Wednesday, 22 May 2019

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 22.05.2019 20.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 22 May 2019

Time 20.00 to 20.05

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२ मे २०१९ सायंकाळी २०.००

****



लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. उद्या सकाळी आठ वाजेपासून देशभरातल्या ५४२ मतदार संघात मतमोजणीला सुरुवात होईल. उद्या दुपारनंतर निवडणूक निकाल हाती येण्यास सुरुवात होईल,

महाराष्ट्रातल्या ४८ जागांपैकी बहुतेक सर्व निकाल संध्याकाळपर्यंत हाती येतील, असा अंदाज निवडणूक विभागात कार्यरत एका अधिकाऱ्यानं वर्तवला आहे. राज्यात ४८ केंद्रांवर ही मतमोजणी होत आहे. यापैकी पालघर आणि भिवंडी मतदारसंघात मतमोजणीच्या सर्वाधिक म्हणजेच पस्तीस फेऱ्या होतील. त्याखालोखाल गोंदिया आणि ठाणे मतदारसंघात प्रत्येकी तेहतीस तर बीड आणि शिरुर मतदारसंघात मतमोजणीच्या ३२ फेऱ्या होतील. हातकणंगले मतदारसंघात मतमोजणीच्या सर्वात कमी सतरा फेऱ्या होणार असल्याचं निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितलं. देशात सर्वाधिक ८० खासदार उत्तरप्रदेशातून तर त्या खालोखाल ४८ खासदार महाराष्ट्रातून निवडून दिले जातात.

****



दरम्यान, व्हीव्हीपॅट यंत्रांतल्या पावत्यांची आधी पडताळणी करून नंतरच मतमोजणी करावी, ही विरोधी पक्षांनी केलेली मागणी निवडणूक आयोगानं फेटाळली आहे. पूर्वी ठरल्याप्रमाणे मतमोजणी झाल्यानंतरचं या पावत्यांची पडताळणी होईल, असं आयोगानं स्पष्ट केलं आहे. मात्र यंदा टपाली मतपत्रिकांची मोठी संख्या लक्षात घेता, टपाली मतांची मोजणी, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रातल्या मतमोजणीसोबतच घेणार असल्याचं, आयोगाकडून सांगण्यात आलं आहे.



व्हीव्हीपॅट संदर्भात निवडणूक आयोगाच्या निर्णयावर विरोधी पक्षांकडून नाराजी व्यक्त होत आहे. निवडणूक आयोगाचा हा निर्णय म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या, अशा उपकरणांसंदर्भातल्या एका निकालातल्या तत्वाचं उल्लंघन असल्याची प्रतिक्रिया मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव सीताराम येचुरी यांनी दिली.

****



दरम्यान, इलेक्ट्रानिक मतदान यंत्रांना विरोध म्हणजे जनमताचा अनादर असल्याचं, भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत विरोधी पक्षांच्या ईव्हीएम संदर्भातल्या भूमिकेबाबत बोलत होते. निकालांच्या अंदाजावरुन ईव्हीएमवर संशय घेण्याचं काय कारण, असं विचारत, विरोधी पक्ष देशभरात संभ्रम निर्माण करत असल्याचं शहा म्हणाले. ईव्हीएमला विरोध करणाऱ्या पक्षांनीही ईव्हीएमच्या माध्यमातून अनेक निवडणुका जिंकल्या आहेत, याकडेही शहा यांनी लक्ष वेधलं.

****



ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट संदर्भात तक्रारी, विरोधी पक्षांच्या पराभवाच्या शक्यतेमुळे आलेल्या नैराश्यातून केल्या जात असल्याची टीका केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी केली आहे. ईव्हीएमला विरोध करणारे पक्ष, निवडणूक प्रक्रियेला पैसा आणि बळाच्या जोरावर चालणाऱ्या युगात नेऊ इच्छितात, असंही पासवान म्हणाले. पराभवाचं खापर फोडण्यासाठी काल्पनिक कथा रचल्या जात असल्याचा आरोपही पासवान यांनी केला.

****



नवनिर्वाचित खासदारांची दिल्लीतल्या निवासाची व्यवस्था हॉटेलांमध्ये करण्याची जुनी पद्धत लोकसभा सचिवालयानं मोडीत काढली आहे. आता नवीन खासदारांची निवास व्यवस्था दिल्लीतल्या वेस्टर्न कोर्ट तसंच नव्यानं उभारलेल्या एनेक्सी भवन इथं, करण्यात येणार आहे. लोकसभेच्या महासचिव स्नेहलता श्रीवास्तव यांनी आज नवी दिल्लीत पत्रकारांना ही माहिती दिली.

दरम्यान, मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह मंत्रालयानं, सर्व राज्य सरकारं तसंच केंद्रशासित प्रदेशांना सतर्क राहण्याच्या सूचना जारी केल्या आहेत.

****



धुळे लोकसभा मतदार संघातले भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे आणि काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचे उमेदवार आमदार कुणाल पाटील यांनी केंद्रीय निवडणूक आयोगानं घालून दिलेल्या सत्तर लाख रुपये खर्चाच्या मर्यादेपेक्षा जास्त खर्च केल्याचा आरोप भाजपचे बंडखोर माजी आमदार आणि लोकसंग्रामचे उमेदवार अनिल गोटे यांनी केला आहे. यामुळे धुळे लोकसभा मतदार संघाचा निवडणूक निकाल राखून ठेवण्यात यावा, अशी मागणी आपण निवडणूक निर्णय अधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे केल्याची माहिती गोटे यांनी आज धुळ्यात पत्रकार परिषदेत दिली.

****



केंद्रात भाजप आणि मित्रपक्षांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी - एनडीए ऐवजी पर्यायी सरकार स्थापन करण्यात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची मुख्य भूमिका असेल, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत पीटीआयशी बोलत होते. यंदा एनडीएला स्पष्ट बहुमत मिळणार नाही, याची आपल्याला खात्री असल्याचं मलिक म्हणाले.

या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापनेपासून आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करत, विक्रमी जागा जिंकेल, असा विश्वासही मलिक यांनी वर्तवला. २००९ मध्ये या पक्षानं आतापर्यंतच्या सर्वाधिक म्हणजे नऊ जागा जिंकल्या आहेत.

****



माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, शिवबंधन बांधून त्यांचं शिवसेनेत स्वागत केलं. त्यापूर्वी क्षीरसागर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वासह आमदारकीचाही राजीनामा दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वानं उपेक्षा केल्यामुळे पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला, असं क्षीरसागर यांनी सांगितल्याचं वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

****


No comments: