Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date –
22 May 2019
Time 1.00 to
1.05pm
Language Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
२२ मे २०१९ दुपारी १.०० वा.
****
लोकसभा निवडणुकीच्या उद्या होणार
असलेल्या मतमोजणीत राज्यातल्या लोकसभेच्या
अट्ठेचाळीस जागांसाठी फेरी पद्धतीनं निकाल जाहीर करण्यात येणार आहेत. यात पालघर
आणि भिवंडी मतदारसंघात सर्वाधिक म्हणजेच पस्तीस निवडणूक निकाल फेऱ्या होतील. त्या खालोखाल
गोंदिया आणि ठाणे मतदारसंघात प्रत्येकी तेहतीस निवडणूक निकाल फेऱ्या आणि बीड आणि शिरुर
मतदारसंघात एकूण बत्तीस निवडणूक निकाल फेऱ्या होतील. सर्वात कमी म्हणजे सतरा निवडणूक
निकाल फेऱ्या हातकणंगले मतदारसंघात होणार असल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांनी कळवलं आहे.
****
लोकसभा निवडणुकीच्या उद्याच्या मतमोजणीसाठी
यंत्रणा सज्ज झाली आहे. सर्वप्रथम टपाल मतपत्रिकांची, त्यानंतर मतदानयंत्रांच्या मतांची
मोजणी होईल आणि शेवटी प्रत्येक विधानसभा मतदारसंघातल्या पाच मतदान केंद्रांमधल्या व्हीव्हीपॅटच्या
पावत्यांची पडताळणी होणार आहे. बुलडाणा मतदारसंघात पंचवीस फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार
आहे. मतमोजणी कक्षात बत्तीस सिसीटीव्ही कॅमेरे
बसविण्यात आले असून, मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया
सीसीटीव्हीच्या निगराणीत होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. सातारा, रत्नागिरी-
सिंधूदूर्ग इथंही यंत्रणा सज्ज झाली असल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.
आकाशवाणीचा वृत्त विभाग, सकाळी साडेदहा
पासून निकाल प्रक्रियेचं प्रसारण करणार आहे. ‘निवाडा जनतेचा’ या नावाच्या या कार्यक्रमात,
राजकीय तज्ञ निकालांचं सर्व समावेशक आणि सखोल विश्लेषण करतील. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या
वृत्त विभागाची अधिकृत `यू ट्यूब` वाहिनी, `फेसबुक पेज`, `ट्विटर` आणि `आरएनयु औरंगाबाद
डॉट ब्लॉग स्पॉट डॉट कॉम` वरही या निकालांचं थेट प्रसारण केलं जाईल.
****
राष्ट्रीय लोकशाही आघाडी ही भारतातल्या
जनतेच्या आशा आकांक्षांचं प्रतिनिधित्व करते, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं
आहे. ते काल रात्री नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीतल्या घटक पक्षांच्या
नेत्यांच्या बैठकीत बोलत होते. मतं मिळवून सत्ता आणणं हे रालोआचं उद्दिष्ट नसून नव्या भारताची निर्मिती हे उद्दिष्ट
आहे, असं ते म्हणाले. भाजपचे जेष्ठ नेते राजनाथ सिंग यांनी या बैठकीनंतर वार्ताहरांशी
बोलताना ही माहिती दिली. राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर रालोआची भूमिका ठाम आहे,
आणि या मुद्द्यावर यशस्वी झाल्याचं ते म्हणाले. शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख प्रकाशसिंह
बादल यांच्या अध्यक्षतेखाली रालोआच्या छत्तीस सहयोगी पक्षांची काल ही बैठक झाली.
****
२०२० या वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा
वृद्धीदर सात पूर्णांक एक दशांश टक्के राहील, असा अंदाज संयुक्त राष्ट्र संघानं नुकत्याच
जारी केलेल्या एका अहवालात वर्तवण्यात आला आहे. देशांतर्गत खप आणि गुंतवणुकीतल्या मजबुतीमुळे
हे शक्य होणार असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. जगातल्या अनेक विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्था
कमकुवत झाल्या आहेत, मात्र भारतीय अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर मजबूत राहिला आहे, असं या
अहवालात म्हटलं आहे.
****
आज आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन आहे.
प्रत्येक नागरिकानं नैसर्गिक संसाधनांच्या संवर्धनाचा प्रयत्न केला पाहिजे आणि जैवविविधतेचं
संरक्षण करणं आणि पर्यावरणाचं संतुलन राखणं, या बाबींचं महत्त्व मुलांना शिकवलं पाहिजे,
असं उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी या दिनानिमित्त एका संदेशात म्हटलं आहे.
लोकांनी निसर्गावर प्रेम करायला हवं आणि निसर्गासोबत जगायला हवं, असंही उपराष्ट्रपतींनी
म्हटलं आहे.
****
देशाच्या सुरक्षेबाबतची आव्हानं दिवसेंदिवस
वाढत असून, आगामी दिवसांत देशाच्या सीमांच्या सुरक्षेमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची मुख्य
भूमिका असेल, असं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी म्हटलं आहे. सीमा सुरक्षा
दलाच्या सतराव्या पदक प्रदान समारंभात ते आज नवी दिल्लीत बोलत होते. भारताचं सीमा सुरक्षा
दल हे जगातलं सर्वात मोठं सुरक्षा दल आहे, आणि या दलाची कामगिरी अतिशय उच्च दर्जाची
आहे, अशा शब्दात डोवल यांनी यावेळी सीमा सुरक्षा दलाची प्रशंसा केली.
****
गोहत्ती इथं सुरू असलेल्या भारतीय खुल्या
आंतरराष्ट्रीय मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या मेरी कोमसहित बावीस महिला खेळाडूंनी
उपान्त्य फेरीत प्रवेश करत पदकं निश्चित केली आहेत.
*****
***
No comments:
Post a Comment