संस्था-इस्त्रोनं `रिसॅट टूबी` या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केलं आहे. आज
पहाटे साडेपाच वाजता आंध्र प्रदेशमधल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ संशोधन
केंद्रावरून PSLV C46 या प्रक्षेपक यानाद्वारे
हा उपग्रह अवकाशात सोडण्यात आला. सहाशे पंधरा किलो वजनाच्या या उपग्रहामुळे, हवामान,
शेती, जंगलक्षेत्र आणि नैसर्गिक आपत्ती याबाबत अचूक माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
****
अंदमान निकोबार
बेटांवर आज सकाळी भूकंपाचा धक्का जाणवला. रिश्टर स्केलवर या धक्क्याची तीव्रता पाच
पूर्णांक आठ इतकी नोंदली गेल्याचं राष्ट्रीय भूकंपमापन केंद्रानं म्हटलं आहे.
****
जम्मू-कश्मीरमधे
कुलगाम जिल्ह्यातल्या गोपालपोरा परिसरात आज पहाटे सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत
एक दहशतवादी ठार झाला. या भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कर
आणि जम्मू-कश्मीर पोलिसांच्या संयुक्त पथकानं शोध मोहीम हाती घेतल्यानंतर ही चकमक उडाली.
शेवटचं वृत्त हाती येईपर्यंत चकमक सुरु होती, असं सुरक्षा दलानं म्हटलं आहे.
****
लातूर -चाकूर
रस्त्यावर आष्टामोड गावाजवळ आज सकाळी झालेल्या अपघातात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या
एका जवानाचा मृत्यू झाला तर अन्य दोन जवान जखमी झाले. लातूर इथल्या सीमा सुरक्षा दलाच्या
प्रशिक्षण केंद्रात जात असताना या जवानांच्या जीपला एका खाजगी वाहनानं धडक दिल्यानं
हा अपघात झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
सांगली जिल्ह्यातल्या
जत, मिरज आणि तासगाव तालुक्यात काल संध्याकाळी
झालेल्या वादळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं वृत्त आहे.
या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनानं कृषी आणि महसूल विभागाला दिले
आहेत. या गारपिटीमुळे सुमारे साडेतीन हजार हेक्टर क्षेत्रातल्या द्राक्ष बागांचं नुकसान
झालं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
राज्यात काल सांगली
आणि सोलापूर जिल्ह्यांच्या काही भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या, मात्र उर्वरित
राज्यात उष्णतेचा कहर कायम राहिला पुढच्या चोवीस तासातही मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या
काही भागात आणि मराठवाड्यात तुरळक भागात उष्णतेची लाट कायम राहील, असं हवामान विभागानं
सांगितलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment